Join us

७८ लाख कोटींचा चुराडा, बाजारातील घसरणीचा फटका; साडेचार महिन्यांत गुंतवणूकदारांच्या संपत्तीत घट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2025 08:49 IST

Share Market Loss: मागील काही दिवसांत बाजारात सुरू असलेला घसरणीचं सत्र थांबताना दिसत नाही. या घसरणीमुळे मागील साडेचार महिन्यांत  गुंतवणूकदारांचे ७८ लाख कोटी रुपये स्वाहा झाले आहेत.

Share Market Loss: मागील काही दिवसांत बाजारात सुरू असलेला घसरणीचं सत्र थांबताना दिसत नाही. या घसरणीमुळे मागील साडेचार महिन्यांत  गुंतवणूकदारांचे ७८ लाख कोटी रुपये स्वाहा झाले आहेत. या काळात मिडकॅप इंडेक्स १२ टक्के तर स्मॉल कॅप १५ टक्के इतका घसरलाय.

बाजारात सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल पहिल्यांदाच जून २०२४ नंतरच्या सर्वात नीचांकी आलं आहे. शुक्रवारी १४ फेब्रुवारी रोजी लिस्टेड कंपन्यांचं एकूण बाजार भांडवल ३९८ लाख कोटी रुपये इतके होतं. याचाच अर्थ या काळात गुंतवणूकदारांचे ७८ लाख कोटी रुपये बुडाले आहेत. बाजारातील आकडेवारीनुसार १० एप्रिल २०२४ मध्ये पहिल्यांदाच कंपन्यांच्या बाजार भांडवलानं ४०० लाख कोटींचा ऐतिहासिक टप्पा पार केला होता. २९ सप्टेंबर रोजी भांडवलाने ४७७.९३ लाख कोटी रुपयांचे शिखर गाठलं होतं.

मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकांमध्ये पडझड

या काळात मिडकॅप निर्देशांक १२% पर्यंत घसरला, तर स्मॉलकॅप निर्देशांक १५% पर्यंत घसरलाय. २०२५ मध्ये भारताच्या मार्केट कॅपमध्ये १८.३३% घट झाली. जागतिक स्तरावरील बाजारांच्या तुलनेत ही घसरण खूप अधिक आहे.

बाजारातील आगामी हालचाल जागतिक बाजारातील घडामोडी व विदेशी गुंतवणूकदार संस्थांच्या भूमिकेवर अवलंबून आहे. परकीय गुंतवणूकदारांचे पैसे काढून घेणे सुरूच आहे. कंपन्याचे कमकुवत तिमाही निकाल व जागतिक स्तरावर निर्माण झालेली ट्रेड वॉरची भीती यामुळे अस्थिरतेचे चित्र आहे. यात गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास कमी झालाय.

या अस्थिरतेमुळे परदेशी वित्तसंस्थांनी फेब्रुवारीच्या पहिल्या दोन आठवड्यांत बाजारातून २१,२७२ कोटी काढून घेतलेत. जानेवारी महिन्यातही गुंतवणूकदार संस्थांनी ७८,०२७ कोटींचे शेअर्स विकले होते. डिपॉझिटरीकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार चालू आर्थिक वर्षात विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी ९९,२९९ कोटी रुपये काढून घेतले.

आठ दिवसांच्या घसरणीला ब्रेक

सतत आठ सत्रांपासून सुरू असलेली बाजारातील घसरण सोमवारी थांबली, सेन्सेक्स ५८ अंकांनी सावरला. एचडीएफसी बँक आणि रिलायन्स इंडस्ट्रीज यांसारख्या प्रमुख शेअर्समध्ये झालेल्या खरेदीमुळे बाजारात सकारात्मकता दिसली. सेन्सेक्स ५७.६५ अंकांनी वाढून ७५,९९६ अंकांवर बंद झाला तर निफ्टी ३० अंकांनी वाढून २२,९५९.५० अंकांवर स्थिरावला. विश्लेषकांच्या मते, अमेरिका आणि भारत यांच्यात लवकरच व्यापारी करारावर चर्चा होण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूक