Gujrat Toolroom Ltd Bonus Shares: बोनस शेअर देणाऱ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी आहे. गुजरात टूलरूम लिमिटेडनं (Gujrat Toolroom Ltd) प्रत्येक १ शेअरमागे ५ शेअर्स बोनस म्हणून देण्याचा निर्णय घेतला आहे. आता कंपनीनं या बोनस इश्यूसाठी रेकॉर्ड डेटही जाहीर केलीये. ही रेकॉर्ड डेट याच महिन्यात आहे. कंपनीच्या शेअर्सची किंमत १५ रुपयांपेक्षा कमी आहे.
कधी आहे रेकॉर्ड डेट?
गुजरात टूलरूम लिमिटेडने एक्सचेंजला दिलेल्या माहितीनुसार, १ रुपयांच्या फेस व्हॅल्यूच्या प्रत्येक शेअरवर पात्र गुंतवणूकदारांना बोनस म्हणून ५ शेअर्स दिले जातील. कंपनीनं मंगळवार, १८ फेब्रुवारी रोजी या बोनस शेअरसाठी रेकॉर्ड डेट निश्चित केली आहे. म्हणजेच ज्या गुंतवणूकदारांचं नाव या दिवशी कंपनीच्या रेकॉर्ड बुकमध्ये राहील, त्यांना प्रत्येक शेअरवर बोनस म्हणून ५ शेअर्स दिले जातील.
शेअर्समध्ये तेजी
आज बीएसईवर कंपनीच्या शेअर्समध्ये जवळपास ५ टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. शेअर ११.२० रुपयांवर उघडला. काही काळानंतर बीएसईवर कंपनीच्या शेअरचा भाव ४.८५ टक्क्यांनी वाढून ११.३५ रुपयांवर पोहोचला. बीएसईवर कंपनीचा ५२ आठवड्यांचा उच्चांक ४५.९७ रुपये आणि ५२ आठवड्यांचा नीचांकी स्तर १०.१८ रुपये आहे. कंपनीचं मार्केट कॅप २६१.३१ कोटी रुपये आहे.
गेल्या वर्षभरात शेअर बाजारात कंपनीची कामगिरी खराब राहिली आहे. या काळात शेअरच्या किंमतीत ६९.४४ टक्क्यांची घसरण झाली. याच कालावधीत सेन्सेक्स ६.९९ टक्क्यांनी वधारलाय. तीन वर्षे कंपनीचे शेअर्स ठेवलेल्या गुंतवणूकदारांच्या रकमेत आतापर्यंत ८९१ टक्के वाढ झाली आहे. तर सेन्सेक्समध्ये या काळात ३१ टक्क्यांची वाढ झाली.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)