Join us
Daily Top 2Weekly Top 5

श्रीराम फायनान्समध्ये जपानी बँकेची मोठी गुंतवणूक; २०% साठी मोजले तब्बल ₹३९,६१८ कोटी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2026 20:12 IST

बँकेने प्रति शेअर ₹८४०.९३ दराने सुमारे ४७.११ कोटी शेअर्स खरेदी केले आहेत.

जपानमधील अग्रगण्य MUFG Bank ने भारतातील आघाडीची फायनान्स कंपनी, श्रीराम फायनान्स लिमिटेड (SFL) मध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. जपानी बँकेने २०% हिस्सेदारीसाठी तब्बल ₹३९,६१८ कोटी रुपये मोजले आहेत. या व्यवहारामुळे भारताच्या वित्तीय क्षेत्रात दोन देशांदरम्यान झालेल्या गुंतवणुकांमध्ये हा आतापर्यंतचा सर्वात मोठा व्यवहार ठरला आहे.

‘प्रिफरेंशियल इश्यू’द्वारे व्यवहार

कंपनीच्या माहितीनुसार, संचालक मंडळाने ‘प्रिफरेंशियल इश्यू’द्वारे MUFG बँकेला इक्विटी शेअर्स वाटप करण्यास मंजुरी दिली. या प्रक्रियेत निवडक गुंतवणूकदारांना थेट शेअर्स जारी केले जातात. MUFG बँकेने प्रति शेअर ₹८४०.९३ दराने सुमारे ४७.११ कोटी शेअर्स खरेदी केले आहेत. हा व्यवहार भारतीय स्पर्धा आयोगासह सर्व आवश्यक नियामक मंजुरीनंतर पूर्ण करण्यात आला आहे.

दीर्घकालीन धोरणात्मक भागीदारी

Mitsubishi UFJ Financial Group (MUFG) ने यापूर्वी डिसेंबरमध्ये या गुंतवणुकीसाठी करार केला होता, जो आता पूर्णत्वास गेला आहे. शेअर्स वाटपानंतर MUFG बँकेकडे श्रीराम फायनान्समध्ये पूर्णपणे डायल्यूटेड आधारावर २०% इक्विटी हिस्सेदारी असेल. या गुंतवणुकीमुळे भारतातील MUFG ची उपस्थिती अधिक मजबूत होणार आहे.

कॅपिटल बेस मजबूत होणार

SFL चे एक्झिक्युटिव्ह व्हाइस चेअरमन उमेश रेवनकर यांनी सांगितले की, या भागीदारीमुळे, इनोव्हेशनला चालना मिळेल, स्वस्त आणि विविध फंडिंग स्रोत उपलब्ध होतील, रिस्क मॅनेजमेंट आणि गव्हर्नन्समध्ये जागतिक दर्जाचे मानदंड लागू करता येतील, तसेच कंपनीचा कॅपिटल बेस लक्षणीय मजबूत होईल.

MUFG कडून भारतावर विश्वास

MUFG चे अध्यक्ष आणि ग्रुप CEO जुनिची हांझावा यांनी SFL ला मजबूत व्यवसाय पाया असलेली अग्रगण्य वित्तीय संस्था म्हटले. तसेच MSME आणि रिटेल क्षेत्रात मोठ्या वाढीच्या संधी असल्याचे त्यांनी नमूद केले. दरम्यान, MUFG आणि श्रीराम फायनान्स यांच्यातील हा करार दीर्घकालीन धोरणात्मक भागीदारीचा पाया मजबूत करणारा आहे. यामुळे भारतातील NBFC क्षेत्राला चालना मिळण्यासोबतच जागतिक वित्तीय सहकार्यालाही नवे बळ मिळणार आहे.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Japan's MUFG Bank Invests Big in Shriram Finance for 20%

Web Summary : MUFG Bank invested ₹39,618 crore for 20% stake in Shriram Finance, marking a major India-Japan financial collaboration. This boosts SFL's capital and supports MSME growth.
टॅग्स :जपानभारतबँकिंग क्षेत्रगुंतवणूक