Join us

जगातील सर्वात ‘पॉवरफुल’ व्यक्तीचे बंगळुरुमध्ये नवे ऑफिस; भाडे 400 कोटींपेक्षा जास्त..!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2025 13:26 IST

ही डील अलीकडच्या काळातील सर्वात मोठ्या करारांपैकी एक आहे.

बंगळुरू : जगातील सर्वात मोठी अ‍ॅसेट मॅनेजमेंट कंपनी ब्लॅकरॉकने भारतातील आपला व्यवसाय वाढवण्यासाठी मोठे पाऊल उचलले आहे. कंपनीच्या भारतीय शाखा ब्लॅकरॉक सर्व्हिसेस इंडियाने बंगळुरुच्या सेंट्रल बिझनेस डिस्ट्रिक्ट (CBD)मध्ये भाडेतत्वावर नवे ऑफिस घेतले आहे.

हे ऑफिस स्पेस कंपनीने 10 वर्षांच्या लीजवर घेतले आहे. हा करार तब्बल 410 कोटी रुपयांना झाला आहे. भारतातील फ्लेक्सिबल ऑफिस स्पेसच्या क्षेत्रात ही डील अलीकडच्या काळातील सर्वात मोठ्या करारांपैकी एक मानली आहे.

1.43 लाख चौरस फूटमध्ये पसरलेले ऑफिस

ब्लॅकरॉकचे हे नवे ऑफिस बंगळुरुच्या प्रसिद्ध एम.जी. रोडवरील IndiQube Symphony इमारतीत असेल. हे हाय-प्रोफाईल ऑफिस जवळपास 1.43 लाख चौ. फूट क्षेत्रफळावर पसरलेले आहे, ज्यात ग्राउंड प्लस 5 मजले आहेत. यासाठी ब्लॅकरॉक दरमहा सुमारे 2.72 कोटी रुपये भाडे भरणार आहे. कंपनीने 21.75 कोटी रुपयांचे सिक्युरिटी डिपॉझिटदेखील भरले आहे. याची लीज 1 ऑक्टोबर 2025 पासून लागू होईल. करारानुसार दरवर्षी 5% भाडेवाढ करण्यात येणार आहे.

इंडिक्यूबचा मेगा प्रोजेक्ट

हे ऑफिस IndiQube Symphony या इंडिक्यूबच्या मोठ्या प्रकल्पाचा भाग आहे. या प्रकल्पाअंतर्गत कंपनी बंगळुरूच्या CBD मध्ये तीन टॉवर्समध्ये मिळून सुमारे 3.2 लाख चौ. फूट क्षेत्र विकसित करत आहे. पुढील 15 वर्षांत संपूर्ण प्रकल्पाचे नूतनीकरण आणि अपग्रेड होणार आहे. या प्रकल्पाचा उद्देश मोठ्या एंटरप्राइझ क्लायंट्सना प्रीमियम मॅनेज्ड वर्कस्पेस उपलब्ध करून देणे आहे. सध्या इंडिक्यूबचे देशभरातील 15 शहरांत 115 ऑफिस सेंटर्स आहेत. एकूण 8.4 मिलियन चौ. फूट स्पेस आणि 1.86 लाखांहून अधिक सीट्स आहेत. केवळ बंगळुरुमध्येच इंडिक्यूबचे 65 सेंटर्स आणि 5.43 मिलियन चौ. फूट स्पेस आहे, जे त्यांचे सर्वात मोठे मार्केट आहे.

भारतात विस्तारावर लक्ष केंद्रित

ब्लॅकरॉकने भारतात प्रीमियम ऑफिस स्पेस घेण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी कंपनीने मुंबईच्या वरळी भागात 42,700 चौ. फूट ऑफिस स्पेस 5 वर्षांसाठी लीजवर घेतले होते. भारताचा वित्तीय आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील जलद विकास लक्षात घेऊन ब्लॅकरॉक सातत्याने आपली उपस्थिती वाढवत आहे.

ब्लॅकरॉक काय करते?

ब्लॅकरॉकचे सीईओ लॅरी फिंक हे जागतिक वित्तीय क्षेत्रातील सर्वात प्रभावशाली व्यक्तींपैकी एक मानले जातात. त्यांची कंपनी जगभरात तब्बल 10 ट्रिलियन डॉलर्सहून अधिक मालमत्ता व्यवस्थापित करते. त्यांच्या निर्णयांचा परिणाम फक्त शेअर बाजारावरच नव्हे, तर संपूर्ण ग्लोबल पॉलिसी आणि गुंतवणूक धोरणांवर होतो. त्यामुळे त्यांना अनेकदा "जगातील सर्वात शक्तिशाली व्यक्ती" असेही म्हटले जाते.

टॅग्स :गुंतवणूकअमेरिकाभारतबंगलोर सेंट्रलबेंगळूर