Join us

EPFO नं बदलला नियम, नावापासून DOB पर्यंत... विना डॉक्युमेंट होणार या बाबी अपडेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2025 15:48 IST

EPFO New Rules : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेनं आपल्या सभासदांना दिलासा देण्यासाठी आणि अपडेशन प्रोसेस सोपी करण्यासाठी नियमात बदल केला आहे.

EPFO New Rules : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेनं आपल्या सभासदांना दिलासा देण्यासाठी आणि अपडेशन प्रोसेस सोपी करण्यासाठी नियमात बदल केला आहे. आता कर्मचारी सहजपणे ईपीएफ प्रोफाइल अपडेट करू शकतात. त्यासाठी कोणत्याही कागदपत्रांची गरज भासणार नाही. ईपीएफओच्या या निर्णयाचा लाभ पेंडिंग रिक्वेस्ट असलेल्या ३.९ लाख सभासदांना होणार आहे. या सदस्यांना आता पेंडिंग रिक्वेस्ट रद्द करून नव्या सुव्यवस्थित प्रक्रियेअंतर्गत पुन्हा सादर करण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे.

आपण कोणती माहिती अपडेट करू शकता?

ईपीएफओ प्रणालीत अनेक अपडेट्स आले आहेत. ताजं अपडेट म्हणजे सदस्य आपलं नाव, जन्मतारीख, लिंग, राष्ट्रीयत्व, पालकांचं नाव, लग्नाची स्थिती, जोडीदाराचं नाव, एन्ट्री आणि एक्झिट तारीख आणि इतर माहितीसह कोणतीही कागदपत्रे सादर न करता आपली वैयक्तिक माहिती सहजपणे अपडेट करू शकता.

ही सुविधा कोणाला मिळणार? 

ईपीएफओनं दिलेल्या माहितीनुसार ही सुविधा अशा सदस्यांसाठी आहे ज्यांचा युनिव्हर्सल अकाउंट नंबर (यूएएन) आधारशी व्हेरिफाइड आहे. तक्रारी कमी करणं आणि पेंडिंग रिक्वेस्ट जलदगतीनं निकाली काढणं हा या प्रक्रियेचा उद्देश आहे. यापूर्वी, या बदलासाठी कंपनीकडून पडताळणी आवश्यक होती, ज्यास सुमारे २८ दिवस लागत होते.

आधार, पॅन लिंक आवश्यक

आता सुमारे ४५ टक्के विनंत्या सदस्य स्वत: मंजूर करू शकतात. उर्वरित ५० टक्के रक्कम ईपीएफओच्या सहभागाशिवाय नियोक्त्याच्या मान्यतेनेच निकाली काढली जाऊ शकते. मात्र, त्यासाठी सदस्यांना आपलं आधार आणि पॅन ईपीएफ खात्याशी जोडलेलं असेल याची खात्री करावी लागेल. कारण कोणत्याही अपडेट किंवा विड्रॉलसाठी ते बंधनकारक आहे. त्याशिवाय रिक्वेस्ट पूर्ण होण्यास उशीर होऊ शकतो. 

नव्या प्रक्रियेमुळे या तक्रारींमध्ये लक्षणीय घट होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. प्रोफाईलमध्ये बदल करण्यासाठी सदस्याला कागदपत्रे सादर करण्याची आणि नियोक्त्याच्या मंजुरीची वाट पाहावी लागणार नाही. यासाठी यूएएन आधारशी लिंक असणं आवश्यक आहे. सदस्यांना ईपीएफओ पोर्टल किंवा उमंग अॅपवर लॉग इन करून अपडेटसाठी विनंती करावी लागेल. 

अपडेट कसं करावं? 

  • सर्वप्रथम, ईपीएओच्या पोर्टलवर जा (https://unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface/). 
  • आता तुमचा यूएएन युनिव्हर्सल अकाउंट नंबर, पासवर्ड आणि कॅप्चा टाकून लॉगिन करा. 
  • लॉगिन केल्यानंतर वरच्या बाजूला असलेल्या 'मॅनेज' टॅबवर क्लिक करा. 
  • नाव, जन्मतारीख किंवा लिंग यासारखे वैयक्तिक तपशील अपडेट करायचे असतील तर 'मॉडिफाई बेसिक डिटेल्स' हा पर्याय निवडा. 
  • आपल्या आधार कार्डानुसार मागितली जाणारी आवश्यक माहिती अचूक भरा.
  • ईपीएफ आणि आधारमधील तपशील समान असणं आवश्यक आहे. 
  • आवश्यक असल्यास सहाय्यक कागदपत्रं (जसे आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा जन्म दाखला) अपलोड करा.
टॅग्स :भविष्य निर्वाह निधी