Gold Price : सोन्या-चांदीचे दागिने म्हणजे भारतीयांचा जीव की प्राण आहे. पण, भविष्यात सोन्याचे दागिने घेणे म्हणजे दिवास्वप्न वाटणार आहे. कारण, सोन्याची वाटचाल आता एक लाखांच्या टप्प्याकडे चालली आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या भावात चढउतार पाहायला मिळत होते. पण, होळीनंतर सोन्या-चांदीने किमतीच्या बाबत नवा विक्रम नोंदवला आहे. देशांतर्गत बाजारात, MCX वर सोन्याने ८८,३१० रुपये प्रति १० ग्रॅमचा नवा उच्चांक गाठला, तर आंतरराष्ट्रीय बाजारात तो ३,००४.९० प्रति औंस डॉलरचा उच्चांक गाठला.
या वर्षी आतापर्यंत सोन्याच्या किमतीत सुमारे १४ टक्क्यांची विक्रमी वाढ झाली आहे. या तेजीच्या ट्रेंडमध्ये चांदीच्या दरातही झपाट्याने वाढ झाली. एमसीएक्सवर चांदीने शुक्रवारी १,०१,९९९ रुपये प्रति किलोचा नवा विक्रम गाठला.
सोन्या-चांदीच्या किमती वाढण्यामागे ५ मोठी कारणे
- यूएस टॅरिफ धोरणामुळे आर्थिक अनिश्चितता : डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ निर्णयांमधील चढ-उतारांचा जागतिक व्यापारावर परिणाम झाला आहे, ज्यामुळे सोन्याची मागणी वाढली आहे.
- यूएस फेडची दर कपात अपेक्षित : अमेरिकेची अर्थव्यवस्था सध्या मंदीच्या छायेत आहे. सीपीआय आणि पीपीआय डेटाने बाजाराच्या अपेक्षा मागे टाकल्या आहेत. त्यामुळे जूनमध्ये दर कपातीची शक्यता वाढली आहे.
- डॉलरची कमकुवत : डॉलरच्या निर्देशांकात यंदा ४ टक्क्यांहून अधिक घट झाली आहे, त्यामुळे सोने गुंतवणूकदारांसाठी आकर्षक बनले आहे.
- केंद्रीय बँकांकडून खरेदी : ग्लोबल सेंट्रल बँका सतत सोने खरेदी करत आहेत. गेल्या तीन वर्षांपासून दरवर्षी १००० टनांहून अधिक सोन्याची खरेदी करण्यात आली आहे.
- इक्विटीकडून सोन्याकडे शिफ्ट : जागतिक व्यापार धोरणांमधील अनिश्चिततेमुळे गुंतवणूकदार इक्विटीमधून सोन्याकडे वळत आहेत.
पुढे काय होणार?सोन्याचे भाव वाढतील की आणखी घसरतील याचा निर्णय बँक ऑफ इंग्लंड आणि बँक ऑफ जपान आणि यूएसच्या किरकोळ विक्री डेटाच्या धोरणात्मक बैठकीनंतर ठरेल. याशिवाय भू-राजकीय घटनांचाही सोन्याच्या किमतीवर परिणाम होऊ शकतो. रशिया-युक्रेन संघर्ष किंवा टॅरिफ युद्धातील कोणतेही नवीन वळण सोन्याचा भाव वाढवू शकते.
तुमच्या शहरातील सोन्याचा दर किती आहे?आज मुंबईत सोन्याचा भाव ८९,८१७ रुपये प्रति १० ग्रॅम आहे. काल तो ८८,०१७ रुपये प्रति १० ग्रॅम होता. आज कोलकात्यात सोन्याचा भाव ८९,८१५ रुपये प्रति १० ग्रॅम आहे. काल तो ८८,०१५ रुपये प्रति १० ग्रॅम होता.