MCX Gold Price Today: गुरुवारी सकाळी सोन्याच्या किंमतींनी नवा विक्रमी उच्चांक गाठला. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या (US Fed) बैठकीनंतर व्याजदरात बदल करण्यात आला नसला तरी यावर्षी दोनवेळा व्याजदरात कपात करण्याचे संकेत देण्यात आले आहेत. एमसीएक्स गोल्डनं गुरुवारी सकाळी ८९,७९६ रुपये प्रति १० ग्रॅमचा नवा विक्रम प्रस्थापित केला. मात्र, नंतर किंमतीत किंचित घसरण झाली आणि सकाळी १०.१५ वाजेपर्यंत एमसीएक्स गोल्डचा भाव ४ एप्रिलच्या कॉन्ट्रॅक्टसाठी ०.५२% वाढून ८९,०६१ रुपये प्रति १० ग्रॅम वर व्यवहार करत होता. दुसरीकडे, ५ मे च्या फ्युचर्स साठी चांदी ०.७९ टक्क्यांनी वधारून १००७१६ रुपयांवर पोहोचली.
सोन्याच्या दरात वाढ
आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याचे दर विक्रमी पातळीवर पोहोचले आहेत. कॉमेक्स गोल्डनं ३,०६५.२० डॉलर प्रति ट्रॉय औंसचा नवा विक्रम प्रस्थापित केला, ज्यात या वर्षी आतापर्यंत १५% वाढ झालीये. भारतात स्पॉट गोल्डच्या किमती या वर्षी १६ टक्क्यांहून अधिक वाढल्यात, तर निफ्टी ५० याच कालावधीत ३ टक्क्यांहून अधिक घसरलाय.
यूएस फेडनं व्याजदर कायम ठेवले
अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हनं सलग दुसऱ्या बैठकीत बेंचमार्क व्याजदर ४.२५ ते ४.५० टक्क्यांवर कायम ठेवला. मात्र, फेडचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांच्या अध्यक्षतेखालील व्याजदर निश्चिती समितीनं या वर्षाच्या अखेरपर्यंत व्याजदरात दोनदा कपात करण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. आर्थिक उद्दिष्टे साध्य करताना काही जोखीम असल्यास पतधोरणात बदल करण्यास तयार असल्याचं फेडनं म्हटलं.
टॅरिफ धोरणांचा परिणाम
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणांमुळे जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेतील विकास आणि महागाईबाबत अनिश्चितता वाढली आहे. फेडचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांनी, ट्रम्प प्रशासनाच्या धोरणांमुळे अमेरिकन अर्थव्यवस्था मंद विकास आणि तात्पुरत्या उच्च महागाईच्या दिशेनं ढकलली गेली असल्याचं म्हटलं.