Join us

EPFO मध्ये ३१ मार्चपर्यंत पूर्ण होणार 'हे' काम, जून पासून मिळू शकतील बँकेसारख्या सेवा; जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2025 10:30 IST

EPFO Latest Updates: जर तुम्ही जॉब करत असाल तर कर्मचारी भविष्य निर्वाह निधीबद्दल तुम्हाला कल्पना असेलच. येत्या काळात भविष्य निर्वाह निधीमध्ये काही बदल पाहायला मिळणार आहेत.

EPFO Latest Updates: जर तुम्ही जॉब करत असाल तर कर्मचारी भविष्य निर्वाह निधीबद्दल तुम्हाला कल्पना असेलच. येत्या काळात भविष्य निर्वाह निधीमध्ये काही बदल पाहायला मिळणार आहेत. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेची (ईपीएफओ) केंद्रीकृत आयटी सक्षम प्रणाली (सीआयईटीएस २.०१) आणि ईपीएफओ ३.० हे ३१ मार्चपर्यंत पूर्ण करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलंय. ईपीएफओशी संबंधित अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, आयटी प्रणालीचं काम पूर्ण झाल्यानंतर चाचणी होईल. या वर्षाच्या मध्यापर्यंत म्हणजेच जूनपर्यंत ईपीएफओ सदस्यांना त्यांच्या ईपीएफ खात्यातून बँकिंगसारख्या सेवा मिळू लागण्याची शक्यता आहे.

ईपीएफओच्या केंद्रीय विश्वस्त मंडळाशी संलग्न ईपीएफच्या कार्यकारी समितीच्या (EC) मंगळवारी झालेल्या ११२ व्या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. ईपीएफओ ३.० अंतर्गत नवी प्रणाली विकसित करण्यात येणार असल्याचं बैठकीत सांगण्यात आलं. यामुळे अपडेटेड तंत्रज्ञानाचा वापर करून सामाजिक सुरक्षेची व्याप्ती वाढणार आहे.

बँकेप्रमाणे पीएफचे पैसे काढू शकता

सदस्यांना गरज भासल्यास बँकिंग प्रणालीनुसार त्यांच्या पीएफ खात्यातून विहित रक्कम काढण्याची मुभा असेल. यासोबतच भविष्यात ईपीएफओ सदस्यांना त्यांचे योगदान वाढविण्यापासून इतर सुविधाही ऑनलाइन उपलब्ध करून दिल्या जातील. अनावश्यक पडताळणी बंद करावी, असा निर्णयही बैठकीत घेण्यात आला. यामुळे ईपीएफओ सदस्यांना छोटी-मोठी रक्कम अंशतः काढणं किंवा पार्शल विड्रॉलची सुविधा उपलब्ध होण्यास मदत मिळणार आहे.

सुधारणांवर भर

ईपीएफओनं आपल्या सदस्यांसाठी जलद क्लेम सेटलमेंट, अखंड पेन्शन वितरण आणि चांगली सेवा प्रदान सुनिश्चित करणे, डिजिटल परिवर्तनास गती देणे आणि सदस्य-केंद्रित सुधारणांवर भर दिला. ईसीनं अधिक वेतनावरील पेन्शनशी संबंधित विषयावरही चर्चा केली.

सर्वोच्च न्यायालयाच्या ४ नोव्हेंबर २०२२ च्या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी वाढीव वेतनावरील पेन्शनसंदर्भातील अर्ज अपडेट केले जात असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. अपडेटची प्रक्रिया ३१ मार्चपर्यंत पूर्ण होईल. दरम्यान, ईसीने आधार-आधारित पेमेंट सिस्टीम (ABPS) वेळेत हस्तांतरित करण्याच्या गरजेवर भर दिला. 'अधिक सुरक्षित आणि कार्यक्षम प्रणालीसाठी, पेन्शन देयके थेट आधार-संलग्न बँक खात्यात जमा केली जावीत,' असंही ईसीनं म्हटलं.

टॅग्स :भविष्य निर्वाह निधी