Join us

सचिन तेंडुलकरपासून आलिया, शिल्पा शेट्टीसह सेलिब्रिटींना IPO मधून मोठा नफा; कोणते आहेत आयपीओ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2024 14:40 IST

Top Celebrities And Their Portfolios: लहान-मोठ्या सर्व प्रकारच्या गुंतवणूकदारांनी आपला मोर्चा याकडेच वळवलाय. इतकंच नाही तर असे अनेक आयपीओ आलेत ज्यात टॉप बॉलीवूड आणि क्रिकेट सेलिब्रेटींनीही मोठी गुंतवणूक केलीये आणि उत्तम परतावाही कमावला आहे. 

Top Celebrities And Their Portfolios: गेल्या तीन ते चार वर्षांपासून शेअर बाजारात आयपीओची प्रचंड क्रेझ आहे. लहान-मोठ्या सर्व प्रकारच्या गुंतवणूकदारांनी आपला मोर्चा याकडेच वळवलाय. इतकंच नाही तर असे अनेक आयपीओ आलेत ज्यात टॉप बॉलीवूड आणि क्रिकेट सेलिब्रेटींनीही मोठी गुंतवणूक केलीये आणि उत्तम परतावाही कमावला आहे. 

भारतातील वेगानं वाढणाऱ्या आयपीओ बाजारानं गेल्या काही वर्षांत गुंतवणूकदारांना मोठा परतावा दिलाय. यातील अनेक लिस्टिंग टॉप बॉलीवूड आणि क्रिकेट स्टार्ससाठीही फायदेशीर ठरल्यात. आज आम्ही तुम्हाला अशाच काही आयपीओ आणि कंपन्यांच्या शेअर्सबद्दल सांगत आहोत, ज्यात तुमच्या आवडत्या सेलिब्रेटींची मोठी गुंतवणूक आहे.

कोणाची किती गुंतवणूक?

भारतातील प्रसिद्ध सेलिब्रिटींनी गेल्या काही वर्षांत आयपीओमध्ये पैसे गुंतवून बंपर नफा कमावलाय. सचिन तेंडुलकरनं आझाद इंजिनीअरिंगच्या आयपीओमध्ये सुमारे ५ कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती आणि लिस्टिंगवरील त्याच्या गुंतवणुकीचे मूल्य सुमारे ६० कोटी रुपये होते. तर आलिया भट्टनं नायकामध्ये ४.९५ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आणि लिस्टिंगवरील तिची गुंतवणूक ५४ कोटींवर गेली. कतरिना कैफनं २०१८ मध्ये नायकामध्ये २.०४ कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. लिस्टिंगच्या वेळी कतरिना कैफची गुंतवणूक जवळपास ११ पटीनं वाढून २२ कोटी रुपये झाली होती. 

इतकंच नाही तर आमिर खान आणि रणबीर कपूर यांनी द्रोणाचार्य एरियल इनोव्हेशन्सच्या आयपीओमधून प्रचंड नफा कमावला होता. शिल्पा शेट्टीनं मामाअर्थ मध्ये ६.७ कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती, तिने ४१.८६ रुपये प्रति शेअर दरानं १६ लाख शेअर्स खरेदी केले होते. मामाअर्थच्या आयपीओच्या ऑफर फॉर सेलमध्ये (ओएफएस) १३.९३ लाख शेअर्स विकून तिनं नफा कमावला. शिल्पा शेट्टीनं पब्लिक इश्यूमधून ४५.१४ कोटी रुपये कमावले. तिच्याकडे अजूनही कंपनीचे सुमारे २.३ लाख शेअर्स आहेत. तर अजय देवगणने पॅनोरमा स्टुडिओ इंटरनॅशनल आणि अमिताभ बच्चन यांनी डीपी वायर्समधून बंपर नफा कमावला आहे.

फर्स्ट क्रायमध्येही सचिन आणि रतन टाटांची गुंतवणूक

फर्स्ट क्रायची मूळ कंपनी ब्रेनीज सोल्यूशन्सच्या आयपीओमध्ये सचिन तेंडुलकर आणि रतन टाटा हे सहभागी झाले होते. ऑक्टोबर २०२३ मध्ये सचिन तेंडुलकर आणि त्याची पत्नी अंजली सचिन तेंडुलकर यांनी या कंपनीत १० कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. दुसरीकडे, रतन टाटा यांनी २०१६ मध्ये कंपनीत ६६ लाख रुपयांची गुंतवणूक केली होती आणि ८४.७२ रुपये प्रति शेअर दराने ७७,९०० इक्विटी शेअर्स खरेदी केले होते. कंपनीचे शेअर्स ४० टक्के प्रीमियमसह ६५१ रुपयांवर लिस्ट झाले. याचा प्राइस बँड ४६५ रुपये होता.

गो डिजिटमधून विराट-अनुष्काची कमाई

अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांनी जानेवारी २०२० मध्ये खासगी प्लेसमेंटद्वारे विमा स्टार्टअप गो डिजिटमध्ये २.५ कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. कोहलीने गो डिजिटमध्ये ७५ रुपये प्रति शेअर दराने २.६६ लाख इक्विटी शेअर्स खरेदी केले. तर अनुष्का शर्मानं 50 लाख रुपयांचे खरेदी केले. कंपनीचे शेअर्स ५ टक्के प्रीमियमसह २८६ रुपयांवर लिस्ट झाले. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांना यातून २८१ टक्के परतावा मिळाला.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :इनिशिअल पब्लिक ऑफरिंगशेअर बाजार