Join us

कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2025 15:00 IST

सेवानिवृत्ती निधी संस्था ईपीएफओनं नोकरी बदलल्यावर पीएफ खातं हस्तांतरणाची प्रक्रिया सुलभ केली आहे. पाहा कोणती मिळणार सुविधा.

सेवानिवृत्ती निधी संस्था ईपीएफओनं नोकरी बदलल्यावर पीएफ खातं हस्तांतरणाची प्रक्रिया सुलभ केली आहे. आता बहुतांश प्रकरणांमध्ये नोकरी देणाऱ्या कंपनीची मंजुरी घेण्याची गरज राहणार नाही. श्रम व रोजगार मंत्रालयानं नुकतंच यासंदर्भात एक निवेदन जारी केलं.

आतापर्यंत पीएफ जमा हस्तांतरणामध्ये दोन कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (ईपीएफ) कार्यालयांचा समावेश असायचा. त्यात एक स्रोत कार्यालय म्हणजे, जिथून पीएफ रक्कम हस्तांतरित केली जायची आणि दुसरे गंतव्य कार्यालय म्हणजे जिथे अंतिमतः रक्कम जमा केली जात असं, त्यांनी यात नमूद केलं होतं. मंत्रालयाने सांगितले की, यामुळे १.२५ कोटींपेक्षा अधिक सदस्यांना फायदा होण्याची अपेक्षा आहे. 

ही प्रक्रिया अधिक सुलभ करण्याच्या उद्देशाने ईपीएफओने एक सुधारित फॉर्म-१३ सॉफ्टवेअर व्यवस्था सुरू करून सर्व हस्तांतरण दाव्यांच्या मंजुरीची गरज संपविली आहे. आता हस्तांतरण दावा स्रोत कार्यालयात मंजूर झाला, की खाते स्वयंचलितपणे गंतव्य कार्यालयातील सदस्याच्या वर्तमान खात्यात हस्तांतरित होईल.

कागदपत्रांशिवाय मिळणार ५ लाखखाजगी क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) मोठा निर्णय घेतला आहे. आता ईपीएफओ सदस्याला कागदपत्रांशिवाय ३ दिवसात ५ लाख रुपये मिळतील. किंबहुना आगाऊ दाव्यांच्या ऑटो सेटलमेंटची मर्यादा वाढली आहे. ही मर्यादा एक लाख रुपयांवरून पाच लाख रुपये करण्यात आली आहे. या निर्णयामुळे ईपीएफओच्या साडेसात कोटी सदस्यांचे सेटलमेंट सोपं होणार आहे.

ईपीएफओ नॅशनल पेमेंटकॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) सोबत एक तांत्रिक पायाभूत सुविधा तयार करण्यासाठी काम करत आहे, ज्यामुळे जून २०२५ पासून एटीएम आणि यूपीआयद्वारे पीएफ काढण्याची परवानगी मिळेल. हे अगदी बँक खात्यातून एटीएममधून पैसे काढण्यासारखेच असेल. सीबीटीच्या (केंद्रीय विश्वस्त मंडळ) पुढील बैठकीत या प्रस्तावाला अंतिम स्वरूप दिले जाण्याची शक्यता आहे.

टॅग्स :भविष्य निर्वाह निधी