Donald Trump Net Worth: अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आज(20 जानेवारी) राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेणार आहेत. दरम्यान, निवडणुकीतील विजयानंतर त्यांच्या संपत्तीत प्रचंड वाढ झाली आहे. विशेष म्हणजे, ट्रम्प यांची मालमत्ता केवळ अमेरिकेतच नाही, तर जगातील विविध देशांमध्ये आहे. भारतातही ट्रम्प यांच्या मालकीची संपत्ती आहे. यात आलिशान बंगल्यापासून टॉवर्सपर्यंत सर्व काही आहे.
फोर्ब्सनुसार, अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या संपत्तीत सोमवारी 865 मिलियन डॉलर्स (सुमारे 7,100 कोटी रुपये) पेक्षा जास्त वाढ झाली आहे.
अमेरिकेनंतर भारतात सर्वाधिक ट्रम्प टॉवर्स
डोनाल्ड ट्रम्स कन्स्ट्रक्शन व्यवसायात असून, त्यांचे अनेक देशात ट्रम्प टॉवर्स आहेत. विशेष म्हणजे, काही वर्षांत अमेरिकेनंतर भारतात सर्वात जास्त ट्रम्प टॉवर्स असतील. सध्या मुंबई, पुणे, गुरुग्राम आणि कोलकाता येथे चार ट्रम्प टॉवर आहेत. पुढील सहा वर्षांत त्यांची संख्या 10 पर्यंत वाढेल. नवीन प्रकल्पांमध्ये नोएडा, हैदराबाद, बंगळुरू आणि पुण्यासारख्या मोठ्या शहरांचा समावेश आहे. ट्रम्प टॉवर्समध्ये कार्यालयीन इमारती, व्हिला आणि गोल्फ कोर्सचा समावेश असेल.
ट्रम्प यांच्या कंपनीने भारतातील ट्रिबेका डेव्हलपर्ससोबत भागादारी केलेली आहे. या कंपनीचे संस्थापक कल्पेश मेहता म्हणतात की, 2014 मध्ये ट्रम्प टॉवर मुंबईच्या लॉन्चिंगवेळी डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतातील व्यवसायाबद्दल उत्सुकता दाखवली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी भारताला एक उदयोन्मुख बाजारपेठ म्हणून पाहिले. मेहता यांच्या मते ट्रम्प राष्ट्राध्यक्ष बनल्याने भारत-अमेरिका संबंध अधिक दृढ होतील.
चार टॉवरची किंमत 7500 कोटी सध्या भारतातील चार ट्रम्प टॉवर्स सुमारे 30 लाख स्क्वेअर फूट क्षेत्रफळात पसरलेले आहेत, ज्यात 800 आलिशान निवासी फ्लॅट्स आहेत. त्यांची किंमत 6 कोटी ते 25 कोटी रुपयांपर्यंत आहे. या चार प्रकल्पांची एकूण अंदाजे किंमत अंदाजे 7,500 कोटी रुपये आहे. पुढील सहा प्रकल्पांची भर पडल्यानंतर भारतातील ट्रम्प ब्रँडेड प्रॉपर्टीचे क्षेत्रफळ 80 लाख चौरस फुटांपर्यंत पोहोचेल, ज्याचे अंदाजे मूल्य 15,000 कोटी रुपये आहे.