Join us

एका रात्रीत श्रीमंत बनवलं... आता करतोय कंगाल; ३ महिन्यात २ लाखांनी स्वस्त झाला 'हा' शेअर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 13:44 IST

Elcid Investment Share Price: शेअर बाजार हा जोखमीचा व्यवसाय मानला जातो. इथे कोणता शेअर गुंतवणूकदाराला क्षणात श्रीमंत बनवतो आणि कोणता शेअर जमिनीवर आणेल हे सांगता येत नाही.

Elcid Investment Share Price: शेअर बाजार हा जोखमीचा व्यवसाय मानला जातो. इथे कोणता शेअर गुंतवणूकदाराला क्षणात श्रीमंत बनवतो आणि कोणता शेअर जमिनीवर आणेल हे सांगता येत नाही. याचं ताजं उदाहरण म्हणजे गुंतवणूकदारांना आधी सुखद धक्का देणारा आणि आता सातत्यानं नुकसान करवणारा एल्सिड इन्व्हेस्टमेंट लिमिटेडचा शेअर. एल्सिडच्या शेअर्सची किंमत अवघ्या ३ महिन्यांत २,००,००० रुपयांनी कमी झाली आहे.

शेअरची किंमत इतक्या नीचांकी पातळीवर आली आहे गेल्या काही महिन्यांपासून एल्सिड इन्व्हेस्टमेंटचा शेअर खूप चर्चेत आहे. एमआरएफ स्टॉकला मागे टाकत तो देशातील सर्वात महागडा स्टॉक ठरला होता. त्याचबरोबर ज्यांनी यात गुंतवणूक केली ते रातोरात कोट्यधीश झाले. पण ताजी परिस्थिती जाणून घेतली तर गुंतवणूकदारांची अवस्था वाईट आहे. शेअरची किंमत ३.३२ लाख रुपयांवरून आता केवळ १.२८ लाख रुपयांवर आली आहे. ८ नोव्हेंबरपासून एल्सिडच्या शेअरची किंमत २.०२ लाख रुपयांनी कमी झाली.

शेअरमध्ये मोठी घसरण

शेअर बाजारात मोठी घसरण होत असताना आजही एल्सिडच्या शेअरमध्येही मोठी घसरण झाली. कामकाजादरम्यान हा शेअर १,२७,४५० रुपयांवर होता. तर दुसरीकडे सोमवारी एकाच दिवसात शेअरचा भाव ४,८३३ रुपयांनी घसरला. गेल्या महिनाभरात त्यात ३२.६० टक्के (६१,९२५ रुपये) घसरण झाली आहे, तर गेल्या सहा महिन्यांत ४५.८२ टक्के (१.०८ लाख रुपये) घसरण झाली आहे.

एका दिवसात ६६९२५३५ टक्क्यांची वाढ

८ नोव्हेंबर रोजी कंपनीच्या शेअरनं ३,३२,३९९.९५ रुपयांचा उच्चांक गाठला होता. कंपनीचा शेअर ५२ आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर ३.५३ रुपये आहे.

एल्सिड इन्व्हेस्टमेंटच्या शेअर्समध्ये अचानक मोठी वाढ झाली आहे. २९ ऑक्टोबर २०२४ रोजी एकाच दिवसात कंपनीच्या शेअर्समध्ये तब्बल ६६९२५३५% वाढ झाली. मुंबई शेअर बाजारात झालेल्या स्पेशल कॉल ऑक्शननंतर एल्सिड इन्व्हेस्टमेंट्सच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाली होती. या तेजीनंतर एल्सिड इन्व्हेस्टमेंट्स एमआरएफला मागे टाकत देशातील सर्वात महागडा शेअर ठरला.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूक