Join us
Daily Top 2Weekly Top 5

ट्रम्प टॅरिफमुळे भारताला होणार सर्वाधिक फायदा; या कंपन्यांच्या प्रमुखांनी केली मोठी भविष्यवाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 14:20 IST

America Tariff: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा जगभरातील अनेक देशांवर परिणाम होणार आहे.

America Tarrif: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफच्या निर्णयाचा जगभरातील अनेक देशांवर परिणाम होणार आहे. अशातच, या टॅरिफमुळे भारताला चांगलाच फायदा होऊ शकतो, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. भारत आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या द्विपक्षीय व्यापार कराराला मान्यता मिळाल्यावर, देशांतर्गत स्तरावर व्यवसायाला मोठी चालना मिळेल, असा विश्वास ब्लू स्टार, टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स, अरविंद आणि डिक्सन टेक्नॉलॉजीजसह अनेक कंपन्यांच्या सीईओंनी व्यक्त केला आहे.

डिक्सन टेक्नॉलॉजीज, टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स, ब्लू स्टार, हॅवेल्स आणि अरविंद यासारख्या आघाडीच्या देशांतर्गत कंपन्यांच्या सीईओंनी विश्लेषकांना सांगितले की, अमेरिकन टॅरिफ परिस्थितीत भारतीय व्यवसाय स्पर्धात्मक राहतात. सध्या चर्चेत असलेला भारत-अमेरिका द्विपक्षीय व्यापार करार (BTA) व्यवसायाला चालना देईल. 

निर्यातीत वाढ होऊ शकतेडिक्सनचे एमडी अतुल लाल यांनी गेल्या आठवड्यात त्यांच्या तिमाही निकालांमध्ये सांगितले की, कंपनी त्यांच्या वाढत्या ऑर्डर बुकची पूर्तता करण्यासाठी त्यांच्या प्रमुख ग्राहकांसाठी क्षमता 50% ने वाढवत आहे, ज्याचा मोठा भाग उदयोन्मुख भू-राजकीय परिस्थिती लक्षात घेता उत्तर अमेरिकेत निर्यात करण्यासाठी असेल. 

गेल्या महिन्यात ईटीने वृत्त दिले होते की, गुगल भारतातून हँडसेट निर्यात करण्याचा विचार करत आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अॅपल आणि सॅमसंग सारख्या मोबाईल फोन कंपन्यांना भारत आणि इतर ठिकाणांहून सोर्सिंग करण्याऐवजी स्थानिक पातळीवर अमेरिकेत उत्पादन करण्यास सांगितले असून, 25 टक्के शुल्काचा इशारा दिला आहे. परंतु अतिरिक्त शुल्क असूनही कंपन्यांना भारतात उत्पादन करणे आणि निर्यात करणे स्वस्त होईल.

देशातील एक प्रमुख वस्त्रोद्योग कंपनी अरविंदचे उपाध्यक्ष पुनीत लालभाई म्हणाले की, अल्पावधीत त्यांच्या काही "स्ट्रॅटेजिक ग्राहकांच्या" खर्चाच्या रचनेत वाढ झाली आहे. कंपनीला तिच्या अनेक अमेरिकन ग्राहकांकडून ऑर्डरमध्येही वाढ होताना दिसत आहे. लालभाई म्हणाले की, मागणी वाढल्याने नफा लवकरच सामान्य होईल आणि आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीत नफा मिळण्यास सुरुवात होईल. 

भारताचे वाढते आकर्षणअमेरिकेने चीनवरील शुल्क 145% वरून 30% पर्यंत कमी केले आहे, तर भारतावरील 26% शुल्क सध्या स्थगित करण्यात आले आहे. अशा वेळी सीईओंकडून हा आशावाद व्यक्त करण्यात आला आहे. वस्त्रोद्योग कंपनी गोकलदास एक्सपोर्ट्सने म्हटले की, चीनवरील उच्च कर आणि बांगलादेशातील राजकीय अनिश्चितता, यामुळे किरकोळ अडथळे असूनही सोर्सिंग डेस्टिनेशन म्हणून भारताचे एकूण आकर्षण वाढले आहे. एफएमसीजी कंपन्यांपैकी एक असलेले टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्सचे सीईओ सुनील डिसोझा म्हणाले की, अमेरिकेत निर्यात होणारी कॉफी आणि चहासारखी उत्पादने तिथे उत्पादित केली जात नाहीत, म्हणूनच स्पर्धात्मक परिस्थितीतून आम्ही इतर सर्वांच्या बरोबरीने राहू.

 

टॅग्स :डोनाल्ड ट्रम्पअमेरिकाभारतव्यवसायगुंतवणूक