Gold Silver Price after US Tariff: गेल्या काही तासांत अमेरिकेत टॅरिफ संदर्भात झालेल्या घडामोडींचा सोन्या-चांदीच्या किमतींवर मोठा परिणाम पाहायला मिळाला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलेला नवीन 'ग्लोबल टेरिफ' आणि अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा निकाल यांनंतर मौल्यवान धातूंच्या दरात मोठी वाढ नोंदवण्यात आली. जागतिक बाजारात स्पॉट गोल्ड १.५ टक्क्यांनी वधारून ५०७१.४८ डॉलर प्रति औंसवर पोहोचले, तर एप्रिल डिलिव्हरीसाठीचे अमेरिकन गोल्ड फ्युचर्स १.७ टक्क्यांनी वाढून ५०८०.९० डॉलरवर बंद झाले. आर्थिक आणि भू-राजकीय अनिश्चिततेच्या काळात सोनं हे सुरक्षित गुंतवणुकीचे साधन मानलं जात असल्यानं त्याची मागणी वाढली.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
चांदी आणि इतर मौल्यवान धातूंची स्थिती
सोन्यासोबतच चांदीच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. स्पॉट सिल्वर ५.८ टक्क्यांनी वधारून ८२.९२ डॉलर प्रति औंसवर पोहोचलं. याव्यतिरिक्त, स्पॉट प्लॅटिनम ४.५ टक्क्यांनी वाढून २१६३.५३ डॉलर आणि पॅलेडियम ४ टक्क्यांच्या वाढीसह १७५१.७० डॉलर प्रति औंसवर गेलंय. कायदेशीर आणि आर्थिक अनिश्चिततेच्या वातावरणामुळे गुंतवणूकदारांनी सुरक्षित गुंतवणुकीकडे आपला मोर्चा वळवला असून, यामुळे चांदी आणि गोल्ड फ्युचर्सच्या किमतींना मोठा पाठबळ मिळालं.
अमेरिकेतील कायदेशीर घडामोडी
अमेरिकन सर्वोच्च न्यायालयानं 'IEEPA' अंतर्गत लावण्यात आलेलं व्यापक ग्लोबल टेरिफ बेकायदेशीर ठरवलं असून राष्ट्राध्यक्षांनी आपल्या अधिकारांची मर्यादा ओलांडल्याचे म्हटलं आहे. या निकालानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी १५० दिवसांसाठी १० टक्के 'ग्लोबल टेरिफ' लागू करण्याची घोषणा केली आहे, जे काही आपत्कालीन शुल्काची जागा घेतील. या निर्णयाचा परिणाम जागतिक शेअर बाजारांवरही झाला असून अमेरिकन, युरोपियन आणि आशियाई बाजारांमध्ये सुरुवातीच्या व्यवहारात वाढ दिसून आली. तसंच बाँड मार्केटमध्ये अमेरिकन ट्रेझरी यील्डमध्येही वाढ नोंदवण्यात आली.
अमेरिकेची आर्थिक स्थिती आणि महागाईचे सावट
आकडेवारीनुसार, चौथ्या तिमाहीत अमेरिकेचा आर्थिक विकास दर अपेक्षेपेक्षा कमी होऊन १.४ टक्क्यांवर आला आहे, जो अर्थतज्ज्ञांच्या ३ टक्के अंदाजापेक्षा बराच कमी आहे. तसेच 'पर्सनल कन्झम्पशन एक्सपेंडिचर' (PCE) इंडेक्समध्ये ०.४ टक्क्यांची वाढ झाली असून महागाई अद्याप कायम असल्याचे दिसून येत आहे. ही आर्थिक अनिश्चितता सोन्यासाठी पोषक ठरत असून, फेडरल रिझर्व्ह यावर्षी जूनपासून दोन वेळा व्याजदरात कपात करू शकते, अशी अपेक्षा व्यापाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.