Join us
Daily Top 2Weekly Top 5

चीनच्या Alibaba डॉट कॉमसोबत भारत सरकारचा मोठा करार; नेमका कोणाला काय फायदा होणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2026 15:43 IST

TikTok, PUBG Mobile परत येणार? सरकारने स्पष्ट केली आपली भूमिका...

भारतीय स्टार्टअप्स आणि लघु उद्योजकांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेशी जोडण्यासाठी भारत सरकारने Startup India उपक्रमाअंतर्गत चीनच्या Alibaba.com सोबत भागीदारी केली आहे. या निर्णयामुळे तंत्रज्ञान क्षेत्रात नव्या चर्चेला उधाण आले आहे. मात्र, याचवेळी सरकारने स्पष्ट केले की, TikTok वरची बंदी अद्याप कायम असून त्याच्या पुनरागमनाचे कोणतेही संकेत नाहीत.

गलवान संघर्षानंतर परिस्थिती बदलली

2020 मध्ये गलवान खोऱ्यातील भारत-चीन तणावानंतर केंद्र सरकारने राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव TikTok, PUBG Mobile, AliExpress यांसह अनेक चिनी अ‍ॅप्सवर बंदी घातली होती. अलीबाबा समूहाची ई-कॉमर्स सेवा AliExpress देखील या बंदीच्या यादीत होती. अशा पार्श्वभूमीवर Alibaba.com सोबत केलेले मर्यादित सहकार्य हे धोरणातील मोठा बदल नसून, केवळ निर्यात-केंद्रित व्यावसायिक सहकार्य असल्याचे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Startup India-Alibaba.com भागीदारी नेमकी काय आहे?

अहवालानुसार, Startup India उपक्रमाने Alibaba.com या जागतिक B2B प्लॅटफॉर्मशी भागीदारी केली आहे. या भागीदारीचा उद्देश भारतीय स्टार्टअप्स आणि लघु उद्योगांना थेट परदेशी खरेदीदारांशी जोडणे हा आहे. Alibaba.com हा प्लॅटफॉर्म 200 हून अधिक देशांमध्ये आणि प्रदेशांमध्ये कार्यरत असून 5 कोटींपेक्षा अधिक सक्रिय खरेदीदारांना पुरवठादारांशी जोडतो. या सहकार्यामुळे भारतीय कंपन्यांना जागतिक बाजारात ओळख निर्माण करण्याची आणि निर्यात ऑर्डर्स मिळवण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

ग्राहक अ‍ॅप्सवरील बंदी कायम

सरकारने ठामपणे सांगितले आहे की चिनी ग्राहक-केंद्रित अ‍ॅप्सवरील (Consumer Apps) बंदीमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. Alibaba.com सोबतचे सहकार्य हे केवळ व्यवसाय आणि निर्यातीपुरते मर्यादित आहे. तज्ज्ञांच्या मते, हा निर्णय रणनीतिक आणि मर्यादित स्वरूपाचा असून, याचा थेट संबंध डिजिटल धोरणात सैलपणा येण्याशी नाही.

TikTok भारतात परत येणार का?

TikTok च्या भारतातील संभाव्य पुनरागमनाबाबत गेल्या काही काळापासून चर्चा सुरू आहे. मात्र सरकारने स्पष्ट केले आहे की सध्या TikTok वरील बंदी कायम राहील. गेल्या सहा वर्षांत भारतातील सोशल मीडिया इकोसिस्टममध्ये मोठा बदल झाला असून, शॉर्ट व्हिडिओ क्षेत्रात Instagram Reels आणि YouTube Shorts यांचे वर्चस्व वाढले आहे. काही विश्लेषकांचे मत आहे की भविष्यात कधी TikTok परत आलेच, तर ते स्थानिक नियंत्रण आणि कडक नियमांसह येऊ शकते. मात्र, सध्या अशा कोणत्याही हालचालीचे संकेत नाहीत.

English
हिंदी सारांश
Web Title : India partners with Alibaba.com: Benefits for startups, but TikTok ban continues.

Web Summary : India's Startup India partners with Alibaba.com to connect startups with global markets. Despite this, the ban on TikTok remains, focusing on export-oriented business. Consumer app restrictions continue amid evolving digital landscape.
टॅग्स :भारतचीनव्यवसायगुंतवणूक