Senior Citizen FD: आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी सादर करण्यात आलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात केंद्र सरकारनं आयकर सवलतीसह अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत, ज्याचा थेट फायदा सर्वसामान्यांना होणारे. ज्येष्ठ नागरिकांना बँकेच्या एफडीवर मिळणाऱ्या व्याजावरील टीडीएस सरकारनं दुप्पट केल्यानं त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या या निर्णयामुळे ज्येष्ठ नागरिक योजना आणि बँक एफडीच्या माध्यमातून मिळणारं उत्पन्न दुप्पट होणारे.
दुप्पट केली मर्यादा
केंद्र सरकारनं ज्येष्ठ नागरिकांसाठी एफडी व्याजावरील टीडीएस कपातीची मर्यादा दुप्पट केली आहे. पूर्वी ती ५० हजार रुपये होती, ती आता १ लाख रुपये करण्यात आलीये. म्हणजेच व्याजातून एक लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर टीडीएस भरावा लागणार नाही. ही नवी मर्यादा १ एप्रिल २०२५-२६ पासून लागू होणार आहे. वास्तविक, बँका ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या एफडी योजनांवर सामान्य व्याजदरापेक्षा ०.५० टक्के अधिक व्याज देतात. अशा परिस्थितीत त्यांच्या कमाईत वाढ होईल. त्याचबरोबर पोस्ट ऑफिस ज्येष्ठ नागरिक बचत योजनेसारख्या लोकप्रिय योजनांमधील गुंतवणूक वाढण्याची शक्यता आहे.
सध्या ज्येष्ठ नागरिकांना बँक एफडीतून मिळणारं व्याज ५० हजार रुपयांपेक्षा अधिक असल्यास १० टक्के टीडीएस भरावा लागतो. तर १ एप्रिल २०२५ पासून १ लाख रुपयांपेक्षा जास्त व्याज उत्पन्नावर १०% टीडीएस भरावा लागेल.
सर्वसामान्यांनाही दिलासा
सर्वसामान्य नागरिकांसाठी व्याज उत्पन्नावरील टीडीएस कपातीची मर्यादाही वाढवण्यात आली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात बिगर ज्येष्ठ नागरिकांसाठी एफडीवरील व्याजावरील टीडीएसची मर्यादा ५०,००० रुपये करण्यात आल्याचं म्हटलं होतं. जर तुमचं वार्षिक उत्पन्न करपात्र उत्पन्नापेक्षा कमी असेल तर तुम्ही तुमच्या इन्कम टॅक्स रिटर्नमध्ये टीडीएसचा दावा करू शकता.
डिविडेंडवरील टीडीएसही दुप्पट
त्याचबरोबर डिविडेंडच्या उत्पन्नावरील टीडीएस कपातीची मर्यादाही सरकारनं वाढवली आहे. यापूर्वी ही मर्यादा ५००० रुपये होती, तर अर्थसंकल्प २०२५ मध्ये ती वाढवून १० हजार रुपये करण्यात आली. याचा फायदा किरकोळ गुंतवणूकदारांना होण्याची शक्यता आहे.