Share Market Today: भारतीय शेअर बाजारात शुक्रवारी सलग तिसऱ्या दिवशी 'हाहाकार' पाहायला मिळाला. जागतिक भू-राजकीय तणाव आणि कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली मोठी वाढ यामुळे गुंतवणूकदारांनी चौफेर विक्रीचा सपाटा लावला. व्यवहाराच्या शेवटी सेन्सेक्स १४७०.५० अंकांनी (१.९३%) कोसळून ७४,५६३.९२ वर बंद झाला, तर निफ्टी ४८८.०५ अंकांच्या (२.०६%) घसरणीसह २३,१५१.१० च्या स्तरावर पोहोचला.
एका वर्षातील सर्वात मोठी साप्ताहिक घसरण
चालू आठवडा शेअर बाजारासाठी अत्यंत वेदनादायी ठरला आहे. गेल्या पाच दिवसांत सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये ५ टक्क्यांहून अधिक घसरण नोंदवण्यात आली. गेल्या वर्षभरातील ही सर्वात मोठी साप्ताहिक पडझड मानली जात आहे. केवळ लार्जकॅपच नव्हे, तर मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकातही २.५ टक्क्यांची मोठी घसरण झाल्याने बाजारात भीतीचे वातावरण आहे.
गुंतवणूकदारांना मोठा फटका: १० लाख कोटींचे नुकसान
बाजार कोसळल्यामुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत मोठी घट झाली आहे. बीएसईमध्ये सूचीबद्ध असलेल्या कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल एका दिवसात ४४०.०६ लाख कोटींवरून घटून ४३०.१८ लाख कोटींवर आले. म्हणजेच, आज एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे तब्बल ९.८८ लाख कोटी रुपये बुडाले आहेत.
कोणाला बसला सर्वाधिक फटका?
सेंसेक्समधील ३० पैकी २८ शेअर्स आज लाल निशाणात (घसरणीसह) बंद झाले.
टॉप लूजर्स: लार्सन अँड टुब्रोचा शेअर सर्वाधिक ७.५२ टक्क्यांनी घसरला. त्यापाठोपाठ टाटा स्टील, स्टेट बँक ऑफ इंडिया, भारत इलेक्ट्रॉनिक्स आणि मारुति सुझुकीच्या शेअर्समध्ये ३.१२ ते ५.२० टक्क्यांची घसरण झाली.हे शेअर्स सावरले: एवढ्या मोठ्या घसरणीतही हिंदुस्तान युनिलिव्हर १.१८% आणि भारती एअरटेल ०.३३% वाढीसह हिरव्या निशाणात बंद झाले.
चौफेर विक्रीचा दबाव
बाजारातील सर्वच क्षेत्रांमध्ये आज मोठी विक्री झाली. विशेषतः ऑटो, पीएसयू बँक, मेटल, मीडिया आणि खाजगी बँकिंग क्षेत्रातील शेअर्स ३ ते ४ टक्क्यांपर्यंत खाली आले. बीएसईवर आज एकूण ४,४२१ शेअर्समध्ये व्यवहार झाला, त्यापैकी तब्बल ३,३३२ शेअर्स घसरणीसह बंद झाले, तर ५६३ शेअर्सनी वर्षभरातील नीचांकी स्तर गाठला.
वाचा - सावधान! शेअर बाजारात अजून घसरण होणार? निफ्टी २३,२०० च्या खाली; जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला
तज्ज्ञांचे मत
जागतिक अनिश्चितता आणि कच्चे तेल महागल्याने 'बुल्स' पूर्णपणे बचावात्मक पवित्र्यात आले आहेत. विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांचा विक्रीचा कल कायम राहिल्यास बाजारात आणखी काही दिवस अस्थिरता राहू शकते. अशा वेळी किरकोळ गुंतवणूकदारांनी घाबरून न जाता केवळ दर्जेदार शेअर्सवर लक्ष केंद्रित करावे, असा सल्ला बाजार विश्लेषकांनी दिला आहे.
Web Summary : Indian stock market witnessed its worst weekly decline this year, with Sensex and Nifty falling over 5%. Investors lost billions as geopolitical tensions and rising crude oil prices triggered widespread selling, impacting various sectors.
Web Summary : भारतीय शेयर बाजार में इस साल की सबसे बड़ी साप्ताहिक गिरावट देखी गई, सेंसेक्स और निफ्टी 5% से अधिक गिरे। भू-राजनीतिक तनाव और कच्चे तेल की बढ़ती कीमतों के कारण निवेशकों को भारी नुकसान हुआ।