Join us

पंडीत नेहरुंचा JRD टाटांना फोन अन् अशी झाली Lakme ब्रँडची सुरुवात, जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2023 16:46 IST

Story of Lakme : लॅक्मे आज भारतील सर्वात लोकप्रिय कॉस्मेटिक ब्रँड आहे. याची सुरुवात JRD टाटांनी 1952 मध्ये केली होती.

नवी दिल्ली: भारतात महिलांसाठी लागणाऱ्या मेकअपची बाजारपेठ खूप मोठी आहे. आज या क्षेत्रात परदेशी कंपन्यांसह भारतीय कंपन्यांचाही बोलबाला आहे. पण एक काळ असा होता, जेव्हा या क्षेत्रात परदेशी कंपन्यांची मक्तेदारी होती. त्यावेळी कोणताही भारतीय मेकअप ब्रँड नव्हता. यानंतर 1952 मध्ये टाटा समूहाचे तत्कालीन प्रमुख जेआरडी टाटा यांनी ही मक्तेदारी मोडून काढली आणि टाटा समूहाद्वारे पहिला भारतीय मेकअप ब्रँड 'लॅक्मे कॉस्मेटिक्स' सुरू करण्यात आला. आज मेकअप आणि स्किन केअर क्षेत्रात एक आघाडीचा ब्रँड बनला आहे.

अशी झाली सुरुवातएका Instagram व्हिडिओमध्ये, उद्योजक आणि आर्टरी इंडियाचे सीईओ, अरविंद विजय मोहन यांनी लॅक्मे कॉस्मेटिक्सला नाव कसे मिळाले आणि त्या ब्रँडच्या निर्मितीमध्ये जेआरडी टाटा यांचे योगदान सांगितले आहे. ते म्हणाले, “जेआरडी टाटा यांनी टाटा समूहाची जबाबदारी घेऊन 12 वर्षे झाली होती. 1950 ची गोष्ट आहे. जेआरडी टाटांना पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा फोन आला. पंडित नेहरुंनी टाटांना सांगितले की, भारतीय स्त्रिया परदेशी कॉस्मेटीक्स खरेदी करत आहेत, यामुळे भारतीय पैसा परदेशात जात आहे.

लॅक्मे नाव कसे पडले?त्या काळात भारताचा स्वतःचा एकही मेकअप ब्रँड नव्हता. पंडित नेहरुंनी टाटांना कॉस्मेटीक्स ब्रँड स्थापन करण्यास सांगितले. यानंतर लगेच जेआरडी टाटा यांनी काम सुरू केले. खोबरेल तेलाच्या उत्पादनात गुंतलेल्या त्यांच्या एका कंपनीला त्यांनी या कामाची सुरुवात करण्यास सांगितले. या क्षेत्राचा अभ्यास करण्यासाठी टाटा समूहाने त्यांचे काही प्रतिनिधी पॅरिसला पाठवले. यावेळी टीमने फ्रेंच संगीतकार लिओ डेलिब्स यांचा कार्यक्रम पाहिला. हा एक ऑपेरा होता, ज्याच्या कथेतील मुख्य पात्र एक स्त्री होती. एक भारतीय स्त्री जिचे वडील पुजारी होते. ती मुलगी एका ब्रिटिश अधिकाऱ्यावर प्रेम करू लागते. नायिकेला देवी लक्ष्मीचे फ्रेंचमधील अनुवादित नाव देण्यात आले होते. लक्ष्मी ही शक्ती, समृद्धी आणि सौंदर्याची देवी मानली जाते. टाटा टीमने 'लॅक्मे' हे लक्ष्मीचे फ्रेंच भाषांतरीत नाव ऐकले आणि तेव्हाच ब्रँडचे नाव ठरले. 

लॅक्मे: रीइन्व्हेंट आता लॅक्मे हा केवळ कॉस्मेटिक ब्रँड नाही, तर तो एक फॅशन स्टेटमेंट बनला आहे. लॅक्मेची सुरुवात लहान होती, पण आज लॅक्मे हा भारतातील आघाडीचा कॉस्मेटिक ब्रँड बनला आहे. 1998 मध्ये टाटांनी त्यांचे लॅक्मेचे शेअर्स हिंदुस्तान युनिलिव्हरला सुमारे 200 कोटींना विकले. लॅक्मे ग्राहकांच्या विस्तृत श्रेणीची पूर्तता करते. मेकअप प्रोडक्ट्ससोबतच लॅक्मे स्किन केअर प्रोडक्ट्स देखील बनवते. यासोबतच 2018 मध्ये लॅक्मेने आपली ई-कॉमर्स वेबसाइटही लॉन्च केली. देशभरात सुमारे 500 लॅक्मे सलून चालतात. यासोबतच ही कंपनी लॅक्मे फॅशन वीकची टायटल स्पॉन्सर देखील आहे. 

टॅग्स :व्यवसायटाटाजवाहरलाल नेहरूगुंतवणूक