Join us
Daily Top 2Weekly Top 5

Gold Silver Price Today: युद्धामुळे सोन्या-चांदीच्या किमतीचा भडका; पाहा दिल्ली ते मुंबई काय आहे आजचा लेटेस्ट दर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2026 10:35 IST

Gold Silver Price Today: ४ मार्च रोजी देशांतर्गत बाजारपेठेत सोन्या-चांदीच्या किमतीत वाढ दिसून आली. मागील व्यवहारातील मोठ्या घसरणीनंतर ही वाढ पाहायला मिळत आहे.

Gold Silver Price Today: ४ मार्च रोजी देशांतर्गत बाजारपेठेत सोन्या-चांदीच्या किमतीत वाढ दिसून आली. मागील व्यवहारातील मोठ्या घसरणीनंतर ही वाढ पाहायला मिळत आहे. आजच्या व्यवहारात सोन्या-चांदीच्या किमतींना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतूनही पाठबळ मिळालंय. अमेरिका-इस्रायलकडून इराणवर झालेल्या हवाई हल्ल्यांच्या वर्षावानंतर भू-राजकीय अनिश्चितता वाढली आहे, ज्यामुळे गुंतवणूकदार सोन्या-चांदीसारख्या सुरक्षित गुंतवणुकीकडे वळत आहेत. आज सोन्याच्या किमतीत २,००० रुपयांहून अधिक वाढ झाली, तर चांदीत ५,५०० रुपयांहून अधिक उसळी पाहायला मिळाली.

MCX वर सोन्या-चांदीचा आजचा भाव

बुधवार, ४ मार्च २०२६ रोजी मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर एप्रिलच्या कॉन्ट्रॅक्ट डिलिव्हरीसाठी सोन्याचा भाव २,१५७ रुपये किंवा १ टक्क्यांहून अधिक वाढीसह १,६३,२६५ रुपये प्रति १० ग्रॅमच्या पातळीवर पोहोचला. काल हा भाव १,६१,१०८ रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाला होता. त्याचप्रमाणे, MCX वर मे च्या कॉन्ट्रॅक्ट डिलिव्हरीसाठी चांदी ५,७८१ रुपये किंवा २ टक्क्यांहून अधिक उसळीसह २,७१,०९९ रुपये प्रति किलोच्या भावावर पोहोचली. यापूर्वी मंगळवारच्या दुसऱ्या सत्रात दोन्ही धातूंच्या किमतीत घसरण नोंदवण्यात आली होती.

युद्धाच्या आगीत शेअर बाजार होरपळला, सकाळीच १० लाख कोटींचा फटका; सेन्सेक्स १७०० अंकांनी आपटला

आंतरराष्ट्रीय बाजारातील सोन्या-चांदीचा भाव

आंतरराष्ट्रीय स्तरावरील किमतींचा विचार केला तर, स्पॉट गोल्ड १ टक्क्याच्या वाढीसह ५,१३८.४६ डॉलर प्रति औंसवर पोहोचले, तर गेल्या सत्रात ते २० फेब्रुवारीनंतरच्या नीचांकी पातळीवर गेले होते. एप्रिलच्या कॉन्ट्रॅक्ट डिलिव्हरीसाठी यूएस गोल्ड फ्यूचर्स ०.५ टक्क्यांच्या वाढीसह ५,१४७.१० डॉलर प्रति औंसवर पोहोचले. २०२५ मध्ये सोन्याने ६४% परतावा दिल्यानंतर, २०२६ मध्ये आतापर्यंत १९% वाढ नोंदवली आहे.

दुसरीकडे, आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट चांदी १.४ टक्क्यांच्या वाढीसह ८३.२७ डॉलर प्रति औंसच्या पातळीवर पोहोचली आहे. गेल्या सत्रात चांदीनं ८ टक्क्यांची मोठी घसरण नोंदवली होती. २०२६ मध्ये आतापर्यंत चांदीच्या भावात १६ टक्क्यांहून अधिक वाढ दिसून येत आहे.

सोने-चांदी खरेदीची हीच योग्य वेळ?

तज्ज्ञांच्या मते, सोने-चांदीचा 'लॉन्ग टर्म ट्रेंड' चांगला दिसत आहे, परंतु सध्या कोणताही नवीन व्यवहार करण्यापूर्वी बाजारात थोडी स्थिरता येण्याची वाट पाहणं चांगलं ठरेल. पृथ्वीफिनमार्ट कमोडिटी रिसर्चचे मनोज कुमार जैन म्हणाले, "आजच्या सत्रात सोनं आणि चांदीमध्ये नवीन पोझिशन घेणं टाळा आणि बाजारात काही स्थिरता येण्याची वाट पाहा." आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा सपोर्ट ५,०५५-४,९८४ डॉलरवर आहे, तर रजिस्टेंस ५,२२०-५,२८० डॉलर दरम्यान आहे. चांदीचा सपोर्ट ७८.८०-७४.०० डॉलर आणि रजिस्टेंस ८८.००-९२.४० डॉलरच्या आसपास आहे.

MCX वर सोने-चांदी कुठपर्यंत जाऊ शकतं?

MCX वर सोन्याचा सपोर्ट १,५९,१००-१,५७,७०० रुपये आणि रजिस्टेंस १,६३,५००-१,६५,८०० रुपये प्रति १० ग्रॅम आहे. चांदीचा सपोर्ट २,५७,७००-२,५१,५०० रुपये आणि रेजिस्टंस २,७१,०००-२,७८,८०० रुपये प्रति किलो आहे. इंडसइंड सिक्युरिटीजचे जिगर त्रिवेदी यांच्या मते, एप्रिल गोल्ड फ्यूचर्स १,६३,००० रुपयांपर्यंत, तर मे सिल्वर फ्यूचर्स २,७०,००० रुपयांपर्यंत पोहोचू शकतात.

टॉप ५ शहरांतील २४ आणि २२ कॅरेट सोन्याचे भाव

दिल्ली: २४ कॅरेट सोनं १,६३,६७० रुपये आणि २२ कॅरेट १,५०,०३१ रुपये प्रति १० ग्रॅम.मुंबई: २४ कॅरेट सोनं १,६३,९५० रुपये आणि २२ कॅरेट १,५०,२८८ रुपये प्रति १० ग्रॅम.चेन्नई: २४ कॅरेट सोनं १,६४,४३० रुपये आणि २२ कॅरेट १,५०,७२८ रुपये प्रति १० ग्रॅम.कोलकाता: २४ कॅरेट सोनं १,६३,७३० रुपये आणि २२ कॅरेट १,५०,०८६ रुपये प्रति १० ग्रॅम.बंगळुरू: २४ कॅरेट सोनं १,६४,०८० रुपये आणि २२ कॅरेट १,५०,४०७ रुपये प्रति १० ग्रॅम.

English
हिंदी सारांश
Web Title : Gold, Silver Prices Surge Due to War; Latest Rates Here

Web Summary : Gold and silver prices soared due to geopolitical tensions. Gold rose over ₹2,000, silver jumped over ₹5,500. Experts advise caution, suggesting waiting for market stability before new investments. Check city-wise rates.
टॅग्स :सोनंचांदीगुंतवणूक