Join us

३ दिवसांपासून रॉकेट बनलाय 'हा' स्टॉक, झुनझुनवालांकडे आहेत १३ कोटींपेक्षा अधिक शेअर; किंमत ₹९५ पेक्षा कमी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2025 13:26 IST

चौथ्या तिमाहीत रेखा झुनझुनवाला यांनी या शेअरमध्ये आपली भागीदारी वाढवली आहे. पाहा कोणता आहे हा शेअर.

Rekha Jhunjhunwala Portfolio Stock: कॅनरा बँकेचा शेअर बुधवारी २ टक्क्यांहून अधिक वधारला आणि ९४.५० रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला. शेअर्सच्या या तेजीमागे एक सकारात्मक बातमी आहे. चौथ्या तिमाहीत रेखा झुनझुनवाला यांनी या शेअरमध्ये आपली भागीदारी वाढवली आहे. शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदाररेखा झुनझुनवाला यांनी ३१ मार्च २०२५ रोजी संपलेल्या तिमाहीत कॅनरा बँकेला आपल्या पोर्टफोलिओमध्ये समाविष्ट केलं आणि पीएसयू बँकेत १.४६ टक्के हिस्सा खरेदी केला. म्हणजेच रेखा झुनझुनवाला यांच्याकडे आता बँकेचे १३२४४३००० शेअर्स आहेत. रेखा झुनझुनवाला यांनी डिसेंबर तिमाहीत शेअर्स विकले होते, पण अलीकडच्या तिमाहीत परत त्यांनी विकत घेण्याचा निर्णय घेतला. ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत कंपनीत त्यांची मालकी १.४२% इतकी होती.

रेपो दरात कपातीचाही फायदा

कॅनरा बँकेच्या शेअरमध्ये बुधवारी सलग तिसऱ्या सत्रात वाढ झाली. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून (आरबीआय) नुकतीच व्याजदरात आणखी एक कपात होण्याची शक्यता असल्यानं शेअर्समध्ये सातत्यानं तेजी दिसून येत आहे. नुकतीच आरबीआयने रेपो दरात कपात करण्याची घोषणा केली होती. निफ्टी बँक निर्देशांक ०.७० टक्क्यांनी वधारून ५२,७४९ अंकांवर पोहोचला. 

'हा' शेअर विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग, महिन्याभरात अर्धी झाली किंमत; आता SEBI ची मोठी कारवाई

फेडरल बँक, बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक आणि पंजाब नॅशनल बँकेचे शेअर्सही दोन टक्क्यांपर्यंत वधारले. कोटक महिंद्र बँक, अॅक्सिस बँक, इंडसइंड बँक आणि स्टेट बँक ऑफ इंडिया या प्रमुख बँकांच्या शेअर्समध्येही ०.५ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. एंजल वनचे इक्विटी टेक्निकल अँड डेरिव्हेटिव्ह अॅनालिस्ट राजेश भोसले यांच्या म्हणण्यानुसार, पीएसयू बँका आज चर्चेत आहेत आणि कॅनरा बँकेचे शेअर्सही खूप तेजी दाखवत आहेत.

शेअर्सची स्थिती काय?

कॅनरा बँकेचा शेअर आज बीएसईवर ९३.४६ रुपयांवर उघडला आणि इंट्राडे उच्चांकी ९४.५० रुपये प्रति शेअर आणि इंट्राडे नीचांकी स्तर ९२.६३ रुपये प्रति शेअर गाठला. ट्रेंडलाइनच्या आकडेवारीनुसार, गेल्या वर्षभरात शेअरची किंमत २०.७३ टक्क्यांनी घसरली आणि आपल्या सेक्टरपेक्षा ती ३३.३६ टक्क्यांनी पिछाडीवर राहिली. कॅनरा बँकेच्या शेअरमध्ये सलग तीन सत्रात जवळपास ५ टक्क्यांची वाढ झाली आहे.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेण आवश्यक आहे.)

टॅग्स :रेखा झुनझुनवालाशेअर बाजारगुंतवणूक