Join us

अमेरिकेत एकाचा राजीनामा अन् इथे अदानींच्या शेअर्समध्ये वादळी वाढ! कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2024 14:52 IST

Adani Group Stock: अदानी समूहाच्या शेअर्समध्ये पुन्हा एकदा जोरदार वाढ झालेली पाहायला मिळत आहे.

Adani Group Stock :शेअर बाजारात गेल्या काही काळापासून सातत्याने घसरण पाहायला मिळत आहे. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा सेन्सेक्स आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निफ्टी घसरणीसह व्यवहार करत आहे. अशा मंदीच्या परिस्थितीत अदानी समूहाच्या शेअर्समध्ये मोठी वाढ होताना दिसत आहे. अदानी एंटरप्रायझेस ते अदानी पॉवरपर्यंतच्या शेअर्समध्ये प्रचंड वाढ दिसून येत आहे.

अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स 2.65 टक्क्यांनी वाढून 2,521 रुपयांवर पोहोचले, तर अदानी ग्रीनचे शेअर्स 8 टक्क्यांनी वाढून 1237 रुपयांवर, अदानी पॉवरचे शेअर्स 5.87 टक्क्यांनी वाढून 549 रुपयांवर, अदानी एनर्जी सोल्यूशनचे शेअर्स 4 टक्क्यांनी वाढून 828 रुपयांवर आणि अदानी पोर्टचे शेअर्स 2 टक्क्यांनी वाढून 1259 रुपयांवर पोहोचले आहेत. याशिवाय, अदानी विल्मरचे शेअर्स 1.22 टक्के आणि अदानी टोटल गॅसच्या शेअर्समध्ये 2.70 टक्के वाढ दिसून आली आहे.

अदानींचे शेअर्स अचानक का वाढले?अदानी समूहाच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे कारण अमेरिकेत आहेत. एफबीआयचे संचालक क्रिस्टोफर रे यांनी राजीनामा दिला आहे. आता कुश पटेल क्रिस्टोफर रेची जागा घेतील. ख्रिस्तोफर रे यांच्या कार्यकाळातच अदानी समूहावर लाचखोरीचे आरोप झाले होते. गौतम अदानींसह 8 जणांविरुद्ध अमेरिकन कोर्टात आरोप निश्चित करण्यात आले आहेत. पण, आता या राजीनाम्यानंतर पुन्हा एकदा अदानी समूहाचे शेअर्स वाढत आहेत. 

डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?क्रिस्टोफर रे यांच्या राजीनाम्यावर डोनाल्ड ट्रम्प यांनीही मोठे वक्तव्य केले आहे, ज्यामध्ये क्रिस्टोफर रे यांचा राजीनामा हा अमेरिकेसाठी मोठा दिवस असल्याचे म्हटले. आता आम्ही सर्व अमेरिकन नागरिकांसाठी कायद्याचे राज्य पुनर्संचयित करू. ख्रिस्तोफर रे आणि एफबीआयने विनाकारण माझ्या घरावर बेकायदेशीरपणे छापा टाकला. माझ्यावर बेकायदेशीरपणे महाभियोग चालवून खोट्या प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचेही ट्रम्प म्हणाले. 

दरम्यान, काही काळापूर्वी अमेरिकन कोर्टाने गौतम अदानी आणि त्यांच्या ग्रुपवर लाच दिल्याचा आरोप लावला होता, त्यानंतर अदानीच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. सर्वात मोठी घसरण अदानी ग्रीनच्या शेअर्समध्ये झाली. मात्र, या आरोपानंतर अदानी ग्रीन कंपनीकडून निवेदन जारी करण्यात आले असून, हे सर्व आरोप खोटे असल्याचे सांगण्यात आले. यानंतर अदानींच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाली आहे.

(टीप- कोणत्याही शेअरमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी आर्थिक सल्लागाराची मदत घ्या.)

 

टॅग्स :अदानीगौतम अदानीशेअर बाजारशेअर बाजारअमेरिका