investment tips : 'रिच डॅड पुअर डॅड' (Rich Dad Poor Dad) या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक रॉबर्ट कियोसाकी यांनी जगाला एक मोठा इशारा दिला आहे. त्यांच्या मते, सध्याची जागतिक आर्थिक परिस्थिती आणि अमेरिकेच्या कमकुवत आर्थिक व्यवस्थेमुळे सोने, चांदी आणि बिटकॉइन यांसारख्या मालमत्तांच्या किमती प्रचंड वाढू शकतात. कियोसाकींनी नुकतेच 'X' (पूर्वीचे ट्विटर) वर पोस्ट करत म्हटले आहे की, सोने २५,००० डॉलर (सुमारे ₹२,०८७,५००) पर्यंत, चांदी ७० डॉलरपर्यंत आणि बिटकॉइन ५००,००० ते १० लाख डॉलर (सुमारे ₹४ कोटी ते ₹८ कोटी) पर्यंत पोहोचेल.
अमेरिकेच्या आर्थिक स्थितीबद्दल चिंताकियोसाकी यांनी जागतिक अर्थव्यवस्थेतील अति महागाई, बाँड मार्केटमधील संकट आणि एकूणच जागतिक वाढीबद्दलची अनिश्चितता यावर चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी एका ट्विटमध्ये म्हटले, "जर तुम्ही पार्टी दिली आणि कोणीही आले नाही तर?" हे विधान त्यांनी अमेरिकेच्या २० वर्षांच्या बाँडच्या लिलावाबद्दल केले होते, ज्याला गुंतवणूकदारांकडून फारच कमी मागणी मिळाली. अमेरिकन ट्रेझरी १६ अब्ज डॉलर्सच्या बाँड विक्रीत खरेदीदार शोधण्यात अयशस्वी ठरली, ज्यामुळे अमेरिकेच्या वाढत्या राष्ट्रीय कर्जाबद्दल आणि आर्थिक अस्थिरतेबद्दल चिंता वाढली.
कियोसाकी पुढे म्हणाले, "फेडने अमेरिकन बाँडचा लिलाव केला, आणि कोणीही आले नाही. म्हणून फेडने स्वतःच्या बनावट पैशांनी ५० अब्ज डॉलर खरेदी केले." हे त्यांनी आर्थिक अस्थिरतेचे मोठे लक्षण मानले आहे.
अमेरिका एका 'निष्काळजी वडिलांसारखी'रॉबर्ट कियोसाकी यांची ही प्रतिक्रिया अशा वेळी आली आहे, जेव्हा मूडीजसह (Moody's) फिच रेटिंग्ज (Fitch Ratings) आणि स्टँडर्ड अँड पूअर्स (Standard & Poor's) यांसारख्या जागतिक रेटिंग एजन्सींनी अमेरिकेचे क्रेडिट रेटिंग कमी केले आहे. त्यांनी असा इशारा दिला आहे की, अशा क्रेडिट डाउनग्रेडमुळे व्याजदर वाढू शकतात, ज्यामुळे अमेरिकन अर्थव्यवस्था मोठ्या मंदीच्या खाईत ढकलली जाऊ शकते. यामुळे बेरोजगारी, बँकांचे अपयश, गृहनिर्माण संकट आणि १९२९ च्या महामंदीसारखी गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते.
वाचा - गुगल-मायक्रोसॉफ्टनंतर 'ही' कंपनी १५०० कर्मचाऱ्यांना काढणार! तुमची नोकरी सुरक्षित आहे का?
आर्थिक स्वावलंबनाचा सल्लाअलिकडच्या अमेरिकन बाँड लिलावात गुंतवणूकदारांचा कमी रस असल्याने या चिंता आणखी वाढल्या आहेत. कियोसाकी यांनी लोकांना पुन्हा एकदा आर्थिक स्वावलंबन आणि स्वतंत्र विचारसरणी स्वीकारण्याचा सल्ला दिला आहे. त्यांनी म्हटले आहे की, लोकांनी उद्योजक बनले पाहिजे, जरी तो एक साईड बिझनेस म्हणून असला तरी. नोकरीच्या सुरक्षिततेवर अवलंबून राहू नका. कियोसाकींच्या मते, लोकांनी उत्पन्न देणाऱ्या मालमत्तांमध्ये, सोने-चांदीसारख्या मौल्यवान धातूंमध्ये आणि आता बिटकॉइनमध्ये गुंतवणूक करावी.