HAL Share Price Target: हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) या महारत्न कंपनीचे शेअर्स गेल्या सात महिन्यांत जवळपास ३७ टक्क्यांनी घसरले आहेत. मात्र, डिफेन्स कंपनीच्या शेअर्समध्ये प्रचंड वाढ होण्याची शक्यता बाजार तज्ज्ञांनी व्यक्त केलीये. तज्ज्ञांनी कंपनीच्या शेअर्ससाठी ५३४० रुपये कन्सेन्सस टार्गेट प्राइस दिलंय. म्हणजेच हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडचे शेअर्स सध्याच्या बाजारभावापेक्षा जवळपास ५० टक्क्यांनी वाढू शकतात. सीएनबीसी-टीव्ही १८ नं दिलेल्या वृत्तात ही माहिती देण्यात आलीये. गुरुवारी बीएसईवर डिफेन्स कंपनीचा शेअर ३६७६.९५ रुपयांवर व्यवहार करत होता.
१६ पैकी १५ जणांचा खरेदीचा सल्ला
ब्लूमबर्गवर हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडचा (एचएएल) मागोवा घेणाऱ्या १६ पैकी १५ विश्लेषकांनी कंपनीच्या शेअर्सना बाय रेटिंग दिलंय. म्हणजेच कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. केवळ एका विश्लेषकाने संरक्षण कंपनीच्या शेअर्सना सेल रेटिंग दिले आहे. अँटिक स्टॉक ब्रोकिंगने हिंदुस्थान एरोनॉटिक्सच्या शेअर्ससाठी सर्वाधिक ७०८९ रुपये टार्गेट प्राइस दिलंय. तर ८ विश्लेषकांनी प्रति शेअर ५३०० ते ५८१४ रुपयांपर्यंत टार्गेट रेंज दिली आहे. ब्रोकरेज हाऊस जेपी मॉर्गननं एचएएलच्या शेअर्सना ओव्हरवेट रेटिंग दिलं असून कंपनीच्या शेअर्ससाठी ४९५८ रुपये टार्गेट प्राइस दिलंय.
१४४० कोटींचा नफा
हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडला (एचएएल) चालू आर्थिक वर्षाच्या डिसेंबर तिमाहीत १४४० कोटी रुपयांचा नफा झालाय. संरक्षण कंपनीच्या नफ्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत १४ टक्क्यांनी वाढ झाली. हिंदुस्थान एरोनॉटिक्सला गेल्या वर्षी याच कालावधीत १२६१ कोटी रुपयांचा नफा झाला होता. डिसेंबर २०२४ तिमाहीत कंपनीचा महसूल १५ टक्क्यांनी वाढून ६,९५७ कोटी रुपये झाला आहे. कंपनीच्या संचालक मंडळानं पहिल्यांदा २५ रुपये प्रति शेअर अंतरिम लाभांश जाहीर केलाय. अंतरिम लाभांशाची विक्रमी तारीख १८ फेब्रुवारी आहे.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. यातील तज्ज्ञांची मतं त्यांची वैयक्तित मतं आहेत. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)