Join us

४ वर्षांनंतर मर्जरला मिळाली मंजुरी, रॉकेट बनला शेअर; लागलं २० टक्क्यांचं अपर सर्किट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 15:53 IST

Equinox India shares: आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी या शेअरनं २० टक्क्यांचा उच्चांक गाठला. त्यामुळे हा शेअर १४३.५८ रुपयांवर आला.

Equinox India shares: रिअल इस्टेट कंपनी इक्विनॉक्स इंडिया डेव्हलपमेंट्सच्या (पूर्वीचे इंडियाबुल्स रिअल इस्टेट) शेअर्समध्ये मंगळवारी जोरदार वाढ दिसून आली. आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी या शेअरनं २० टक्क्यांचा उच्चांक गाठला. त्यामुळे हा शेअर १४३.५८ रुपयांवर आला. नॅशनल कंपनी लॉ अपीलल ट्रिब्युनलनं (NCLT) या कंपनीचं एम्बेसी ग्रुपसोबत विलीनीकरण करण्यास मंजुरी दिली आहे. या मंजुरीच्या वृत्तानंतर इक्विनॉक्स इंडिया डेव्हलपमेंट्सच्या शेअरमध्ये गुंतवणूकदारांनी उड्या घेतल्या.

लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!https://www.whatsapp.com/channel/0029VaBACbfInlqHyOB7FE09

२०२० मध्ये डीलची घोषणा

इक्विनॉक्स इंडिया डेव्हलपमेंट्सचे एम्बेसी ग्रुपमध्ये विलीनीकरणाची घोषणा पहिल्यांदा ऑगस्ट २०२० मध्ये करण्यात आली होती. त्यानंतर फेब्रुवारी २०२१ मध्ये सीसीआयनं विलीनीकरणाला मंजुरी दिली. त्याचवेळी नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलच्या (एनसीएलटी) बंगळुरू खंडपीठानेही हिरवा कंदील दाखवला होता.

२०२३ मध्ये समस्या

मार्च २०२३ मध्ये एनसीएलटीच्या चंदीगड खंडपीठानं आयकर विभागाकडून चिंता व्यक्त केल्याचे कारण देत विलीनीकरणाला स्थगिती दिली होती. यानंतर इंडियाबुल्सनं एनसीएलटी चंदीगडच्या आदेशाला एनसीएलएटीमध्ये आव्हान देण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हापासून या प्रकरणावर प्रदीर्घ चर्चा सुरू आहे. आता एनसीएलएटीने विलीनीकरणाला परवानगी दिली आहे. त्याचबरोबर आयकर विभाग आणि इतर चिंतांकडे बाजूला सारण्यात आल्यात. मात्र, अपिलीय न्यायाधिकरणाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं जाऊ शकतं.

कंपनीचं नाव बदललं

इक्विनॉक्स इंडिया डेव्हलपमेंट पूर्वी इंडियाबुल्स रिअल इस्टेट म्हणून ओळखली जात होती. मात्र, गेल्या वर्षी जुलै महिन्यात या कंपनीचं नाव अधिकृतरित्या बदलण्यात आलं.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूक