Join us

PPF खातेधारकांसाठी आनंदाची बातमी, अर्थमंत्र्यांनी बदलले नियम; आता फी लागणार नाही, काय आहे प्रकरण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2025 15:29 IST

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोशल मीडिया एक्सद्वारे पोस्ट करत महत्त्वाची माहिती दिली आहे.

PPF Account: जर तुमचे पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF) खातं असेल आणि तुम्हाला नॉमिनी अपडेट किंवा बदलायचं असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. यासाठी सरकारनं नियमांमध्ये बदल केला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोशल मीडिया एक्सद्वारे पोस्ट करत याबाबत माहिती दिली.

नुकतंच अनेक वित्तीय संस्था नॉमिनी अपडेट करण्यासाठी फी आकारत असल्याची बातमी आली होती, पण आता ती पूर्णपणे रद्द करण्यात आली आहे. २ एप्रिल २०२५ रोजी सरकारनं शासकीय बचत प्रोत्साहन सर्वसाधारण नियम (२०१८) मध्ये सुधारणा केली आणि नॉमिनी अपडेट करण्यासाठी आकारलं जाणारं ५० रुपयांचं शुल्क काढून टाकण्यात आल्याचं निर्मला सीतारामन यांनी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरून म्हटलं. यानंतर आता पीपीएफ खातेदारांना कोणत्याही खर्चाशिवाय आपला नॉमिनी माहिती सहज अपडेट करता येणार आहे.

४ नॉमिनींचा पर्याय

नुकत्याच मंजूर झालेल्या बँकिंग सुधारणा विधेयक २०२५ अंतर्गत खातेदारांना आता त्यांच्या जमा केलेले पैसे, सुरक्षित वस्तू आणि लॉकरसाठी ४ नॉमिनी अॅड करण्याचं पर्याय आहे. या बदलामुळे सेवा वापरणाऱ्यांना अधिक सुरक्षितता मिळणार आहे, असं त्यांनी नमूद केलंय. यासोबतच अर्थमंत्र्यांनी सरकारनं केलेल्या नियमांमध्ये बदल करण्यासंदर्भात हिंदी आणि इंग्रजीभाषेत राजपत्रित अधिसूचनाही शेअर केल्यात.

नॉमिनी का अपडेट करावं?

सर्व पीपीएफ खातेदारांनी पीपीएफ खात्यात नॉमिनी अपडेट करणं आवश्यक आहे. पीपीएफ खातेधारकाचा मृत्यू झाल्यास नॉमिनीला खात्यातील पैसे सहज आणि जलद मिळू शकतात. नॉमिनीशिवाय खात्यावर दावा करणं कठीण असू शकतं आणि प्रक्रिया लांबलचक असू शकते.

पीपीएफ खातं पोस्ट ऑफिस किंवा बँकेत कोणतीही व्यक्ती उघडू शकतात. याशिवाय अन्य कोणतीही व्यक्ती अल्पवयीन मुलासाठी हे खातं उघडू शकते. पीपीएफ खात्याची मॅच्युरिटी १५ वर्षांची असते आणि जेव्हा स्कीम मॅच्युअर होते तेव्हा तुम्ही संपूर्ण पैसे काढू शकता. मात्र, पैशांची गरज नसल्यास आणखी ५-५ वर्षांसाठी मुदतवाढ देऊ शकता. ती वाढवण्याचा निर्णय मुदतपूर्तीच्या एक वर्ष आधी घ्यावा लागेल, हे मात्र आवश्यक आहे. दीर्घकालीन गुंतवणूक म्हणून हे खातं एक चांगला पर्याय आहे, ज्यामुळे आपली आर्थिक सुरक्षितता आणि बचत सुनिश्चित होते.

टॅग्स :निर्मला सीतारामनपीपीएफ