Join us
Daily Top 2Weekly Top 5

जहाज कंपनीला बांगलादेश सरकारकडून ऑर्डर, शेअरमध्ये तेजी; वर्षभरात ३००% पेक्षा अधिक वाढ, गुंतवणूकदार मालामाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2024 15:00 IST

कंपनीच्या शेअर्सने सोमवारी नवा उच्चांक गाठला. त्यांनी समुद्रात जाणाऱ्या प्रगत टग जहाजाच्या निर्मितीसाठी करार केला आहे. कंपनीला बांगलादेश सरकारकडून हे कंत्राट मिळालंय.

शिप बिल्डर कंपनी गार्डन रीच शिपबिल्डर्सचे शेअर्स सध्या फोकसमध्ये आहेत. गार्डन रीच शिपबिल्डर्सचा शेअर सोमवारी ९ टक्क्यांनी वधारून २,३०९.५० रुपयांवर पोहोचला. कंपनीच्या शेअर्सने सोमवारी नवा उच्चांक गाठला. गार्डन रीच शिपबिल्डर्सने समुद्रात जाणाऱ्या प्रगत टग जहाजाच्या निर्मितीसाठी करार केला आहे. कंपनीला बांगलादेश सरकारकडून हे कंत्राट मिळालंय.

गार्डन रीच शिपबिल्डर्सनं एक्स्चेंज फाइलिंगमध्ये यासंदर्भातील माहिती दिलीये. कंपनी समुद्रात जाणाऱ्या टग जहाजांचं डिझाइन, बांधकाम आणि वितरण करेल. गार्डन रीच शिपबिल्डर्सला येत्या २४ महिन्यांत ही ऑर्डर पूर्ण करायची आहे. कंपनीला मिळालेली ऑर्डर जवळपास २१ मिलियन डॉलर्सची आहे. टगची एकूण लांबी सुमारे ६१ मीटर आणि रुंदी सुमारे १५.८० मीटर असेल. याची खोली सुमारे ६.८० मीटर असेल.

४ कार्गो वेसल्ससाठीही कॉन्ट्रॅक्ट

गार्डन रीच शिपबिल्डर्सला नुकतंच एका जर्मन कंपनीकडून चार मल्टिपर्पज मालवाहू जहाजं पुरविण्याचं कंत्राट मिळालं आहे. याशिवाय काही आठवड्यांपूर्वी गार्डन रीचने बांगलादेशात आणखी एका करारावर स्वाक्षरी केली होती. हे कंत्राट सक्शन हॉपर ड्रेजरच्या पाठपुराव्यासाठी होतं.

वर्षभरात ३०० टक्के वाढ

गार्डन रीच शिपबिल्डर्सच्या शेअरमध्ये गेल्या वर्षभरात ३०० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. ३ जुलै २०२३ रोजी कंपनीचा शेअर ५७७.०५ रुपयांवर होता. गार्डन रीच शिपबिल्डर्सचा शेअर १ जुलै २०२४ रोजी २३०९.५० रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या ६ महिन्यांत गार्डन रीचच्या शेअर्समध्ये १६३ टक्क्यांहून अधिक वाढ झाली. या कालावधीत कंपनीचे शेअर्स ८७४.१५ रुपयांवरून २३०० रुपयांपर्यंत वाढले आहेत.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूक