Join us

डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी पंगा घेणे महागात पडले; इलॉन मस्क यांनी एकाच दिवसात अब्जावधी गमावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 15:58 IST

Elon Musk vs Donald Trump: सरकारने आणलेल्या एका बिलामुळे डोनाल्ड ट्रम्प आणि इलॉन मस्क यांच्यात वाद झाला आहे.

Elon Musk vs Donald Trump: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उद्योगपती इलॉन मस्क यांच्यातील वाद वाढला आहे. दोघेही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एकमेकांविरोधात पोस्ट करताना दिसत आहेत. पण, याचा सर्वाधिक फटका मस्क यांनाच बसतोय. या दोघांच्या वादामुळे मस्क यांच्या एकूण संपत्तीत घट झाली आहे. तसेच, त्यांची कंपनी टेस्लाचे शेअर्सही एकाच दिवसात १५ टक्क्यांहून अधिक कोसळले आहेत.

ब्लूमबर्ग बिलियनेअर इंडेक्सच्या अहवालानुसार, टेस्लाचे मालक इलॉन मस्क यांच्या एकूण संपत्तीत एका दिवसात ३३.९ अब्ज डॉलर्स, म्हणजेच २९,०७,४२,३३,३०,००० रुपयांची घट झाली. यानंतर आता मस्क यांची एकूण संपत्ती ३३५ अब्ज डॉलर्सवर आली आहे. मस्क यांच्या कंपनीच्या शेअर्समध्येही मोठी घसरण झाली. टेस्लाचे शेअर्स १४.२६ टक्क्यांनी घसरून २८४.७० डॉलर्सवर आले. कंपनीच्या शेअर्समध्ये एका दिवसात ४७.३५ डॉलर्सची घसरण झाली.

ट्रम्प-मस्क यांच्यात काय वाद झाला?निवडणूक जिंकल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इलॉन मस्क यांना सरकारमध्ये सामील केले. दोघांमध्ये सुरुवातीला सर्वकाही सुरळीत सुरू होते, पण काही दिवसांपूर्वीच या मैत्रीत मिठाचा खडा पडला. मस्क यांनी अचानक सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यांनी ट्रम्प सरकारने आणलेल्या बिग ब्युटीफुल बिलाला विरोध केला, ज्यामुळे वाद आणखी वाढला. 

यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी एक्स वर मस्क यांच्या विरोधात पोस्ट केली, ज्यामध्ये त्यांनी म्हटले की, त्यांना अजूनही व्हाईट हाऊसची आठवण येते. त्यांनी मस्क यांना ट्रम्प डिरेंजमेंट सिंड्रोम असल्याची टीकाही केली. त्यानंतर मस्क यांनी प्रत्युत्तरात म्हटले की, माझ्याशिवाय डोनाल्ड ट्रम्प २०२४ ची राष्ट्रपती निवडणूक हरले असते. डेमोक्रॅट्सनी हाऊस काबीज केले असते आणि रिपब्लिकनना सिनेटमध्ये फक्त ५१-४९ मते मिळाली असती. त्यांनी अध्यक्ष ट्रम्प यांना कृतघ्नदेखील म्हटले. सध्या या दोघांमधील वादाची सर्वत्र चर्चा सुरू आहे. 

टॅग्स :एलन रीव्ह मस्कडोनाल्ड ट्रम्पअमेरिका