Join us

अनंत अंबानींना रिलायन्सकडून मिळणार एवढा पगार, नफ्यातील कमिशनसह इतर भत्तेही सामील

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2025 16:58 IST

Anant Ambani: अनंत अंबानी यांना व्यवसायिक दौऱ्यादरम्यान स्वतःसह पत्नी आणि इतर सहकाऱ्यांचा प्रवास, जेवण आणि राहण्याचा खर्चही दिला जाईल.

Anant Ambani: आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांचे धाकटे पुत्र आणि रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये कार्यकारी संचालक म्हणून नियुक्त झालेले अनंत अंबानी यांना वार्षिक १०-२० कोटी रुपये पगार आणि कंपनीच्या नफ्यावर कमिशनसह भत्ते मिळणार आहेत. ही बाब शेअरहोल्डर्सना पाठवलेल्या माहितीत देण्यात आली आहे. मुकेश यांची तीन मुले - जुळी मुले आकाश-ईशा आणि अनंत यांना २०२३ मध्ये कंपनीच्या बोर्डात गैर-कार्यकारी संचालक म्हणून सामील करण्यात आले होते. 

दरम्यान, या वर्षी एप्रिलमध्ये फक्त अनंत यांना रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे ​​कार्यकारी संचालक बनवण्यात आले. गैर-कार्यकारी संचालक म्हणून, तिघांनीही कोणताही पगार घेतला नाही, परंतु २०२३-२४ या आर्थिक वर्षात त्यांना ४ लाख रुपये फी आणि ९७ लाख रुपये कमिशन मिळाले. कार्यकारी संचालक म्हणून, आता ३० वर्षीय अनंत नियमित पगार आणि इतर मोबदल्यासाठी पात्र असतील. 

रविवारी स्टॉक एक्स्चेंजला दिलेल्या माहितीत रिलायन्सने म्हटले की, अनंत अंबानी यांच्या नियुक्तीसाठी शेअरहोल्डर्सची मान्यता पोस्टल मतपत्रिकेद्वारे मागवण्यात आली होती. अनंत यांचे वार्षिक वेतन आणि भत्ते १०-२० कोटी रुपयांच्या दरम्यान असतील. या भत्त्यांमध्ये घर किंवा भाडे भत्ता, घर देखभाल आणि इतर भत्ते (गॅस, वीज, पाणी, सजावट आणि दुरुस्ती) सामील आहेत. 

विशेष म्हणजे, मुकेश अंबानी यांच्या मुलांपैकी आकाश ग्रुपच्या टेलिकॉम विभागाचे नेतृत्व करतो, ईशा रिलायन्स रिटेल आणि जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसचे काम पाहते, तर अनंत मटेरियल आणि रिन्यूएबल एनर्जी सेगमेंटमध्ये काम करतोय. आता ते व्यावसायिक व्यवस्थापकांसह कार्यकारी संचालकाची जबाबदारी पाहणार आहे.

टॅग्स :मुकेश अंबानीरिलायन्सअनंत अंबानीआकाश अंबानीईशा अंबानीव्यवसायगुंतवणूक