Join us

धनत्रयोदशी-दिवाळीपर्यंत कुठवर पोहोचणार सोन्याचा दर? आता आहे ₹१.१२ लाखांच्या पार, खरेदीपूर्वी पाहाच

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2025 10:25 IST

Gold Price Diwali: यावर्षी सोन्याच्या किमतीत झालेल्या प्रचंड वाढीमुळे जगभरात खळबळ उडाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याच्या किमती प्रति औंस ३६०० डॉलर्सपर्यंत पोहोचल्या आहेत.

Gold Price Diwali: यावर्षी सोन्याच्या किमतीत झालेल्या प्रचंड वाढीमुळे जगभरात खळबळ उडाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याच्या किमती प्रति औंस ३६०० डॉलर्सपर्यंत पोहोचल्या आहेत. गोल्डमन सॅक्सच्या रिपोर्टनुसार, जर ही वाढ अशीच राहिली तर पुढच्या वर्षी त्याच्या किमती ४५०० डॉलर्सपर्यंत पोहोचू शकतात. भारतात ही किंमत १.४५ लाखांच्या जवळपास असेल. यावर्षी दिवाळीलाच सोनं १.२५ लाखांच्या पातळीला पोहोचू शकतं असा अंदाजही तज्ज्ञांनी व्यक्त केलाय. गेल्या धनत्रयोदशीला सराफा बाजारात सोनं ७८,८४६ रुपये प्रति ग्रॅम दरानं उघडलं होतं.

या वर्षी ३५ टक्क्यांनी वाढ

जानेवारीपासून सोन्याच्या किमतीत ३५ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत प्रति औंस ३६०० डॉलर्सच्या जवळपास पोहोचली आहे. भारतातही ती १.१२ लाख रुपयांच्या पातळी ओलांडली आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार यावेळी सोन्याच्या किमती वाढण्यामागे केवळ महागाई किंवा सामान्य लोकांच्या खरेदीचं कारण नाही तर मोठी जागतिक कारणं आहेत. सध्याची परिस्थिती सांगते की सोन्याच्या किमतीत वाढ होण्याचा हा प्रवास जास्त काळ टिकू शकतो. यामुळे गुंतवणूकदार आणि ग्राहक दोघांचंही हित स्थिर राहिलं आहे.

शेअर बाजार सुस्साट, निफ्टी २५,००० च्या पार; IT-रियल्टी शेअर्समध्ये जोरदार तेजी

सोनं ही सर्वात सुरक्षित गुंतवणूक

इनव्हेस्टमेंट बँक गोल्डमन सॅक्सच्या अहवालात म्हटलंय की सध्याच्या जागतिक आर्थिक आणि राजकीय अनिश्चिततेमध्ये सोनं ही एक सुरक्षित गुंतवणूक आहे. यूएस फेडरल रिझर्व्हवर व्याजदर कमी करण्याचा दबाव आणि डॉलरवरील आत्मविश्वास कमी होणं यासारख्या परिस्थितीमुळे गुंतवणूकदारांनी यूएस ट्रेझरीमधून पैसे काढून सोन्यात गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केलंय. जर अमेरिकेच्या तिजोरीतून एक टक्काही पैसा सोन्यात गेला, तर मागणी वाढल्यानं सोन्याच्या किमतीत आणखी मोठी वाढ होऊ शकते.

सोनं १०० पटीनं महाग झालं

सध्या, सोनं चांदीच्या किमतीपेक्षा सुमारे १०० पटीनं जास्त दरानं व्यवहार करत आहे, जी एक असामान्य परिस्थिती आहे. यापूर्वी ही पातळी मार्च २०२० मध्ये, कोविड महासाथीच्या सुरुवातीच्या काळात दिसून आली होती. सामान्यतः सोनं चांदीपेक्षा ४० ते ६० पटीनं महाग असते, तर सध्या हे प्रमाण १०० पटीवर पोहोचलंय. बाजारातील तज्ज्ञांच्या मते, हे असंतुलन चांदी देखील वाढण्याची शक्यता असल्याचं दर्शवतो.

सोनं किती वाढू शकतं?

गोल्डमन सॅक्सच्या अहवालात म्हटलंय की जर जागतिक वातावरण अधिक अस्थिर झालं, तर सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याची मागणी आणि किंमत दोन्ही वाढू शकतात. यामुळे, पुढील वर्षाच्या मध्यापर्यंत सोने ४५००-५००० डॉलर्सच्या पातळीवर पोहोचू शकतं. हे सध्याच्या पातळीपेक्षा सुमारे ३० टक्के जास्त असेल. भारताच्या संदर्भात, याचा अर्थ असा की येत्या काळात, किमती ₹१,४५,००० ते ₹१,५५,००० पर्यंत पोहोचू शकतात.

टॅग्स :सोनंचांदीगुंतवणूक