Join us

पैशांची बचत करण्यामध्ये भारतीय चौथ्या नंबरवर; पहिल्या नंबरवर शेजारी राष्ट्र; दुसरे तिसरे कोण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2024 13:01 IST

Saving In India : भारतात बचत करण्याची परंपरा वर्षानुवर्षे जुनी आहे. विशेष म्हणजे आजही देशाचा बचतीचा दर जागतिक सरासरीपेक्षा जास्त आहे.

Saving In India : थेंबे थेंबे तळे साचे ही म्हण आपल्याकडे प्रचलित आहे. यात बचतिचा मोठा अर्थ दडलेला आहे. बचतीच्या बाबतीत भारतीयांचा हात कुणीही धरणार नाही. अगदी टूथपेस्टचं उदाहरण घ्या. आपण पार पेस्ट संपेपर्यंत दाबूदाबू वापरत असतो. विशेष म्हणजे आजही देशाचा बचतीचा दर जागतिक सरासरीपेक्षा जास्त आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) च्या Ecowrap अहवालानुसार, भारताचा बचत दर ३०.२ टक्के आहे, जो जागतिक सरासरी २८.२ टक्क्यांपेक्षा जास्त आहे. असं असूनही बचतीच्या बाबतीत भारताचा जगात चौथा क्रमांक लागतो.

भारतीयांपेक्षाही चीन (४६.६%), इंडोनेशिया (३८.१%) आणि रशिया (३१.७%) या देशांचे नागरिक बचत करण्यात अग्रेसर आहेत. एसबीआयचा अहवाल घरगुती बचतीचे बदलते स्वरूप अधोरेखित करतो. देशात आर्थिक सम्रुद्धी आल्यानंतर अनेक गोष्ट बदलल्या आहेत. आता ८० टक्क्यांहून अधिक प्रौढ व्यवहारासाठी आर्थिक खाते वापरतात. २०११ मध्ये हाच आकडा केवळ ५० टक्के होता.

अहवालानुसार, बँक ठेवी आणि रोख यांसारख्या पारंपारिक बचत पर्यायांचा हिस्सा आता भारतात कमी होत आहे. याउलट, म्युच्युअल फंड आणि इक्विटी यांसारखी नवीन गुंतवणूक साधने घरगुती बचतीसाठी पसंतीचे पर्याय बनत आहेत. आर्थिक वर्ष २०१८ पासून, म्युच्युअल फंडातील सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP) नोंदणी ४ पटीने वाढून ४.८ कोटी झाली आहे. भारतीय आता 'शेअर्स आणि डिबेंचर्स'मध्येही जास्त पैसे गुंतवत आहेत. दहा वर्षांपूर्वी, म्हणजे आर्थिक वर्ष २०१४ मध्ये, जीडीपीमध्ये शेअर्स आणि डिबेंचर्सचा वाटा ०.२ टक्के होता, जो आर्थिक वर्ष २०२४ मध्ये १ टक्के झाला.

निव्वळ आर्थिक बचतीचा वाटा वाढलागेल्या काही वर्षांत घरगुती बचतीतील निव्वळ आर्थिक बचतीचा वाटा वाढला आहे. आर्थिक वर्ष २०१४ मध्ये ते ३६ टक्के होते, जे आर्थिक वर्ष २०२१ मध्ये ५२ टक्क्यांवर पोहोचले. आर्थिक वर्ष २०२२ आणि आर्थिक वर्ष २०२३ मध्ये थोडीशी घसरण दिसून आली.

SBI अहवालानुसार, मार्केट कॅपिटलायझेशन (MCap) मध्ये १ टक्क्यांची वाढ जीडीपी वाढीचा दर ०.६ टक्क्यांनी वाढवू शकते. भारतीय कंपन्यांनी भांडवली बाजारातून उभारलेल्या पैशात गेल्या १० वर्षांत १० पटीने वाढ झाली आहे. आर्थिक वर्ष २०१४ मध्ये ही रक्कम १२,०६८ कोटी रुपये होती, जी ऑक्टोबर २०२५ पर्यंत वाढून १.२१ लाख कोटी रुपये झाली. 

टॅग्स :गुंतवणूकपैसाचीनरशिया