Join us
Daily Top 2Weekly Top 5

'या' FMCG कंपनीला झाला ₹६७९ कोटींचा नफा; आता गुंतवणूकदारांना मिळणार भरघोस लाभांश

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2026 11:33 IST

मार्च तिमाहीत मोठी झेप; नफ्यात 21.6% वाढ!

FMCG क्षेत्रातील दिग्गज कंपनी Britannia इंडस्ट्रीजने आर्थिक वर्ष २०२५-२६ च्या चौथ्या तिमाहीत (Q4 FY26) उत्कृष्ट आर्थिक कामगिरी नोंदवत गुंतवणूकदारांना मोठी भेट दिली आहे. मजबूत विक्री, प्रीमियम उत्पादनांना वाढती मागणी आणि ई-कॉमर्स व्यवसायातील वाढीमुळे कंपनीच्या नफ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. या वाढीमुळेच आता कंपनीने प्रति शेअर ₹९०.५० लाभांश जाहीर केला आहे.

मार्च तिमाहीत मोठी झेप

मार्च २०२६ च्या तिमाहीत कंपनीचा एकत्रित निव्वळ नफा वार्षिक आधारावर २१.६ टक्क्यांनी वाढून ₹६७९.६८ कोटींवर पोहोचला. मागील वर्षी याच कालावधीत कंपनीचा नफा ₹५५९.१३ कोटी होता. त्याचबरोबर कंपनीच्या महसुलातही चांगली वाढ झाली आहे. Q4 मध्ये कंपनीचा एकूण महसूल ₹४,७१८.९२ कोटींवर पोहोचला, जो मागील वर्षी ₹४,४३२.१९ कोटी होता. कंपनीचा प्रॉफिट बिफोर टॅक्स (PBT) देखील वाढून ₹७८५.११ कोटींवर गेला आहे. गेल्या वर्षी समान तिमाहीत हा आकडा ₹७५१.९३ कोटी होता.

विक्रीत ७% पेक्षा अधिक वाढ

ब्रिटानियाची एकत्रित विक्री मार्च तिमाहीत ७.१ टक्क्यांनी वाढून ₹४,६८६ कोटी झाली. कंपनीच्या प्रीमियम उत्पादनांना ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळाल्याने विक्रीला चालना मिळाली. विशेषतः क्रोइसाँ, वेफर्स आणि नव्या उत्पादनांच्या श्रेणींमध्ये मागणी मजबूत राहिली. ई-कॉमर्स व्यवसायानेही कंपनीच्या वाढीत महत्त्वाची भूमिका बजावली असून, एकूण व्यवसायातील त्याचा वाटा सुमारे ६ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे.

संपूर्ण आर्थिक वर्षातही मजबूत कामगिरी

३१ मार्च २०२६ रोजी संपलेल्या पूर्ण आर्थिक वर्षातही कंपनीने सातत्यपूर्ण वाढ कायम ठेवली. FY26 मध्ये कंपनीचा एकूण महसूल ₹१९,१५१.५९ कोटींवर पोहोचला, जो मागील आर्थिक वर्षात ₹१७,९४२.६७ कोटी होता. वार्षिक निव्वळ नफा देखील १६.४ टक्क्यांनी वाढून ₹२,५३७.०१ कोटी झाला आहे.

व्यवस्थापनाचे काय म्हणणे?

रनजीत सिंह कोहली यांनी सांगितले की, तिमाहीच्या पहिल्या दोन महिन्यांत कंपनीचा व्यवसाय जवळपास ९ टक्के दराने वाढला होता. मात्र, मार्च महिन्यात पश्चिम आशियातील संघर्षामुळे आंतरराष्ट्रीय व्यवसायावर परिणाम झाला आणि सप्लाय चेनमध्ये अडथळे निर्माण झाले. तरीदेखील देशांतर्गत बाजारातील मजबूत मागणी आणि डिजिटल विक्रीच्या वाढत्या योगदानामुळे कंपनीला चांगले निकाल सादर करता आले.

गुंतवणूकदारांसाठी लाभांशाची घोषणा

कंपनीच्या संचालक मंडळाने FY26 साठी ₹१ दर्शनी मूल्य असलेल्या प्रत्येक शेअरवर ₹९०.५० अंतिम लाभांश देण्याची शिफारस केली आहे. कंपनीच्या १०७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (AGM) भागधारकांची मंजुरी मिळाल्यानंतर हा लाभांश लागू होणार आहे.

शेअर बाजारात सकारात्मक प्रतिसाद

तिमाही निकाल जाहीर होण्यापूर्वी NSE वर ब्रिटानियाचा शेअर १.७७ टक्क्यांच्या वाढीसह ₹५,८८५.५० वर बंद झाला. मजबूत निकाल आणि आकर्षक लाभांश घोषणेमुळे आगामी सत्रांमध्येही शेअरमध्ये सकारात्मक हालचाल दिसण्याची शक्यता बाजार तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

English
हिंदी सारांश
Web Title : Britannia's Profit Soars, Investors to Receive Bumper Dividend

Web Summary : Britannia Industries reports a ₹679 crore profit in Q4 FY26, driven by strong sales and premium products. The company announced a dividend of ₹90.50 per share. Revenue rose to ₹4,718.92 crore, with e-commerce contributing significantly to growth. The board recommends final dividend subject to shareholder approval.
टॅग्स :शेअर बाजारस्टॉक मार्केटगुंतवणूक