Gold Silver Price 2 April: सोन्याचा भाव ९१,११५ रुपये प्रति १० ग्रॅमच्या उच्चांकी पातळीवरून आता ९०,९२१ रुपयांवर आला आहे. आज त्याचा दर १९४ रुपयांनी कमी झालाय. तर, चांदी ५४९ रुपये प्रति किलोनं स्वस्त झाली असून ९९,०९२ रुपयांवर आली. आयबीजेएनं जारी केलेल्या दरानुसार २३ कॅरेट सोनं आता ९०,५५७ रुपयांवर आलेत. तर २२ कॅरेट सोन्याचा भाव ८३,२८४ रुपये प्रति १० ग्रॅम झालाय. आज १८ कॅरेट सोन्याचा भाव ६८,१९१ रुपये झालाय.
इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशननं (IBJA) हे दर जाहीर केलेत. यामध्ये जीएसटीचा समावेश नाही. कदाचित तुमच्या शहरात १००० ते २००० रुपयांचा फरक असू शकेल. आयबीजेए दिवसातून दोनदा दर जारी करते. एकदा दुपारी १२ च्या सुमारास, तर दुसऱ्याला सायंकाळी ५ च्या सुमारास दर जारी केले जातात.
मोतीलाल ओसवाल यांचे कमोडिटी रिसर्चचे वरिष्ठ विश्लेषक मानव मोदी यांनी या ५ गोष्टींचा सोन्याच्या किंमतीवर परिणाम होत असल्याचं म्हटलं.
- डोनाल्ड ट्रम्प यांची टॅरिफची धमकी (आयात शुल्क)
- भूराजकीय तणाव (आंतरराष्ट्रीय तणाव)
- अमेरिकी डॉलर निर्देशांक घसरला
- मध्यवर्ती बँका सोनं खरेदी करत आहेत
- गुंतवणूकदारांची मागणी आणि यूएस फेड व्याजदर कपातीची अपेक्षा
भू-राजकीय तणावाचा परिणाम
मानव मोदी यांच्या मते, अमेरिका-इराण तणाव आणि इस्रायल-हमास संघर्ष (शस्त्रसंधीच्या बातम्या येत असल्या तरी) यासारख्या मुद्द्यांमुळे सोन्याचे दर वाढत आहेत. एचडीएफसी सिक्युरिटीजचे कमोडिटी अँड करन्सी प्रमुख अनुज गुप्ता यांनी ही बाब मान्य करताना जागतिक व्यापार युद्ध वाढण्याच्या भीतीनं सुरक्षित गुंतवणुकीची मागणी हे सोन्याच्या तेजीचं मुख्य कारण असल्याचं म्हटलं. मध्यवर्ती बँकांची सोन्याची खरेदी आणि ईटीएफमधील गुंतवणुकीमुळेही सोनं मजबूत झालं असल्याचं म्हटलं.