Join us

शेअर बाजारापेक्षा जास्त परतावा देणारी सरकारी योजना; EPF का ठरत आहे सरस? संपूर्ण गणित समजून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2025 15:44 IST

Investment Tips : फक्त ८.२५% वार्षिक व्याज देणाऱ्या ईपीएफने कर सवलत आणि सुरक्षित गुंतवणुकीमुळे पाच वर्षांत १७.७५ लाख रुपयांचा परतावा देऊन शेअर बाजाराला मागे टाकले.

Investment Tips : मोठा फंड जमा करायचं म्हटलं की प्रत्येकजण शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडात गुंतवणुकीचा सल्ला देतो. पण, तुम्ही सरकारी योजनेतूनही कोणत्याही जोखमीशिवाय शेअर बाजारापेक्षा जास्त नफा कमावू शकता. एका चार्टर्ड अकाउंटंट (CA) ने नुकतेच सांगितले आहे की, काही विशिष्ट परिस्थितीत EPF हा शेअर बाजारापेक्षाही जास्त फायदेशीर ठरू शकतो. होय, दरवर्षी केवळ ८.२५% व्याज देणारा पीएफ देखील १२% ते १५% परतावा देणाऱ्या गुंतवणुकीला मागे टाकू शकतो. हे ऐकायला विचित्र वाटेल, पण यामागे एक रंजक गणित आहे, चला आज समजून घेऊ.

PF आणि शेअर बाजाराची तुलनासीएने २ मित्रांचे उदाहरन देऊन ही तुलना स्पष्ट केली. दोघांचा वार्षिक पगार २६ लाख रुपये आहे आणि त्यांचे मूळ वेतन दरमहा १ लाख रुपये आहे. या दोन्ही कर्मचाऱ्यांनी १ सप्टेंबर २०१४ नंतर नोकरी सुरू केली आहे, त्यामुळे त्यांच्याकडे ईपीएफमध्ये गुंतवणूक न करण्याचा पर्याय उपलब्ध आहे.पहिला मित्र (EPF मध्ये गुंतवणूक): हा कर्मचारी दरमहा आपल्या पगारातून १२,००० रुपये ईपीएफ खात्यात जमा करतो. तेवढीच रक्कम कंपनी (नियोक्ता) देखील जमा करते. त्यामुळे, दरमहा एकूण २४,००० रुपये पीएफ खात्यात जमा होतात. पाच वर्षांनंतर, या कर्मचाऱ्याच्या पीएफ खात्यात सुमारे १७.७५ लाख रुपये जमा झाले आणि ही संपूर्ण रक्कम करमुक्त असते.

दुसरा मित्र (शेअर बाजारात गुंतवणूक): या कर्मचाऱ्याने ईपीएफमध्ये पैसे टाकण्यास नकार दिला आणि दरमहा पूर्ण २४,००० रुपये थेट शेअर बाजारात गुंतवण्यास सुरुवात केली. पण इथे एक महत्त्वाचा मुद्दा आहे. जी रक्कम (१२,०००) कंपनी आधी पीएफमध्ये जमा करत होती, ती आता थेट त्याच्या पगारात जमा होईल आणि त्यावर त्याला कर भरावा लागेल. समजा, हा कर्मचारी ३०% टॅक्स स्लॅबमध्ये आहे, तर त्याला या रकमेवर सुमारे ३,७४४ रुपये कर भरावा लागेल. म्हणजेच, आता त्याच्याकडे गुंतवणुकीसाठी २४,००० रुपये ऐवजी फक्त २०,२५६ रुपये उरतील.

११% परतावा मिळूनही तो PF पासून मागे का राहिला?समजा दुसऱ्या कर्मचाऱ्याला आपल्या शेअर गुंतवणुकीवर वार्षिक ११% परतावा मिळतो. पाच वर्षांनंतरही त्याच्याकडे एकूण सुमारे १५.७५ लाख रुपये जमा होतात. पण यावर त्याला 'दीर्घकालीन भांडवली नफा' (LTCG) कर देखील भरावा लागतो.

त्याउलट, पीएफमध्ये गुंतवणूक करणाऱ्या कर्मचाऱ्याला दरवर्षी फक्त ८.२५% व्याज मिळाले, तरीही पाच वर्षांनंतर त्याच्या पीएफ खात्यातील शिल्लक १७.७५ लाख रुपयांपर्यंत पोहोचते. ती रक्कम पूर्णपणे करमुक्त असते. याचा अर्थ, कमी परतावा मिळूनही पीएफमध्ये गुंतवणूक करणारा कर्मचारी शेअर बाजारातील गुंतवणूकदारापेक्षा जास्त कमाई करतो.

PF का ठरला शेअर बाजारापेक्षा सरस?ईपीएफला सरकारने EEE (Exempt-Exempt-Exempt) असा कर दर्जा दिला आहे. याचा अर्थ, तुम्ही ईपीएफमध्ये पैसे जमा करता तेव्हा त्यावर कर लागत नाही. वर्षभर मिळणारे व्याजही पूर्णपणे करमुक्त असते. आणि जेव्हा तुम्ही पैसे काढता, तेव्हाही ती संपूर्ण रक्कम करमुक्त राहते, जर तुम्ही किमान ५ वर्षे नोकरी केली असेल.

वाचा - सोन्याने गाठली विक्रमी पातळी! तुमच्या शहरात एक तोळ्याचा आजचा भाव काय? अचानक का आली तेजी?

याउलट, शेअर बाजारातून झालेल्या कमाईवर दीर्घकालीन भांडवली नफा कर लागतो. जर तुमची कमाई एका वर्षापेक्षा जुनी असेल आणि ती १ लाखांपेक्षा जास्त असेल, तर त्यावर १२.५% कर भरावा लागतो. तज्ज्ञाच्या मते, जर दुसऱ्या कर्मचाऱ्याला पाच वर्षांत १७.७५ लाख रुपये मिळवायचे असतील, तर त्याला दरमहा २०,२५६ रुपये गुंतवून कर कपातीनंतर वार्षिक सुमारे १६% परतावा मिळवावा लागेल. आणि शेअर बाजारात एवढा मोठा व स्थिर परतावा मिळवणे सोपे नाही.

टॅग्स :ईपीएफओशेअर बाजारस्टॉक मार्केटगुंतवणूक