Provident Fund: नोकरी करणाऱ्या बहुतांश कर्मचाऱ्यांच्या पगारातून दर महिन्याला PF (Provident Fund) कापला जातो. मात्र, अनेकांना हा पैसा नेमका कुठे जातो, त्यावर किती व्याज मिळते आणि निवृत्तीनंतर किती मोठा फंड तयार होऊ शकतो, याची पुरेशी माहितीच नसते.
प्रत्यक्षात PF ही फक्त बचत योजना नसून, भविष्यातील आर्थिक सुरक्षिततेचा महत्त्वाचा आधार मानली जाते. EPF आणि EPS या दोन योजनांच्या माध्यमातून कर्मचारी निवृत्तीनंतर मोठा फंड आणि मासिक पेन्शन दोन्ही मिळवू शकतात.
EPF आणि EPS म्हणजे काय?
PF प्रामुख्याने दोन भागांमध्ये विभागलेला असतो :
१. EPF (Employee Provident Fund)
ही दीर्घकालीन बचत योजना आहे. यामध्ये कर्मचारी आणि कंपनी दोघेही योगदान देतात. जमा झालेल्या रकमेवर दरवर्षी व्याज मिळते आणि दीर्घकाळात मोठा निवृत्ती निधी तयार होतो. सध्या EPF वर सुमारे ८.२५ टक्के वार्षिक व्याजदर मिळत आहे.
२. EPS (Employee Pension Scheme)
ही निवृत्तीनंतर मासिक पेन्शन देण्यासाठी तयार करण्यात आलेली योजना आहे. यात वेगळा बचत निधी जमा होत नाही, तर ठराविक सूत्रानुसार निवृत्तीनंतर पेन्शन दिली जाते.
पगारातून किती रक्कम कापली जाते?
कर्मचाऱ्याच्या बेसिक पगाराच्या १२ टक्के रक्कम EPF मध्ये जमा होते. कंपनीकडूनही तितकेच योगदान दिले जाते. मात्र, कंपनीचे संपूर्ण १२ टक्के EPF मध्ये जात नाही.
योगदानाचे गणित :
कर्मचाऱ्याचे १२% : पूर्ण EPF मध्ये
कंपनीचे १२% :
८.३३% EPS मध्ये
उर्वरित ३.६७% EPF मध्ये
EPS मध्ये जाणाऱ्या रकमेची मर्यादा साधारण ₹१,२५० प्रति महिना इतकी निश्चित करण्यात आलेली आहे.
EPF मधून कोट्यवधींचा फंड कसा तयार होतो?
EPF ची सर्वात मोठी ताकद म्हणजे ‘कंपाउंडिंग’. दीर्घकाळ सातत्याने गुंतवणूक आणि त्यावर मिळणारे व्याज यामुळे फंड झपाट्याने वाढतो. तज्ज्ञांच्या मते एखाद्या कर्मचाऱ्याने ३० ते ३५ वर्षे सातत्याने नोकरी केली आणि मधल्या काळात PF काढला नाही, तर निवृत्तीच्या वेळी ₹२ कोटी ते ₹३.५ कोटींपर्यंत किंवा त्याहून अधिक फंड तयार होऊ शकतो मात्र, अनेक कर्मचारी नोकरी बदलताना PF काढून घेतात. त्यामुळे कंपाउंडिंगचा फायदा कमी होतो आणि अंतिम फंडही लहान राहतो.
EPS मधून किती पेन्शन मिळते?
EPS अंतर्गत पेन्शन ठराविक सूत्रानुसार मोजली जाते. यामध्ये वेतनाची कमाल मर्यादा ₹१५,००० धरली जाते. त्यामुळे दीर्घकाळ सेवा करूनही बहुतांश कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर साधारण: ₹८,००० ते ₹९,००० प्रति महिना पेन्शन मिळते. सध्या EPS अंतर्गत किमान पेन्शन ₹१,००० आहे. ती वाढवून ₹३,००० करण्याबाबत चर्चा सुरू असल्याची माहिती आहे.
पेन्शन मिळण्यासाठी कोणत्या अटी?
EPS चा लाभ घेण्यासाठी काही अटी पूर्ण करणे आवश्यक असते. किमान १० वर्षांची नोकरी आवश्यक असून, ५८ वर्षांनंतरच पूर्ण पेन्शन मिळते. ५० वर्षांनंतर कमी रकमेची पेन्शन सुरू करता येते.
आर्थिक नियोजनासाठी PF का महत्त्वाचा?
तज्ज्ञांच्या मते, PF हा केवळ पगारातून होणारा कपात भाग नसून दीर्घकालीन संपत्ती निर्माण करणारा प्रभावी पर्याय आहे. नियमित योगदान, व्याज आणि कंपाउंडिंगच्या जोरावर PF भविष्यात मोठा आर्थिक आधार ठरू शकतो. विशेषतः निवृत्तीनंतर आर्थिक स्थैर्य टिकवण्यासाठी EPF आणि EPS या दोन्ही योजनांची भूमिका अत्यंत महत्त्वाची मानली जाते.
Web Summary : PF deductions ensure financial security post-retirement. EPF yields significant returns via compounding. EPS provides monthly pension, capped but vital. Consistent contributions are key.
Web Summary : पीएफ कटौती सेवानिवृत्ति के बाद वित्तीय सुरक्षा सुनिश्चित करती है। ईपीएफ चक्रवृद्धि के माध्यम से महत्वपूर्ण रिटर्न देता है। ईपीएस मासिक पेंशन प्रदान करता है, जो सीमित है लेकिन महत्वपूर्ण है। लगातार योगदान जरूरी हैं।