Join us

स्वस्तात सोन्यात गुंतवणूक करण्याची संधी; ना घडणावळ खर्च ना जीएसटीची कटकट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2025 12:35 IST

Gold Investment : सातत्याने वाढणाऱ्या किमतीमुळे सोने सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेलं आहे. पण, तुम्हाला स्वस्तात सोन्यात गुंतवणूक करण्याची चांगली संधी ईटीएफ आहे.

Gold Investment : सोन्याच्या किमतीत वाढ होण्याचा वेग असाच कायम राहिला तर लवकरच सोने १ लाख रुपयांचा टप्पा पार करेल. वास्तविक, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोन्यावरील आयात शुल्कात कपात करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर सोने स्वस्त होईल, अशी आशा होती. मात्र, अद्याप तरी सोन्याच्या किमतीत मोठी घट झाली नाही. बुधवारी मुंबईच्या सराफा बाजारात ९९.९ टक्के शुद्धतेच्या सोन्याचा भाव ३८० रुपयांनी वधारल्याने ८७,६७० रुपये प्रति १० ग्रॅम झाला. अशा परिस्थितीत तुम्हाला घडणावळ आणि जीएसटी शिवाय सोन्यात गुंतवणूक करण्याची संधी आहे.

सोन्याचे दागिने महाग कसे होतात?सोन्याच्या वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्य गुंतवणूकदार आणि खरेदीदारांचे टेन्शन वाढले आहे. यात भर म्हणजे सोने खरेदी करणाऱ्यांना आता वाढलेल्या किमतीनुसार जीएसटी आणि घडणावळ (मेकिंग चार्ज) भरावी लागते. आता समजा तुम्ही ८०,००० रुपयांची सोनसाखळी खरेदी केली, ज्यावर १५ टक्के घडणावळ आहे. अशा परिस्थितीत तुम्हाला सोनसाखळी ८०,००० रुपये, मजुरी १२,००० रुपये आणि ३ टक्के जीएसटी म्हणून २४०० रुपये द्यावे लागतील. याचा अर्थ ८०,००० रुपयांची चेन तुम्हाला ९४,४०० रुपयांची होईल. सोन्याच्या किमती जसजशा वाढतील तसतसे मेकिंग चार्ज आणि एकूण जीएसटी चार्ज देखील त्याच दराने वाढतो.

स्वस्तात सोन्यात गुंतवणूक करण्याचा पर्यायसोन्यातील गुंतवणूक सर्वात सुरक्षित समजली जाते. जर तुम्हाला देखील स्वस्तात सोन्यात गुंतवणूक करायची असेल तर गोल्ड ईटीएफ हा चांगला पर्याय आहे. यात गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला कोणतेही अतिरिक्त शुल्क भरावे लागत नाही. गोल्ड ईटीएफद्वारे गोल्ड बुलियनमध्ये गुंतवणूक केली जाते. त्याचे एक युनिट 24 कॅरेट सोन्याच्या १ ग्रॅम इतकेच असते. गोल्ड ईटीएफ शेअर बाजारात खरेदी आणि विकले जातात. तुम्ही सोन्याचा ETF विकल्यास, तुम्हाला प्रत्यक्ष सोने मिळत नाही. परंतु, त्याची समतुल्य रक्कम थेट तुमच्या खात्यात हस्तांतरित केली जाते. गोल्ड ईटीएफमध्ये व्यापार करण्यासाठी, तुमच्याकडे डिमॅट खाते असणे आवश्यक आहे.

फिजिकल गोल्डपेक्षा जास्त नफासोन्याच्या किमतीसोबत गोल्ड ईटीएफची किंमतही वाढत आणि कमी होत राहते. जेव्हा सोन्याची किंमत वाढते तेव्हा सोन्याच्या ईटीएफच्या युनिटची किंमत देखील वाढते. याचा अर्थ तुम्हाला सोन्याच्या ईटीएफवर तुम्हाला फिजिकल गोल्डप्रमाणेच नफा मिळतो. जर गणित मांडलं तर ईटीएफमधील नफा भौतिक सोन्यापेक्षा जास्तच असतो. कारण, भौतिक सोन्यावर मेकिंग चार्ज आणि जीएसटीची रक्कम वाढते. मात्र, सोन्या मोडण्यास गेल्यानंतर ही रक्कम तुम्हाला मिळत नाही. म्हणजे तुमची ९४,४०० रुपयांची सोन्याची चेन तुम्हाला पुन्हा विकायची झाल्यास त्याचे ८०,००० रुपयेच येतील. याउलट गोल्ड ईटीएफमध्ये जीएसटी किंवा मेकिंग चार्ज नसल्याने तुमच्या पैशांची बचत होते.

टॅग्स :सोनंगुंतवणूकशेअर बाजार