Join us

ट्रम्प टॅरिफमुळे 'या' क्षेत्राला होणार ₹२४,००० कोटींचं नुकसान; या कंपन्यांचे शेअर्स क्रॅश, तुमच्याकडे आहेत का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 12:02 IST

डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या आठवड्यात जाहीर केलेल्या २५% कर व्यतिरिक्त भारतीय निर्यातीवर अतिरिक्त २५% कर लादण्याची घोषणा केली.

Donald Trump Tariff Frozen Food Stocks: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी भारतावर अतिरिक्त कर लादल्यानंतर भारतातील सीफूड उद्योगाला सुमारे २४,००० कोटी रुपयांचे नुकसान होऊ शकतं, असा अंदाज मॉर्गन स्टॅनलीनं व्यक्त केला. डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या आठवड्यात जाहीर केलेल्या २५% कर व्यतिरिक्त भारतीय निर्यातीवर अतिरिक्त २५% कर लादण्याची घोषणा केली.

अधिक माहिती काय?

"ट्रम्प याच्या या निर्णयामुळे भारताला इक्वाडोरसारख्या स्पर्धकांच्या तुलनेत लक्षणीय तोटा सहन करावा लागत आहे, ज्यामुळे निर्यातदार आणि संभाव्य शेतकऱ्यांवर परिणाम होईल. अमेरिकन बाजारपेठेवर मोठ्या प्रमाणात अवलंबून असलेला हा उद्योग सरकारी मदतीची अपेक्षा करत आहे आणि परिणाम कमी करण्यासाठी पर्यायी बाजारपेठांचा शोध घेत आहे," असे मॉर्गन स्टॅनली यांनी एका नोटमध्ये म्हटलंय.

भारतानं रशियासोबत असं काही केलं की ट्रम्प यांचा होईल तिळपापड; अमेरिकेच्या दुखत्या नसेवर हात ठेवला का?

गेल्या वर्षी मार्च तिमाहीपर्यंत, अवंती फीड्सनं उत्तर अमेरिकन बाजारपेठेतून एकूण उत्पन्नापैकी ७७% उत्पन्न मिळवलं होतं, जे गेल्या वर्षीच्या याच तिमाहीत ८०% होत. मार्च तिमाहीत एपेक्स फ्रोझन फूड्सनं दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या एकूण उत्पन्नापैकी ५३% उत्पन्न अमेरिकेतून आलं. जागतिक कोळंबी बाजारपेठेत सध्या भारताचा वाटा सुमारे २०% आहे आणि या आर्थिक वर्षात उत्पादन १२ लाख मेट्रिक टनांवर स्थिर राहण्याची अपेक्षा आहे. सध्या, अमेरिकेला भारतीय कोळंबी निर्यातीवर १७.७% प्रभावी सीमाशुल्क आकारलं जातं, ज्यामध्ये ५.७% काउंटरवेलिंग ड्यूटी आणि १.८% अँटी-डंपिंग ड्यूटी समाविष्ट आहे. आता हे वाढून २५% होईल.

शेअर्समध्येही घसरण

गेल्या एका महिन्यात अवंती फीड्सचे शेअर्स ९% नं घसरले आहेत, तर याच काळात एपेक्स फ्रोझन फूड्स आणि वॉटरबेसचे शेअर्स ७-७% नं घसरले आहेत. आज गुरुवारी देखील अवंती फीड्सचे शेअर्स ३% पेक्षा जास्त घसरले आणि ६४६.७५ रुपयांवर आले. त्याच वेळी, एपेक्स फ्रोझन फूड्सचे शेअर्स आज २% पर्यंत घसरले आणि वॉटरबेसचे शेअर्सही घसरत आहेत.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :टॅरिफ युद्धडोनाल्ड ट्रम्पभारत