NSE EGR Trading: गुंतवणूकदारांसाठी सोने खरेदी हा नेहमीच एक विश्वासाचा आणि पारंपारिक पर्याय राहिला आहे. मात्र, प्रत्यक्ष (फिजिकल) सोने खरेदी करताना त्याची शुद्धता तपासणे, घडणावळ (मेकिंग चार्जेस) देणे आणि ते सुरक्षित ठेवणे ही मोठी डोकेदुखी असते. गुंतवणूकदारांची हीच चिंता कायमची मिटवण्यासाठी नॅशनल स्टॉक एक्स्चेंजने (NSE) एक मोठे पाऊल उचलले आहे.
शेअर बाजारात आता इलेक्ट्रॉनिक गोल्ड रिसीट (EGR) सेगमेंटचे लाइव्ह ट्रेडिंग अधिकृतपणे सुरू झाले आहे. याचा अर्थ असा की, आता तुम्ही कोणत्याही कंपनीच्या शेअरप्रमाणेच घरबसल्या मोबाईलवरून थेट अस्सल सोन्याची खरेदी-विक्री करू शकणार आहात. यापूर्वी १६ मे रोजी याचे 'मॉक ट्रेडिंग' यशस्वी झाले होते, त्यानंतर आता ही लाइव्ह सिस्टीम कोणत्याही तांत्रिक अडचणीशिवाय सुरू झाली आहे.
शेअर्सप्रमाणे खरेदी करा शुद्ध सोने
'ईजीआर' हा सोन्यातील गुंतवणुकीचा एक अत्यंत आधुनिक आणि डिजिटल पर्याय आहे. या प्लॅटफॉर्मवर ९९.९% (999) आणि ९९.५% (995) इतक्या उच्च शुद्धतेचे सोने उपलब्ध करून देण्यात आले आहे. बाजारातील हे सोने पूर्णपणे 'फंजिबल' (गुणवत्तेची हमी असलेले) असेल, म्हणजेच ग्राहकांना प्रत्येक वेळी सोन्याची शुद्धता तपासण्याची गरज भासणार नाही. छोट्या रिटेल गुंतवणूकदारांपासून ते मोठ्या व्यापाऱ्यांपर्यंत सर्वजण आपापल्या बजेटनुसार वेगवेगळ्या प्रमाणात (डिनोमिनेशन) येथे गुंतवणूक करू शकतात.
'गोल्ड ETF' पेक्षा हा पर्याय वेगळा कसा?
बाजारात आधीपासूनच 'गोल्ड ईटीएफ' हा पर्याय उपलब्ध आहे, परंतु 'ईजीआर'चे मॉडेल त्यापेक्षा पूर्णपणे वेगळे आहे.
गोल्ड ETF: हे एका म्युच्युअल फंड युनिटसारखे असते, जे फक्त सोन्याच्या किमतीचा मागोवा घेते. यामध्ये तुम्हाला कधीही प्रत्यक्ष सोने मिळत नाही.
EGR : यात पैसे गुंतवल्यास, सुरक्षित वॉल्टमध्ये (सरकारी तिजोरीत) ठेवलेल्या खऱ्याखुऱ्या सोन्यावर थेट तुमचा मालकी हक्क मिळतो. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, भविष्यात जर तुम्हाला प्रत्यक्ष सोन्याची गरज भासली, तर तुम्ही तुमच्या या डिजिटल होल्डिंगचे रूपांतर खऱ्या सोन्याच्या बिस्किटात किंवा विटेत करून घेऊ शकता.
सेबीच्या देखरेखीखाली सुरक्षित व्यवहार
या संपूर्ण डिजिटल व्यवस्थेवर बाजार नियामक संस्था 'सेबी'चे कडक नियंत्रण असणार आहे. 'सिक्युरिटीज कॉन्ट्रॅक्ट्स रेग्युलेशन ॲक्ट १९५६' अंतर्गत याला अधिकृतपणे 'सिक्युरिटी'चा दर्जा देण्यात आला आहे. तुमचे ईजीआर शेअर्सप्रमाणेच तुमच्या 'डीमॅट खात्यात' (Demat Account) पूर्णपणे सुरक्षित राहतील. तसेच, प्रत्यक्ष सोने सुरक्षित ठेवण्याची आणि गरज पडल्यास ते ग्राहकांच्या स्वाधीन करण्याची संपूर्ण जबाबदारी 'वॉल्ट मॅनेजर'ची असेल. त्यामुळे चोरीची किंवा फसवणुकीची भीती शून्य आहे.
'वन नेशन, वन प्राईस'
ईजीआर ट्रेडिंगची वेळ सोमवार ते शुक्रवार सकाळी ९:०० ते रात्री ११:३० किंवा ११:५५ वाजेपर्यंत निश्चित करण्यात आली आहे (अमेरिकन डेलाइट सेव्हिंगनुसार वेळेत किरकोळ बदल होऊ शकतो). शेअर्सप्रमाणेच याचे सेटलमेंट देखील 'T+1' नियमावर आधारित असेल, म्हणजेच व्यवहार झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी सोन्याचे मालकी हक्क हस्तांतरित होतील.
या प्रणालीचा सर्वात मोठा फायदा म्हणजे ‘वन नेशन, वन प्राईस’. देशातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये सोन्याच्या दरात असणारा फरक आता या पारदर्शक ट्रेडिंगमुळे संपणार असून संपूर्ण भारतात सोन्याचा एकच भाव लागू होईल. सध्या मुंबई, अहमदाबाद, दिल्ली, कोलकाता, चेन्नई आणि बंगळुरू येथे 'वॉल्टिंग सेंटर्स' (सोन्याच्या तिजोऱ्या) सुरू करण्यात आल्या आहेत. येत्या काळात देशभरात असे १२० सेंटर्स उभारण्याची NSE ची योजना आहे.
(टीप- हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कुठल्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या.)
Web Summary : NSE introduces EGR trading, enabling digital gold transactions like stocks. This offers a secure, transparent way to invest in gold with guaranteed purity, eliminating concerns about physical storage and purity checks. EGRs are held in Demat accounts and can be converted to physical gold.
Web Summary : एनएसई ने ईजीआर ट्रेडिंग शुरू की, जिससे शेयरों की तरह डिजिटल गोल्ड लेनदेन संभव है। यह सोने में निवेश करने का एक सुरक्षित, पारदर्शी तरीका है, जिसमें शुद्धता की गारंटी है, जिससे भौतिक भंडारण और शुद्धता जांच की चिंता दूर हो जाती है। ईजीआर डीमैट खातों में रखे जाते हैं और उन्हें भौतिक सोने में बदला जा सकता है।