Startups in India : मागील काही वर्षांपासून भारतात स्टार्टअप्सची संख्या झपाट्याने वाढत आहे. भारत जागतिक स्तरावर सर्वात विश्वासार्य स्टार्टअप इकोसिस्टम म्हणून उदयास आले आहे. शिवाय, आज भारत जगातील तिसरे सर्वात मोठे स्टार्टअप हब बनले आहे. 100 पेक्षा जास्त युनिकॉर्नसह, भारतीय स्टार्टअप इकोसिस्टम नाविण्यपूर्ण कल्पना आणि उद्योजकतेच्या भविष्याला आकार देत आहे.
अशातच, सरकारने बुधवारी भारतातील स्टार्टअप्सबाबत एक आकडेवारी जाहीर केली आहे. त्यानुसार, देशातील उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग (DPIIT) द्वारे मान्यताप्राप्त स्टार्टअपची संख्या 1,57,066 वर पोहोचली आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, आता देशात 73,000 पेक्षा जास्त स्टार्टअप्स आहेत, ज्यांना 'स्टार्टअप इंडिया इनिशिएटिव्ह' अंतर्गत मान्यता मिळाली आहे.
बंगळुरू, हैदराबाद, मुंबई आणि दिल्ली-एनसीआर, ही शहरे स्टार्टअप्सची केंद्रे बनली आहेत. 2024 मध्ये एकूण 13 स्टार्टअप कंपन्यांनी IPO लॉन्च केले. मागील वर्षांच्या तुलनेत ही संख्या खूप जास्त होती. या सर्व 13 स्टार्टअप कंपन्यांनी मिळून शेअर बाजारातून 29,247.4 कोटी रुपये उभे केले आहेत. यापैकी रु. 14,672.9 कोटी नवीन इश्यू होते, तर रु 14,574.5 कोटी ऑफर फॉर सेल (OFS) होते.
फिनटेक, एडटेक, हेल्थ-टेक आणि ई-कॉमर्ससह विविध क्षेत्रातील स्टार्टअप्सच्या वाढीला चालना मिळाली आहे. स्टार्टअप इंडियाने सादर केलेल्या 'इंडियन स्टार्टअप इकोसिस्टम रिपोर्ट'नुसार, भारतातील स्टार्टअप्सनी स्थानिक आणि जागतिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), ब्लॉकचेन आणि IoT सारख्या उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. केंद्र सरकारने 2016 मध्ये सुरू केलेला 'स्टार्टअप इंडिया कार्यक्रम' हा या प्रयत्नांचा आधारस्तंभ आहे. याशिवाय अटल इनोव्हेशन मिशन (AIM) आणि नॅशनल इनिशिएटिव्ह फॉर डेव्हलपिंग अँड हार्नेसिंग इनोव्हेशन (NIDHI) सारखे उपक्रम नवकल्पकांना पायाभूत सुविधा आणि आर्थिक सहाय्य प्रदान करतात.