Join us

मुंबईतील सर्वात महाग जमीन? नोंदणीसाठी तब्बल २७ कोटी खर्च, भूखंडाची किंमत काय असेल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2024 12:13 IST

Mumbai Most Expensive Land: मुंबईच्या प्रॉपर्टी मार्केटमध्ये सर्वाधिक मागणी असलेल्या जुहू परिसरातील एका जमिनीचा सौदा करण्यात आला आहे. यासाठी नोंदणीसाठी २७ कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्क भरले आहेत.

Land Deal in Mumbai : ड्रिम सिटी, मायानगरी, आर्थिक राजधानी.. मुंबईला अशी कितीतरी नावे आहेत. देशातील सेलिब्रिटींपासून उद्योगपतींपर्यंत असंख्य लोकांचं वास्तव्य इथं आहे. यावरुन या शहराचं महत्त्व अधोरेखित होते. अशा परिस्थितीत या महानगरात घर बांधणे आणि जमीन खरेदी करणे म्हणजे स्वप्नच आहे. कारण, येथील प्रॉपर्टीचे दर कुठल्याही शहरापेक्षा सर्वाधिक आहेत. मुंबईत महागड्या अपार्टमेंटच्या बातम्या अनेकदा तुम्हीही वाचल्या असतील. मात्र, यावेळी एका भूखंडाची बातमी व्हायरल होत आहे. या मालमत्तेच्या नोंदणीसाठी तब्बल २७ कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्क भरले आहे. यावरुन या जमिनीच्या मूल्याचा अंदाज लावला जाऊ शकतो.

या भूखंडाचा व्यवहार ४५५ कोटी रुपयांना झाला आहे. स्क्वेअर यार्ड्सनुसार, अग्रवाल होल्डिंग्स प्रायव्हेट लिमिटेडने मुंबईतील अत्यंत मागणी असलेल्या जुहू भागात ४५५ कोटी रुपयांची जमीन विकत घेतली आहे. हा भूखंड शापूरजी पालोनजी ग्वाल्हेर प्रायव्हेट लिमिटेडकडून घेतला होता.

प्लॉटचा आकार किती आहे?या भूखंडाच्या नोंदणीचे दस्तऐवज पाहिल्यानंतर स्क्वेअर यार्ड्सने सांगितले की, हा भूखंड अंदाजे १,८१९.९० स्क्वेअर मीटर (१९,५८९.२२ स्क्वेअर फूट) परिसरात पसरलेले आहे. नोव्हेंबर २०२४ मध्ये नोंदणी झाल्यानंतर जमिनीचा हा व्यवहार अंतिम झाला. या भूखंडाच्या नोंदणीसाठी २७.३० कोटी रुपये मुद्रांक शुल्क आणि ३० हजार रुपये नोंदणी शुल्क आकारण्यात आले आहे.

तत्पूर्वी, अग्रवाल होल्डिंग्सने सप्टेंबर २०२२ मध्ये जुहू येथे अंदाजे एक एकर आणि तीन-चथुर्तांश एकर क्षेत्रफळाच्या २ भूखंड एकूण ३२२.८ कोटी रुपयांच्या मोबदल्यात विकत घेतल्या होत्या. कॅपिटल मार्केट्स अँड सर्व्हिसेस, स्क्वेअर यार्ड्सचे संस्थापक आनंद मूर्ती म्हणाले, "मुंबई ही देशाची व्यावसायिक राजधानी आहे आणि एक प्रमुख व्यवसाय केंद्र आहे, त्यामुळे येथील मालमत्तेच्या किमती खूप जास्त आहेत."

मुंबईतील सर्वात महाग परिसर कोणता?वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स आणि दक्षिण आणि पश्चिम मुंबईतील अनेक ठिकाणांना मुंबईत सर्वाधिक मागणी आहे. त्याचवेळी, जुहू आणि वांद्रे हे सी फेसिंग आणि लक्झरी गृहनिर्माण प्रकल्पांमुळे गुंतवणुकीसाठी नेहमीच आकर्षणाचे केंद्र राहिले आहेत. अलिकडच्या वर्षांत अनेक अब्जाधीश उद्योगपतींनी मुंबईत अपार्टमेंटसाठी मोठे सौदे केले आहेत.

टॅग्स :मुंबईगुंतवणूकपैसा