Join us

तुमच्या PF वर व्याज वाढलं नाही, आता PPF-सुकन्या समृद्धीसारख्या योजनांवर लागणार झटका?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2025 14:38 IST

EPFO interest rate: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) २०२४-२५ साठी भविष्य निर्वाह निधी ठेवींवरील व्याजदर ८.२५ टक्के कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. आता अन्य योजनांच्या व्याजदराबाबत काय निर्णय होतोय हे पाहावं लागणार आहे.

EPFO interest rate: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) २०२४-२५ साठी भविष्य निर्वाह निधी ठेवींवरील व्याजदर ८.२५ टक्के कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. हे व्याज मागील आर्थिक वर्षाच्या बरोबरीचं आहे. याचाच अर्थ व्याजदरात वाढ झालेली नाही. आता पुढील तिमाहीसाठी पब्लिक प्रॉव्हिडंट फंड आणि सुकन्या समृद्धी सारख्या अल्पबचत योजनांचा निर्णय घेतला जाणार आहे. ३१ मार्चपूर्वी हा निर्णय घेतला जाईल. सरकार अल्पबचत योजनांच्या व्याजदरात कपात करू शकते, असं मानलं जात आहे.

काय आहे कारण?

डिसेंबर महिन्यात भारतीय रिझर्व्ह बँकेनं (RBI) रेपो दरात कपात केली आहे. त्यानंतर उपभोगाला चालना देण्यासाठी अर्थ मंत्रालय पुढील आर्थिक वर्षात अल्पबचत योजनांचे दर कमी करण्याचा विचार करू शकते. सुकन्या समृद्धी आणि पोस्ट ऑफिस बचत ठेव योजनांवरील व्याजदर अनुक्रमे ७.१ टक्के आणि ४ टक्के ८.२ टक्के कायम ठेवण्यात आला आहे.

ईपीएफबाबत काय निर्णय आहे?

केंद्रीय विश्वस्त मंडळाच्या (सीबीटी) शुक्रवारी झालेल्या बैठकीत कर्मचारी भविष्य निर्वाह निधीवर (ईपीएफ) २०२४-२५ साठी ८.२५ टक्के व्याज देण्याचा निर्णय घेण्यात आला. सरकारकडून व्याजदर अधिकृतरीत्या अधिसूचित केला जाईल, असं मंत्रालयानं म्हटलं आहे. यानंतर ईपीएफओ सभासदांच्या खात्यात व्याजदर जमा करेल.

केंद्रीय कामगार व रोजगार मंत्री मनसुख मांडविया यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी झालेल्या ईपीएफओच्या केंद्रीय विश्वस्त मंडळाच्या २३७ व्या बैठकीत व्याजदरात हा निर्णय घेण्यात आला. मंत्रालयानं म्हटल्यानुसार, इतर अनेक फिक्स्ड इन्कम इन्स्ट्रुमेंट्सच्या तुलनेत कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) तुलनेनं उच्च आणि स्थिर परतावा देतो. ईपीएफओनं फेब्रुवारी २०२४ मध्ये ईपीएफवरील व्याजदर २०२२-२३ मधील ८.१५ टक्क्यांवरून २०२३-२४ साठी ८.२५ टक्के केला होता.

टॅग्स :पीपीएफगुंतवणूकपैसा