Join us

शेअर मार्केटपेक्षा जास्त परतावा देणारी सरकारी योजना बंद होणार? स्वस्तात विकत होती सोने

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2025 12:34 IST

sgb scheme : एसजीबी ​​योजना सरकारने नोव्हेंबर २०१५ मध्ये सुरू केली होती. या योजनेअंतर्गत सरकार लोकांना बाजारापेक्षा कमी किमतीत सोन्यात गुंतवणूक करण्याचा पर्याय देते.

sgb scheme : सोने खरेदी करण्याचे स्वप्न आता सामान्यांच्या आवक्याबाहेर जाणार असल्याचे चित्र आहे. कारण, एकीकडे मौल्यवान धातूच्या किमती वाढतच आहेत. तर दुसरीकडे स्वस्तात सोने विकणारी सरकारी योजना बंद करण्यात येण्याची शक्यता आहे. आम्ही सॉवेरन गोल्ड बॉन्ड योजनेबद्दल बोलत आहोत. स्वतः अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी त्यासंबंधीचे संकेत दिले आहेत. शनिवारी अर्थसंकल्पानंतर माध्यम प्रतिनिधींशी बोलताना आम्ही सॉवेरन गोल्ड बॉन्ड बंद करण्याच्या मार्गावर आहोत, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. ही योजना बंद झाल्यास सर्वसामान्यांचे स्वस्तात सोने घेण्याचे स्वप्न स्वप्नच राहील, असं दिसत आहे.

सॉवेरन गोल्ड बॉन्ड योजनेबद्दल अर्थमंत्री काय म्हणाल्या?सरकार सार्वभौम सुवर्ण रोखे योजना बंद करणार का? या प्रश्नाला उत्तर देताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. सीतारामन म्हणाल्या की, होय, आम्ही सार्वभौम सुवर्ण रोखे योजना बंद करण्याच्या मार्गावर आहोत. केंद्रीय अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या. मात्र, सॉवेरन गोल्ड बॉन्ड योजनेबद्दल कोणतीही चर्चा झाली नाही.

सॉवेरन गोल्ड बॉन्ड योजना का बंद केली जातेय?गेल्या काही वर्षात सोन्याच्या किमतीने मोठी झेप घेतली आहे. परिणामी गोल्ड बॉन्ड योजना सरकारसाठी खूप महागडे कर्ज घेणारी ठरत आहे. यासाठी मोठा निधी खर्च करावा लागत आहे. त्यामुळे आता या अंतर्गत पुढील हप्ते न देण्याचा निर्णय सरकारने घेतला असल्याचे आर्थिक व्यवहार विभागाचे सचिव अजय सेठ यांनी सांगितले.

सॉवेरन गोल्ड बॉन्ड योजना नेमकी काय आहे?मोदी सरकारने २०२५ मध्ये सार्वभौम सुवर्ण रोखे योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत सरकार लोकांना बाजारापेक्षा कमी किमतीत सोन्यात गुंतवणूक करण्याचा पर्याय देते. याशिवाय ऑनलाइन शॉपिंगवर ५० रुपये प्रति ग्रॅमची सूटही उपलब्ध आहे. तसेच २.५ टक्के निश्चित व्याजही दिले जाते. या योजनेअंतर्गत कुटुंबातील प्रत्येक सदस्य जास्तीत जास्त ४ किलो सोने खरेदी करू शकतो. सार्वभौम गोल्ड बाँड योजना ८ वर्षांमध्ये  परिपक्व होते.

पहिल्या हप्त्यावर दुप्पट नफा२०१५ मध्ये पहिल्यांदा जेव्हा सार्वभौम गोल्ड बाँड योजना सादर करण्यात आली. तेव्हा त्याची इश्यू किंमत २,६८४ रुपये प्रति ग्रॅम निश्चित करण्यात आली होती. त्यावेळी ९९.९९ शुद्धतेच्या सोन्याच्या जारी केलेल्या किमतींच्या एका आठवड्याच्या सरासरीनुसार इश्यू किंमत ठरवण्यात आली होती. त्याची परिपक्वता २०२३ मध्ये पूर्ण झाली. त्यावेळी सोन्याची किंमत ६,१३२ रुपये प्रति ग्रॅम निश्चित करण्यात आली. म्हणजेच आठ वर्षांत गुंतवणूकदारांनी १२८.५ टक्के नफा कमावला आहे.

टॅग्स :सोनंसरकारी योजनागुंतवणूकनिर्मला सीतारामन