Join us

फक्त २५० रुपयांनी सुरुवात, ७० लाखांपर्यंतचा जमेल निधी! मुलीचे शिक्षण आणि लग्नाची चिंता कायमची मिटेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2025 10:25 IST

sukanya samriddhi yojana : जर तुम्ही तुमच्या मुलीच्या जन्मानंतर लगेचच खाते उघडले तर तुम्ही १५ वर्षांसाठी गुंतवणूक करू शकता. या योजनेतून तुम्ही तुमच्या लेकीच्या नावावर ७० लाख रुपयांपर्यंतचा निधी जमा करू शकता.

sukanya samriddhi yojana : महागाईच्या काळात मुलांचे शिक्षण आणि लग्न यांसारख्या मोठ्या खर्चांसाठी त्यांच्या जन्मापासूनच आर्थिक नियोजन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. सध्या बाजारात गुंतवणुकीचे असंख्य पर्याय उपलब्ध आहेत. यात भारत सरकारची सुकन्या समृद्धी योजना खासकरुन मुलींच्या आर्थिक भविष्यासाठी एक उत्तम आणि पूर्णपणे जोखीममुक्त पर्याय ठरत आहे. या सरकारी-समर्थित योजनेत सध्या ८.२% चक्रवाढ व्याज दिले जात आहे, जे मुलींच्या उच्च शिक्षणासाठी आणि लग्नासाठी मोठा निधी तयार करण्यास मदत करते.

सुकन्या समृद्धी योजनेचे ठळक फायदे

  • खाते उघडण्याची पात्रता: पालक त्यांच्या मुलीसाठी ती १० वर्षांची होण्यापूर्वी कधीही सुकन्या समृद्धी योजनेत खाते उघडू शकतात. यामुळे पालकांना गुंतवणुकीसाठी पुरेसा वेळ मिळतो.
  • किती खाती उघडता येतात: सहसा, एका कुटुंबात जास्तीत जास्त २ मुलींसाठी SSY खाती उघडता येतात. मात्र, जुळे किंवा तिळे जन्माला आल्यास, २ पेक्षा जास्त खाती देखील उघडता येतात.
  • योगदान कालावधी: खाते उघडल्यापासून जास्तीत जास्त १५ वर्षांसाठी या योजनेत योगदान देता येते.
  • गुंतवणूक आणि लॉक-इन: जर तुम्ही तुमच्या मुलीच्या जन्मानंतर लगेच खाते उघडले, तर तुम्ही १५ वर्षांपर्यंत गुंतवणूक करू शकता. यानंतर, ६ वर्षांचा 'लॉक-इन' कालावधी असतो, ज्यामध्ये तुम्हाला कोणतीही नवीन गुंतवणूक करावी लागत नाही, परंतु तुमच्या ठेवीवर व्याज मिळत राहते. यामुळे एकूण २१ वर्षांनी मॅच्युरिटी मिळते.
  • अंशतः पैसे काढणे: मुलगी १८ वर्षांची झाल्यावर मॅच्युरिटी रकमेच्या ५०% पर्यंत रक्कम शिक्षणासाठी किंवा इतर गरजांसाठी काढता येते. उर्वरित रक्कम मुलगी २१ वर्षांची झाल्यावर पूर्णपणे काढता येते.
  • कर लाभ : SSY योजना 'EEE' (Exempt-Exempt-Exempt) स्थितीसह येते. याचा अर्थ असा की या योजनेत केलेली वार्षिक १.५० लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक, त्यावर मिळणारे व्याज आणि मॅच्युरिटीवर मिळणारी संपूर्ण रक्कम, या तिघांनाही प्राप्तीकर सूटचा लाभ मिळतो.
  • किमान आणि कमाल गुंतवणूक: तुम्ही एका आर्थिक वर्षात किमान २५० रुपये आणि जास्तीत जास्त १,५०,००० रुपये जमा करू शकता. ही गुंतवणूक तुम्ही हप्त्यांमध्ये किंवा एकरकमी देखील करू शकता.

७० लाख रुपयांचा निधी कसा तयार करायचा?समजा, तुम्ही आज, २०२५ मध्ये तुमच्या १ वर्षाच्या मुलीसाठी सुकन्या समृद्धी योजनेत खाते उघडले. जर तुम्ही दर आर्थिक वर्षात जास्तीत जास्त १,५०,००० रुपये (म्हणजे दरमहा १२,५०० रुपये) गुंतवले, तर २०४६ मध्ये (जेव्हा तुमची मुलगी २१ वर्षांची होईल) मॅच्युरिटीच्या वेळी तुम्हाला एकूण ६९,२७,५७८ (जवळपास ७० लाख रुपये) मिळू शकतात. या रकमेत तुम्ही गुंतवलेल्या एकूण २२,५०,००० रुपये मूळ रक्कम आणि तब्बल ४६,७७,५७८ लाख रुपयांचा मोठा व्याज लाभ समाविष्ट असेल.

वाचा - आनंदाची बातमी...! LPG सिलिंडरची किंमत पुन्हा कमी झाली; 1 जूनपासून ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवा दर

सुकन्या समृद्धी योजना ही खऱ्या अर्थाने मुलींच्या उज्ज्वल आणि सुरक्षित भविष्यासाठी एक महत्त्वाचा आधारस्तंभ बनली आहे. त्यामुळे, आपल्या मुलीच्या भविष्यासाठी आजच या योजनेत गुंतवणूक करून आर्थिक स्थैर्य मिळवा.

टॅग्स :गुंतवणूकसरकारी योजनाशेअर बाजार