Join us

Sovereign Gold Bond च्या गुंतवणूकदारांना लागला जॅकपॉट; ३ पट वाढली किंमत, जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2025 15:13 IST

Sovereign Gold Bond: सॉवरेन गोल्ड बाँड मधील गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा मिळाला आहे. मार्च २०१७ मध्ये या बाँडच्या इश्यू पीरिअड दरम्यान २,९४३ रुपये प्रति ग्रॅम दरानं सोनं खरेदी केलं होतं.

Sovereign Gold Bond : सॉवरेन गोल्ड बाँड (Sovereign Gold Bond, SGB) २०१६-१७ सीरिज ४ मधील गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा मिळाला आहे. मार्च २०१७ मध्ये या बाँडच्या इश्यू पीरिअड दरम्यान २,९४३ रुपये प्रति ग्रॅम दरानं खरेदी केलेलं सोनं आता ८,६२४ रुपये प्रति ग्रॅम झालंय. म्हणजेच या गुंतवणूकदारांना ३ पट जास्त परतावा मिळाला आहे, ज्यात १९३% जबरदस्त वाढ दिसून येते.

या हप्त्याची अंतिम परतफेड तारीख १७ मार्च २०२५ निश्चित करण्यात आली आहे. एसजीबीची रिडेम्प्शन किंमत इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशननं (IBJA) जाहीर केलेल्या ९९९ शुद्धतेच्या सोन्याच्या सरासरी बंद किंमतीवर आधारित असेल, जी रिडेम्प्शन तारखेच्या आधीच्या आठवड्यासाठी (१०-१३ मार्च २०२५) निश्चित केली जाईल. याव्यतिरिक्त, एसजीबी २०१९-२० सीरिज ४ साठी लवकर रिडेम्प्शनचा पर्याय देखील खुला असेल. या बाँडची इश्यू डेट १७ सप्टेंबर २०१९ होती.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं (RBI) आपल्या घोषणेत म्हटल्याप्रमाणे या बॉन्ड्सची मुदतपूर्व परतफेड करण्याची अंतिम तारीख १७ मार्च २०२५ असेल. ११, १२ आणि १३ मार्च २०२५ रोजी सोन्याच्या सरासरी बंद किंमतीच्या आधारे यासाठी रिडेम्प्शन किंमत ८,६३४ रुपये प्रति ग्रॅम निश्चित करण्यात आलीये.

एसजीबी फायदेशीर का आहे?

सॉवरेन गोल्ड बाँड हे आरबीआयच्या माध्यमातून भारत सरकारनं जारी केलेले सरकारी बाँड्स आहेत, जे प्रति ग्रॅमनुसार खरेदी केले जातात. मुदतपूर्तीनंतर, ते रोखीनं परत केले जातात आणि त्यांच्याकडे सॉवरेन हमी असते, जेणेकरून गुंतवणूकदार कोणत्याही प्रकारचे डिफॉल्ट जोखीम घेऊ शकणार नाहीत.आर्थिक तज्ज्ञ जितेंद्र सोळंकी यांच्या मते, एसजीबी २.५% निश्चित वार्षिक व्याज देते, ज्यामुळे ते इतर सोन्याच्या गुंतवणुकीपेक्षा वेगळे होते. तसंच गुंतवणूकदारानं ८ वर्षे ते ठेवल्यास त्याला कॅपिटल गेन टॅक्स (Capital Gains Tax) भरावा लागत नाही.

२०१५-१६ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात एसजीबी योजना सुरू करण्यात आली होती. सोन्याच्या दरात सातत्यानं वाढ होत आहे. शुक्रवारी सोन्यानं ८८,३१० रुपये प्रति १० ग्रॅमचा उच्चांक गाठला, तर आंतरराष्ट्रीय बाजारात त्यानं ३,००० डॉलर प्रति ट्रॉय औंसची पातळी ओलांडली. या वर्षी आतापर्यंत एमसीएक्सवर सोनं १४ टक्के म्हणजे सुमारे ११,००० रुपयांनी वधारलं आहे.

टॅग्स :सोनंसरकार