Join us

आरडीमध्ये पैसे गुंतवावे की म्युच्युअल फंडमध्ये एसआयपी करावं? निर्णय घेता येईना? तज्ञांचे मत जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2024 15:23 IST

investment tips : पैसे गुंतवण्यासाठी आरडी आणि म्युच्युअल फंड एसआयपी मधील निवड करताना गुंतवणूकदार गोंधळून जातात. म्युच्युअल फंड आणि आरडी या दोन्हीमध्ये एसआयपीद्वारे गुंतवणूक केली जाऊ शकते. परंतु, तरीही या २ गुंतवणूक योजनांमध्ये मोठा फरक आहे.

investment tips : अवघ्या ५ दिवसांत नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे. २०२५ मध्ये तुम्ही अनेक ध्येय निश्चित केली असतील. त्यामुळे आर्थिक गुंतवणुकीचाही समावेश असेल. सध्या बाजारात अनेक प्रकारचे गुंतवणूक पर्याय आहेत. मात्र, आपल्यासाठी योग्य कोणता हे निवडताना अनेकांचा गोंधळ होतो. आरडी आणि म्युच्युअल फंड याबाबतही अनेकांना निर्णय घेता येत नाही. तुम्ही सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन्सद्वारे (SIP) म्युच्युअल फंड आणि आवर्ती ठेवींमध्ये (RD) गुंतवणूक करू शकतो. गेल्या वर्षभरात म्युच्युअल फंडात एसआयपीच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. यावरून म्युच्युअल SIP वरील गुंतवणूकदारांचा विश्वास सतत वाढत असल्याचे दिसून येते. अनेक गुंतवणूकदार आरडीमध्ये देखील पैसे गुंतवतात. अल्पकालीन आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी हा चांगला पर्याय आहे.

सहसा गुंतवणूकदार पैसे गुंतवण्यासाठी या दोघांपैकी एक निवडण्यात गोंधळतात. म्युच्युअल फंड आणि आरडी या दोन्हीमध्ये एसआयपीद्वारे गुंतवणूक केली जाऊ शकते. परंतु, तरीही या २ गुंतवणूक योजनांमध्ये फरक आहे. आरडीमध्ये गुंतवलेले पैसे पूर्णपणे सुरक्षित असून खात्रीशीर परतावा मिळतो. परंतु, म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणे अधिक जोखमीचे असते. इथेही परताव्याची हमी नाही.

आरडीमध्ये पैसे गुंतवण्याचे फायदे?आरडी म्हणजे आवर्ती ठेव हे एक गुंतवणुकीचे साधन असून गुंतवणूकदारांना त्यांच्या भांडवलाच्या सुरक्षिततेची हमी देते. बँका एक वर्ष ते १० वर्षांच्या कालावधीसाठी आरडी सुविधा देतात. अल्पावधीत निधी निर्माण करण्याचे हे एक चांगले माध्यम आहे. तुम्ही आरडीमध्ये दर महिन्याला थोडे पैसे जमा करू शकता. आरडीमधील गुंतवणुकीवर कोणतीही कर सूट नाही किंवा त्यातून मिळणारे व्याजही करमुक्त नाही. आरडीचा लॉक-इन कालावधी असल्याने, मॅच्युरिटी कालावधीपूर्वी पैसे काढणे कठीण आहे. बँका मॅच्युरिटी कालावधीपूर्वी पैसे काढण्यासाठी शुल्क आकारतात.

सामान्यतः आरडीचा परतावा महागाई दरापेक्षा कमी असतो. आरडीमध्ये जमा केलेल्या ५ लाखांपर्यंत डिपॉझिट इन्शुरन्स आणि गॅरंटी कॉर्पोरेशनद्वारे हमी दिली जाते. म्हणजेच, जर काही कारणाने बँक दिवाळखोर झाली तर गुंतवणूकदाराला कोणत्याही परिस्थितीत ५ लाख रुपयांपर्यंतची रक्कम परत मिळेल.

म्युच्युअल फंडात जास्त जोखीम जास्त परतावाम्युच्युअल फंड एसआयपी खूप लवचिक असतात. गुंतवणुकीसाठी तुम्ही दैनिक, साप्ताहिक, पाक्षिक, मासिक, त्रैमासिक किंवा वार्षिक पर्याय निवडू शकता. तुम्ही SIP द्वारे इक्विटीमध्ये गुंतवणूक करू शकता. तुम्ही किमान ५ वर्षे एसआयपी केली तरच तुम्हाला उत्तम परतावा मिळतो, असं तज्ज्ञांचे म्हणणे आहे. म्युच्युअल फंड एसआयपीमध्ये गुंतवणूक करणे जोखीमीचे असते. यामध्ये परताव्याची कोणतीही हमी नाही. एसआयपी बंद करणे आणि पैसे काढणे यात सोपे आहे.

कोणता पर्याय निवडावा?कोणतीही गुंतवणूक योजना तुमची जोखीम घेण्याची क्षमता आणि गुंतवणुकीचा वेळ लक्षात घेऊन निवडली पाहिजे. ज्यांना आर्थिक बाजारपेठेबद्दल फारशी माहिती नाही किंवा कोणतेही अल्पकालीन उद्दिष्ट साध्य करायचे आहे, त्यांनी आरडीमध्ये पैसे गुंतवावेत. त्याचप्रमाणे दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करण्यासाठी म्युच्युअल फंड एसआयपी निवडा.

डिस्क्लेमर : यात गुंतवणूक योजनांची माहिती देण्यात आली आहे. हा कुठल्याही प्रकारे गुंतवणूक सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. 

टॅग्स :गुंतवणूकशेअर बाजारशेअर बाजारबँकिंग क्षेत्र