Join us

Gold Price Review: ५४ दिवसांत सोन्याच्या किंमतीत ११ हजारांची तेजी, केव्हा स्वस्त होणार Gold?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2025 09:18 IST

Gold Price Review: गेल्या वर्षी गुंतवणूकदारांचे खिसे भरणाऱ्या सोन्यानं या वर्षाच्या सुरुवातीलाही आपली चमक कायम ठेवली आहे. मजबूत जागतिक ट्रेंडमुळे देशांतर्गत बाजारात सोन्यानं ८८,००० रुपये प्रति १० ग्रॅमचा टप्पा ओलांडलाय.

Gold Price Review: गेल्या वर्षी गुंतवणूकदारांचे खिसे भरणाऱ्या सोन्यानं या वर्षाच्या सुरुवातीलाही आपली चमक कायम ठेवली आहे. मजबूत जागतिक ट्रेंडमुळे देशांतर्गत बाजारात सोन्यानं ८८,००० रुपये प्रति १० ग्रॅमचा टप्पा ओलांडलाय. या वर्षाच्या पहिल्या ५४ दिवसांत सोन्यानं आपल्या गुंतवणूकदारांना ११ टक्क्यांहून अधिक नफा मिळवून दिलाय. त्याच्या देशांतर्गत किमती तब्बल ११ हजार रुपयांनी वाढल्यात. त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

विशेष म्हणजे गेल्या वर्षी सोन्यानं जवळपास ३० टक्के परतावा दिला. यंदा त्याच्या किमतीत आणखी वाढ झाली असून सुमारे दोन महिन्यांत त्यात ११.२० टक्क्यांची वाढ झाली आहे. १ जानेवारी रोजी सोन्याचा भाव ७७,७०० रुपये प्रति १० ग्रॅम होता, जो २१ फेब्रुवारीपर्यंत ८८,७५० रुपये प्रति १० ग्रॅम झाला. सोन्यानं २० फेब्रुवारी रोजी ८९,४५० रुपयांचा नवा उच्चांक गाठला होता.

साडेचार दशकांचा विक्रम मोडला

गेल्या साडेचार दशकांची म्हणजेच ४५ वर्षांची आकडेवारी पाहिली तर २०२४ मध्ये सोन्या-चांदीने सर्वाधिक वाढीचा विक्रम केला आहे. यापूर्वी २००७ मध्ये सोन्याच्या दरात ३१ टक्क्यांची वाढ झाली होती. सर्वात जलद १३३ टक्के वाढ १९७९ मध्ये नोंदविण्यात आली होती. तर गेल्या वर्षी सोन्यात सुमारे ३० टक्क्यांची वाढ झाली होती. म्हणजेच जानेवारी २०२४ पासून त्यात ३५ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.

तसेच सोन्याच्या एकूण किमतीतील चढ-उतारांमध्ये या वर्षाच्या सुरुवातीपासूनची मागणी आणि पुरवठ्याची स्थितीही महत्त्वाची भूमिका बजावत आहे. चीनमध्ये पुनरुज्जीवनाची अपेक्षा, मध्यवर्ती बँकांकडून सोनं खरेदीची स्पर्धा आणि एकूणच गुंतवणुकीच्या मागणीत झालेली वाढ यामुळे तेजी आली आहे.

हेही पर्याय उपलब्ध आहेत

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार सोन्यात गुंतवणुकीसाठी अनेक प्रकारचे प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत. गुंतवणुकीचा हा पर्याय गुंतवणूकदाराची आर्थिक उद्दिष्टे, जोखीम घेण्याची क्षमता, रोख गरजा आणि गुंतवणुकीचा कालावधी यावर अवलंबून असतो. गुंतवणूकदारांना अधिक तरलता आणि व्यवसाय सुलभतेची गरज असल्यास गोल्ड ईटीएफ चांगले आहे. त्याला एसआयपी गुंतवणूक आवडत असेल तर गोल्ड म्युच्युअल फंड हा देखील एक उत्तम पर्याय ठरू शकतो.

त्यामुळेच तेजी येत आहे

जागतिक तणावाच्या पार्श्वभूमीवर वाढती अनिश्चितता आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या शुल्क आकारण्याच्या धमक्यांमुळे सोन्याच्या गुंतवणुकीचे आकर्षण वाढत आहे, असं मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटी रिसर्च) मानव मोदी यांनी सांगितलं. याशिवाय अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हची धोरणात्मक दरकपात कमी होण्याची शक्यता नाही आणि दिवाळीनंतर रुपयाच्या विनिमय दरात तीन टक्क्यांची घसरण झाल्यानं ही किंमत वाढली आहे.

गुंतवणूकदारांनी सावध राहावं

तज्ज्ञांच्या मते सोन्यानं इक्विटी आणि बाँड या दोन्ही गोष्टींना मागे टाकलं आहे. जागतिक अनिश्चितता आणि रुपयाचं अवमूल्यन यामुळे हा ट्रेंड यापुढेही कायम राहण्याची शक्यता आहे. तथापि, गुंतवणुकीच्या रकमेचं वाटप गुंतवणूकदारांची जोखीम क्षमता, उद्दिष्टे आणि कालमर्यादेवर आधारित असावं. मोतीलाल ओसवालचे मानव मोदी यांच्या म्हणण्यानुसार, किमतीत झपाट्यानं होणारी वाढ पाहता या पातळीवर सोन्यात नवीन गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.

टॅग्स :सोनंगुंतवणूक