Join us
Daily Top 2Weekly Top 5

EPFO देतंय ७ लाख रुपयांचा इन्शुरन्स कव्हर, जाणून घ्या या नव्या स्कीमचे फायदे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2024 15:24 IST

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेनं (EPFO) या नव्या स्कीमची सुरुवात केली आहे.

EPFO New Scheme EDLI: कर्मचारी वर्ग, विशेषत: ज्यांच्यावर कौटुंबिक जबाबदाऱ्या आहेत, ते स्वतःपेक्षा कुटुंबासाठी अधिक करतात. जर अशातच काही अनुचित घटना घडली तर त्यांच्या कुटुंबाचं आर्थिक स्थैर्य राखण्याला ते अनेकदा प्राधान्य देतात. ही चिंता दूर करण्यासाठी, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेनं (EPFO) इन्शुरन्स डिपॉझिट लिंक्ड इन्शुरन्स स्कीमची सुरुवात केली आहे. याद्वारे योगदान देणाऱ्या कर्मचाऱ्यांना मोफत विमा संरक्षण पुरवलं जातं. या योजनेंतर्गत, कर्मचाऱ्याचा अचानक मृत्यू झाल्यास, नॉमिनीला ७ लाख रुपयांपर्यंतचे पैसे मिळतील. 

EDLI कर्मचाऱ्यांसाठी एक मोफत विमा योजना म्हणून काम करते. ज्यामध्ये नॉमिनी ७ लाख रुपयांपर्यंतच्या आर्थिक मदतीचा दावा करण्यास पात्र आहेत. जर कोणी नॉमिनी नसेल तर, ते कर्मचाऱ्याच्या कायदेशीर वारसांमध्ये समान प्रमाणात पैसे वितरित करते. योजनेंतर्गत कव्हरेज कर्मचाऱ्याच्या आजारपणाच्या, अपघाताच्या किंवा नैसर्गिक मृत्यूच्या प्रकरणांपर्यंत विस्तारित आहे. 

EDLI योजनेंतर्गत लाभाची रक्कम कर्मचाऱ्याच्या शेवटच्या १२ महिन्यांच्या पगाराच्या आधारावर ठरवली जाते. कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास, सरासरी वेतनाच्या ३० पट आमि २० टक्के बोनस घेण्यास पात्र होतो. मासिक पीएफ कपातीपैकी, ८.३ टक्के कर्मचारी पेन्शन योजना (EPS), ३.६७ टक्के ईपीएफ आणि ०.५ टक्के ईडीएलआय योजनेसाठी दिले जाते. 

खातेधारकाच्या विमा संरक्षणातून लाभार्थी किमान २.५ लाख रुपये आणि कमाल ७ लाख रुपयांचा दावा करू शकतो. या योजनेचा लाभ घेण्यासाठी, व्यक्तींना किमान १२ महिने सतत नोकरीत असणं आवश्यक आहे. असं न झाल्यास, तुम्हाला विम्याचा लाभ मिळणार नाही. ईडीएलआय योजनेला पीएफ विम्यापासून वेगळं करणं महत्त्वाचं आहे, जे खातेधारकाचा निवृत्तीनंतर नोकरीदरम्यान मृत्यू झाल्यास दिलं जातं.

टॅग्स :भविष्य निर्वाह निधीगुंतवणूक