UPI wrong transaction : चहाच्या टपरीपासून ते मोठ्या शॉपिंग मॉलपर्यंत आजकाल सर्वत्र यूपीआय (UPI) द्वारेच पेमेंट केलं जातं. मार्च २०२६ मध्ये भारतात २२.६४ अब्ज यूपीआय व्यवहार झाले, जे याच्या लोकप्रियतेची साक्ष देतात. मात्र, तंत्रज्ञानाच्या या वेगात एक महत्त्वाचा प्रश्न नेहमी मनात येतो, जर चुकून पैसे चुकीच्या यूपीआय आयडीवर गेले, तर ते परत मिळवण्यासाठी काही 'Undo' बटण आहे का?
हे लक्षात घेणं आवश्यक आहे की, यूपीआय ॲप्समध्ये ‘Undo’ किंवा ‘Ctrl+Z’ सारखं कोणतंही जादूचं बटण नसतं. ही एक रिअल-टाइम प्रक्रिया आहे. एकदा का तुम्ही तुमचा पिन (PIN) टाकला की पैसे तुमच्या खात्यातून दुसऱ्याच्या खात्यात त्वरित जमा होतात. ज्याच्या खात्यात पैसे गेले आहेत, त्याच्या संमतीशिवाय बँक देखील हा व्यवहार रिव्हर्स करू शकत नाही. परंतु, चुकीच्या आयडीवर गेलेले पैसे परत मिळवण्याचे काही मार्ग नक्कीच आहेत.
‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
चुकीच्या यूपीआय आयडीवर पेमेंट झाल्यास काय करावं?
पैसे चुकीच्या व्यक्तीला गेल्याचे लक्षात येताच घाबरू नका. सर्वात आधी त्या नंबरवर कॉल किंवा मेसेज करा ज्याला पैसे गेले आहेत. अनेकदा समोरची व्यक्ती प्रामाणिक असल्यास पैसे परत करते. पण जर त्या व्यक्तीनं नकार दिला किंवा फोन उचलला नाही, तर त्वरित तुमच्या यूपीआय ॲप आणि बँकेला याची माहिती द्या. प्रत्येक बँकिंग ॲपमध्ये ‘रिपोर्ट इश्यू’चा (Report Issue) पर्याय असतो; त्याचा वापर करून तुम्ही या व्यवहाराची तक्रार 'डिसप्यूट' म्हणून नोंदवू शकता.
जर बँकेकडून त्वरित मदत मिळाली नाही, तर एनपीसीआयच्या पोर्टलवर जा. हीच संस्था यूपीआय चालवते. तिथे ‘डिसप्यूट रिड्रेसल मेकॅनिझम’ अंतर्गत आपली तक्रार नोंदवा. तुमचा ट्रान्झॅक्शन आयडी, तारीख आणि स्क्रीनशॉट जपून ठेवा. याशिवाय तुम्ही भीम ॲपद्वारेही थेट तक्रार करू शकता. याकडे बँक दुर्लक्ष करू शकत नाही.
जेव्हा बँक ऐकत नाही तेव्हा कुठे दाद मागावी?
कधीकधी बँकेचे खालच्या स्तरावरील अधिकारी अशा प्रकरणांत दिरंगाई करतात. अशा वेळी हार न मानता तुम्ही बँकेच्या ‘नोडल अधिकारी’ किंवा ‘ग्रीव्हन्स विभाग’ (तक्रार निवारण विभाग) यांच्याशी संपर्क साधावा. तिथेही ३० दिवसांच्या आत तोडगा निघाला नाही, तर तुम्ही आरबीआय ओम्बड्समनकडे तक्रार करू शकता. आरबीआयचे लोकपाल हे डिजिटल व्यवहारांमधील अशा समस्यांसाठी एक अत्यंत शक्तिशाली व्यासपीठ आहे.
सावधगिरी हाच बचाव
यूपीआय व्यवहारांमधील मनस्ताप टाळण्यासाठी काही स्मार्ट पद्धतींचा अवलंब करा:
- १ रुपयाची चाचणी: मोठी रक्कम पाठवण्यापूर्वी नेहमी १ रुपया पाठवून खात्री करा की पैसे योग्य ठिकाणी जात आहेत की नाही.
- QR कोडचा वापर: टाईपिंगची चूक टाळण्यासाठी मोबाईल नंबरऐवजी QR कोड स्कॅन करणं सर्वात सुरक्षित आहे.
- नाव पुन्हा तपासा: पिन टाकण्यापूर्वी स्क्रीनवर येणारं नाव एकदा लक्षपूर्वक नक्की वाचा.
Web Summary : UPI lacks an 'undo' button. Immediately contact the recipient/bank if funds are wrongly transferred. Report via UPI app, NPCI portal, or RBI Ombudsman if unresolved. Verify details before transactions to avoid errors.
Web Summary : UPI में 'Undo' बटन नहीं है. गलत ट्रांसफर होने पर तुरंत प्राप्तकर्ता/बैंक से संपर्क करें. UPI ऐप, NPCI पोर्टल या RBI लोकपाल के माध्यम से रिपोर्ट करें. गलती से बचने के लिए लेन-देन से पहले विवरण सत्यापित करें.