Penalty if miss SIP Payment : गेल्या काही वर्षात सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP) द्वारे म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याचा ट्रेंड वाढत आहे. यात दरमहा ठराविक रक्कम तुमच्या बँक खात्यातून आपोआप कापली जाते (ऑटो डेबिट). पण, जर तुमच्या बँक खात्यात पुरेसे पैसे नसतील आणि SIP ची रक्कम कापली गेली नाही, तर तुम्हाला मोठा दंड लागू शकतो. असाच एक अनुभव एका Reddit वापरकर्त्याने (complex_nutmeg69420) शेअर केला आहे, जिथे त्यांच्या वडिलांना ५९० रुपये दंड भरावा लागला.
नेमके काय घडले?Reddit वापरकर्त्याने सांगितले की, त्यांच्या वडिलांच्या ICICI बँक खात्यातून म्युच्युअल फंड SIP साठी ऑटो डेबिट होते. पण, ३१ जुलै रोजी त्यांच्या दुसऱ्या बँकेचा सर्व्हर डाउन झाल्यामुळे, ICICI बँकेत पैसे वेळेवर पोहोचले नाहीत. त्यामुळे, खात्यात पुरेशी रक्कम नसल्याने SIP ची रक्कम कापली गेली नाही आणि ICICI बँकेने ५९० रुपये दंड आकारला. हा दंड माफ करण्यासाठी त्यांनी बँकेला ईमेल पाठवला आहे.
लहान गुंतवणूकदारांवर वाईट परिणामअनेकदा असे घडते की, लोक दरमहा ५०० रुपये किंवा त्याहून कमी रक्कम SIP मध्ये गुंतवतात. अशावेळी, जर त्यांचे एक पेमेंट बाउंस झाले, तर त्यांना त्यांच्या मासिक हप्त्यापेक्षा जास्त दंड भरावा लागतो. हम फौजी इनिशिएटिव्हजचे सीईओ संजीव गोविला यांच्या मते, दंडाची रक्कम मूळ रकमेपेक्षा जास्त असणे हे लहान गुंतवणूकदारांसाठी खूपच वाईट आहे आणि याचा त्यांच्यावर नकारात्मक परिणाम होतो.
दंड का लावला जातो?ऑटो डेबिट रिक्वेस्ट अयशस्वी झाल्यास बँका दंड आकारतात. ऑटो डेबिट रिक्वेस्ट म्हणजे तुमच्या बँक खात्यातून म्युच्युअल फंड SIP, विमा प्रीमियम किंवा कर्ज EMI सारख्या गोष्टींसाठी एक विशिष्ट रक्कम आपोआप कापली जाण्याची विनंती. नॅशनल ऑटोमेटेड क्लिअरिंग हाऊस (NACH) आणि NPCI चे UPI AutoPay यांसारख्या सिस्टिम या ऑटो डेबिट रिक्वेस्टसाठी काम करतात. जर तुमच्या बँक खात्यात ऑटो-पे (स्थायी विनंती) पूर्ण करण्यासाठी पुरेसे पैसे नसतील, तर बँक तुमच्याकडून दंड आकारते.
त्यामुळे, SIP किंवा इतर कोणत्याही ऑटो डेबिटसाठी तुमच्या बँक खात्यात नेहमी पुरेशी रक्कम असल्याची खात्री करा, जेणेकरून तुम्हाला अनावश्यक दंडाचा सामना करावा लागणार नाही.