Join us

Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 18:03 IST

Business: नोकरी सोडून उद्योग करावा असे अनेक नोकरदारांना वाटते, पण यशस्वी सगळेच होतात असे नाही, वाचा या दोन मित्रांची यशोगाथा!

इंटरनेटवर दिसणाऱ्या असंख्य जाहिरातींमध्ये एक दुधाची जाहिरात दिसते. भाकरीसारखी जाड साय, घट्ट दूध, शुद्ध तूप पाहता सर्वसामान्य ग्राहकाला त्या दुधाच्या ब्रॅण्डबद्दल कुतूहल वाटले नाही तरच नवल! एक ऑनलाईन स्टार्ट अप, ५ लाख ग्राहक आणि कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न हा प्रवास कसा सुरु झाला आणि तो ब्रँड नेमका कोणता ते जाणून घेऊ. 

चितळे, वारणा, अमूल यांसारखे नावाजलेले दूध विक्रेते बाजारात असतानाही 'कंट्री डिलाइट' (Country Delight) या नावाने दुग्ध व्यवसाय सुरु केला,  आयआयएम (IIM) इंदूरमधून शिक्षण घेतलेल्या आणि कॉर्पोरेट क्षेत्रात मोठ्या कंपन्यांमध्ये काम केलेल्या चक्रधर गाडे आणि नितिन कौशल या दोन मित्रांनी! 'कंट्री डिलाइट' हे नाव अनेक शहरांमध्ये शुद्ध दूध आणि डेअरी उत्पादनासाठी ओळखले जाते. मात्र, या करोडो रुपयांच्या व्यवसायाची सुरुवात केवळ ५० गायीं सोबत झाली होती, हे फार कमी लोकांना माहिती आहे. या व्यवसायाची सुरुवात कधी, कशी, कुठपासून झाली ते पाहू. 

मागणी तसा पुरवठा 

कॉर्पोरेटमधील चांगली नोकरी सोडून या दोघांनी व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. शहरांमध्ये ताजे आणि शुद्ध दूध मिळणे ही एक मोठी समस्या आहे, हे त्यांच्या लक्षात आले. याच समस्येवर उपाय म्हणून त्यांनी 'कंट्री डिलाइट'ची कल्पना प्रत्यक्षात आणली. दिल्लीतच दररोज ७० लाख लीटर दूधाची मागणी आहे; जर आपण एक लाख लीटरची मागणी पूर्ण करू शकलो, तरी मोठा व्यवसाय उभारू शकतो, या ध्येयाने त्यांनी ५० गायी हाताशी घेत हा प्रवास सुरू केला.

ताजे दूध गोठ्यातून थेट घरात 

सुरुवातीला त्यांनी स्वतः गायींचे पालन केले, पण यात अनेक अडचणी आल्या. त्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांशी संपर्क साधून त्यांच्याकडून दूध घेण्यास सुरुवात केली. आज कंपनी दूध, तूप, पनीर, दही यांसोबतच भाज्या, फळे आणि इतर अनेक स्वयंपाकघरातील उत्पादने त्यांच्या फार्ममधून ग्राहकांच्या घरापर्यंत पोहोचवली जात आहेत. 

'असा' कमवला ग्राहकांचा विश्वास

'कंट्री डिलाइट'च्या यशाचे सर्वात मोठे कारण म्हणजे त्यांची गुणवत्ता तपासण्याची सुविधा (Quality Check). जे ग्राहक कंपनीचे सबस्क्रिप्शन घेतात, त्यांना दूध तपासणीची किट दिली जाते. यामुळे ग्राहक घरबसल्या दूधात किती आणि कशा प्रकारची भेसळ आहे, हे तपासू शकतात. या पारदर्शकतेमुळे ग्राहकांचा विश्वास वाढला आणि कंपनी आज पुणे, मुंबई, बेंगळूरु, चेन्नई अशा १५ हून अधिक शहरांमध्ये ५ लाखांहून अधिक ग्राहक आणि महिन्याला ५० लाखांहून अधिक ऑर्डर्सची डिलिव्हरी करत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Friends left corporate jobs, sold milk, became millionaires: Brand success!

Web Summary : Two IIM graduates founded Country Delight, delivering fresh dairy directly. Starting with 50 cows, they addressed the need for pure milk. Customers trust their quality checks, driving expansion to 15+ cities with 5 lakh customers.
टॅग्स :व्यवसायपैसा