Join us
Daily Top 2Weekly Top 5

अदानी समूहातील 'या' ३ कंपन्या सूसाट..; ब्रोकरेज फर्मने इतका विश्वास का टाकला? पाहा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2026 18:25 IST

Adani Group Share: फर्मने या तिन्ही कंपन्यांसाठी ‘Buy’ रेटिंग कायम ठेवत टार्गेट प्राइस वाढवले आहेत.

Adani Group Share: अदानी समूहाअंतर्गत येणाऱ्या तीन महत्त्वाच्या कंपन्यांबाबत आंतरराष्ट्रीय ब्रोकरेज जेफरीजने सकारात्मक भूमिका घेतली आहे. ब्रोकरेजने अदानी पॉवर, अदानी पोर्ट्स आणि अदानी इंटरप्राईज, या तिन्ही कंपन्यांसाठी ‘Buy’ रेटिंग कायम ठेवत टार्गेट प्राइस वाढवले आहेत. या निर्णयामुळे येत्या काळात संबंधित शेअर्समध्ये हालचाल दिसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

जेफरीजच्या अहवालानुसार, या कंपन्यांची मजबूत ऑपरेशनल कामगिरी, सातत्याने होणारा क्षमता विस्तार आणि विविध व्यवसायांमधील सुधारलेले रिअलायझेशन हे या सकारात्मक दृष्टिकोनामागील प्रमुख घटक आहेत. पोर्ट, वीज आणि इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रातील वाढती मागणी, वाढलेले वॉल्यूम आणि EBITDA मधील वाढ यामुळे दीर्घकालीन वाढीची संधी असल्याचे ब्रोकरेजचे मत आहे.

अदानी पोर्ट्स: टार्गेट १,९८० रुपये

Adani Ports and Special Economic Zone संदर्भात जेफरीजने टार्गेट प्राइस १,८२५ रुपयांवरून १,९८० रुपये केला आहे. मार्च तिमाहीत कंपनीचा EBITDA अंदाजापेक्षा सुमारे ९ टक्क्यांनी अधिक राहिला. देशांतर्गत पोर्ट रिअलायझेशनमध्ये वार्षिक आधारावर ९ टक्क्यांची वाढ झाली असून व्यवस्थापनाने आर्थिक वर्ष २०२७ पर्यंत EBITDA मध्ये ९ ते १४ टक्क्यांची वाढ अपेक्षित असल्याचे सांगितले आहे. नवीन टर्मिनल्समुळे वॉल्यूममध्ये वाढ होण्याची शक्यता असून आर्थिक वर्ष २०२६ ते २०३१ दरम्यान सुमारे १८ टक्के CAGR साध्य करण्याचे उद्दिष्ट आहे.

अदानी पॉवर: टार्गेट २२५ रुपये

Adani Power साठी टार्गेट प्राइस १८५ रुपयांवरून २५५ रुपये करण्यात आला आहे. आर्थिक वर्ष २०२६ ते २०२९ दरम्यान EBITDA मध्ये सुमारे २३ टक्के CAGR अपेक्षित आहे. कंपनीची उत्पादन क्षमता आर्थिक वर्ष २०३० पर्यंत दुप्पट होऊन ३०.७ गीगावॅटपर्यंत जाण्याची शक्यता आहे. मार्च तिमाहीतील EBITDA अंदाजापेक्षा सुमारे ७ टक्क्यांनी जास्त राहिला असून नव्या वीज खरेदी करारांमुळे पुढील काळात नफ्यात वाढ होण्याची अपेक्षा आहे. वीज मागणीत वाढ असूनही प्लांट लोड फॅक्टर सुमारे ७४ टक्क्यांवर स्थिर राहिला आहे.

अदानी एंटरप्रायझेस: टार्गेट २,८०० रुपये

Adani Enterprises साठी Jefferies ने टार्गेट प्राइस २,६०० रुपयांवरून २,८०० रुपये केला आहे. आर्थिक वर्ष २०२५ ते २०२८ दरम्यान EBITDA आणि PAT मध्ये सुमारे १४ टक्के CAGR अपेक्षित असून कंपनीच्या एकूण मूल्यांकनात एअरपोर्ट आणि ANIL व्यवसायाचा ७५ ते ८० टक्के वाटा राहणार आहे. मार्च तिमाहीत EBITDA सुमारे ४४.८ अब्ज रुपयांपर्यंत पोहोचला, जो वार्षिक आधारावर ३ ते ४ टक्क्यांनी जास्त आहे. एअरपोर्ट व्यवसायातील ७५ टक्क्यांची वाढ, ANIL मधील ६ टक्के वाढ आणि कॉपर विभागातील मजबूत कामगिरी यामुळे हा परिणाम साध्य झाला. कंपनीने आर्थिक वर्ष २०२७ पर्यंत ३० अब्ज रुपयांपेक्षा अधिक अतिरिक्त EBITDA मिळवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. नवी मुंबई विमानतळ, कच्छ कॉपर प्रकल्प आणि रस्ते प्रकल्पांच्या विस्तारातून ही वाढ साध्य होण्याची अपेक्षा आहे. यासाठी सुमारे ४०० अब्ज रुपयांचा भांडवली खर्च नियोजित करण्यात आला आहे.

(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

English
हिंदी सारांश
Web Title : Adani Group's Three Companies Soar: Brokerage Firm's Confidence Explained

Web Summary : Jefferies maintains 'Buy' rating for Adani Power, Ports, Enterprises, raising target prices. Strong operational performance, capacity expansion, improved realization drive optimism. Ports target ₹1,980, Power ₹255, Enterprises ₹2,800. Growth expected across sectors.
टॅग्स :अदानीस्टॉक मार्केटगुंतवणूक